Water Quality : पाण्याची गुणवत्ता जपायलाच हवी!

Water : शुद्ध व योग्य गुणवत्तेचे पाणी उपलब्धता ही फक्त पिण्यापुरतीच नाही, तर शेती, पाळीव जनावरे, मत्स्यपालन, अन्न प्रक्रिया, औषधे निर्मिती, रिफायनरीज अशा सर्व ठिकाणी अत्यावश्यक बाब आहे.
Water
Water Agrowon
Published on
Updated on

Water Purity : शुद्ध व योग्य गुणवत्तेचे पाणी उपलब्धता ही फक्त पिण्यापुरतीच नाही, तर शेती, पाळीव जनावरे, मत्स्यपालन, अन्न प्रक्रिया, औषधे निर्मिती, रिफायनरीज अशा सर्व ठिकाणी अत्यावश्यक बाब आहे. सध्या तरी पाण्याच्या गुणवत्तेचा विषय चर्चेमध्ये असतो, तो प्रामुख्याने मनुष्यकेंद्रित असतो. पण सर्व अन्नसाखळ्यांच्या रक्षणासाठी अन्य जिवांच्या विशेषतः जलचरांच्या आरोग्याचा विषयही तितकाच महत्त्वाचा असल्याचे आपण लक्षात घेतले पाहिजे.

मागील महिन्यात अमरनाथ यात्रेसाठी निघालेल्या आमच्या मित्रांच्या गटाला डायरिया आणि तशाच प्रकारच्या अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करून घ्यावे लागले. कारण ते सक्तीचे असते. खरेतर अमरनाथ हे हिमालयातील प्रसिद्ध क्षेत्र आहे. या हिमालयातील पाणीसुद्धा जर शुद्ध किंवा खात्रीचे राहिलेले नसेल, तर भरगच्च मानवी वस्ती असलेल्या शहरांतील पाणी कसे शाश्‍वत शुद्ध असू शकेल?

भारत हा मौसमी पावसाचा प्रदेश असल्यामुळे मुबलक प्रमाणात पाऊस आणि पाण्याची उपलब्धता आहे. हे खरे असले तरी लोकसंख्येच्या प्रचंड घनतेमुळे शुद्ध पाणी पुरवठ्याच्या नियोजनात अनेक घटकांचा प्रभाव पडतो. नैसर्गिकरीत्या पाण्याच्या गुणवत्तेत दोष असण्याबरोबरच वेगवेगळ्या प्रदूषणामुळे पाण्याची गुणवत्ता खूप खालावते. चांगल्या गुणवत्तेचे शुद्ध पाणी ही मूलभूत गरज असून, त्यामुळे माणसाचे आरोग्य उत्तम राहते. होणाऱ्या एकूण आजारांपैकी ७० ते ८० टक्के आजार हे अशुद्ध पाण्यामुळे होतात. गेल्या काही दशकांमध्ये लसीकरणाचा वापर होत असूनही आपल्या देशात दरवर्षी साडेतीन ते चार कोटी लोक पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या आजारांनी ग्रासलेले दिसतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार दुर्दैवाने पंधरा लाख बालके डायरियाने दरवर्षी मृत्युमुखी पडतात. या आजारपणांमध्ये शरीराची हानी, दवाखाने, औषधे यांचा खर्च आणि रोजगार बुजल्यामुळे होणारे नुकसान होते. दरवर्षी साडेसात कोटी मानवी तास त्यामुळे वाया जातात. शासनही आरोग्यावर दरवर्षी ५००० कोटी रुपयांचा खर्च करते. अन्य बाबी वेगळ्याच. कोट्यवधी लोक दारिद्र्यरेषेचे खाली अडकून पडण्याच्या अन्य कारणासोबत हेही मोठे कारण आहे.

Water
Turmeric Quality : विकिरण तंत्रज्ञानाव्दारे हळदीची गुणवत्ता टिकविण्यासाठी प्रकल्प

पाणी गुणवत्तेची व्याख्या व मापदंड :
पाण्याची गुणवत्ता साधारणपणे भौतिक, रासायनिक व जैविक या तीन विभागांत पाहिली जाते.
१) भौतिक गुणवत्तेमध्ये रंग, तापमान, गंध, घनता आणि न विरघळले तरंगणारे घनपदार्थ इ.
२) रासायनिक गुणवत्तेमध्ये पाण्यात निसर्गातून मिसळलेली रसायने (सेंद्रिय, असेंद्रिय रसायने), विविध प्रदूषके व त्यांचे प्रमाण, पाण्यात विरघळलेला प्राणवायू इ.
३) जैविक गुणवत्तेत पाण्यात असणारे जीवजंतू व त्यांचे प्रमाण हे सर्वसाधारण निकष आहेत.

पाण्याच्या गुणवत्तेचे निकषानुसार रक्षण करण्यासाठी आपल्या देशातील प्रमुख नियम व कायदे
१) द ग्राउंड वॉटर सस्टेनेबल मॅनेजमेंट बिल २०१७
२) वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पॉल्युशन ऍक्ट १९७४ आणि
३) एन्व्हायर्न्मेंट प्रोटेक्शन ॲक्ट.
यासोबतच पिण्याच्या पाण्याविषयी राष्ट्रीय मापदंड ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (ISO १०५००) याचा संदर्भ घेतला जातो. याबरोबरच WHO या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मापदंडसुद्धा स्वीकारलेले आहेत.

Water
पाण्याची गुणवत्ता गावातच तपासता येणार

सामान्य माणसांच्या दृष्टीने शुद्धतेची व्याख्या अत्यंत साधी आहे. त्यांना साधारणपणे रंगहीन, गंधहीन, सामान्य तापमानाचे, अगदीच कमी व संतुलित क्षार असलेले, कुठलेही दृश्य जीवजंतू नसलेले पाणी प्यायला आवडते. हे निकष अपुरे आहेत. कारण पाण्यात पूर्ण विरघळलेली विविध रसायने हानिकारक आहेत. अनेक रोगकारक
घटक हे डोळ्यांना दिसत नसल्यामुळे वरवर स्वच्छ दिसत असलेले पाणीही हानिकारक ठरू शकते. पाण्याच्या प्रकारानुसार (उदा. भूजल, तलावातले पाणी, वाहते पाणी इ.) गुणवत्ता वेगळ्या पद्धतीने तपासली जाते. पाण्याच्या गुणवत्ता निर्देशांकही ठरवला जातो. या एक ते शंभरपर्यंतच्या निर्देशांकामध्ये ‘जितका अधिक तितका चांगला’ हे समजावे.

पाण्याच्या रासायनिक गुणवत्तेवर परीणाम करणारे घटक :
भूजलामध्ये जमिनीतील विविध खनिजे व क्षार मिसळले जातात. तसेच हवेतील घटक पावसात मिसळून ते पाणीही जमिनीत मुरते. यातील अनेक घटक हे पाण्याचे पोषणमूल्य वाढवणारे आहेत. मात्र विशिष्ट प्रमाणातच असले तरच उपयोगी आणि प्रमाणापेक्षा अधिक असल्यास शरीराला अपायकारक आहेत. पाण्यात नैसर्गिकरीत्या असू शकणारी रसायने व त्यांचे प्रमाण अधिक असल्याने होणारे दुष्परिणाम यांची यादी तपशीलवार पाहू.
ॲल्युमिनिअम - स्मृतिभंश, अल्झायमर.
आर्सेनिक – विविध अवयवांचे कॅन्सर
निकेल – श्‍वसन संस्थेचे गंभीर आजार
फ्लोराइड : हाडांना वाक, हाडे ठिसूळ, त्वचारोग, दातांवर डाग.
कॅल्शिअम व मॅग्नेशिअम : पचनसंस्थेचे व किडनीचे विकार.
लोह : पचन संस्थेचे आजार, अल्सर, बद्धकोष्ठता.
क्लोराइड : खारट पाणी, भाज्यांचा चवीवर परिणाम.
सल्फेट : अतिसार
नायट्रेट : रक्ताभिसरणासंबधी रोग, मेंदूचे रोग, मानसिक आजार व अन्य रोगांना निमंत्रण.
सेलेनिअम : केस गळणे, दात क्षीण होणे.
हेलिअम : केस गळणे.
मॅंगेनिज : मानसिक व मज्जा तंतूचे विकार.
शिसे : मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासाला बाधा.
पारा : मज्जातंतूचे विकार.
वाहनांचा धूर तसेच सेंद्रिय पदार्थांच्या विघटनामधून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे हवेतील नायट्रेटचे प्रमाण वाढते. तो पावसाच्या पाण्यात विरघळून जमिनीत जातो. भूजलात मिसळतो.

पाण्याची भौतिक गुणवत्ता
पाण्याची चव आंबट असल्यास आम्लता जास्त असतो. म्हणजे पाण्याचा सामू (PH) सातपेक्षा कमी असतो. त्या उलट पाणी तुरट किंवा कडू असेल तर पाण्यात अल्कली असते. सामू ८.५ पेक्षा जास्त असतो. या पाण्यामुळे सर्वच जीव रासायनिक क्रियांमध्ये बदल होतात. भाजीपाला, धान्य, फळे आणि आपले शरीर या सर्वांवरच नकारात्मक परिणाम होतो.

जैविक गुणवत्ता ढासळल्याने होणारे परिणाम ः
पाण्यातील जिवाणू, विषाणू, कृमी, कीटाणू यांच्यामुळे टायफाइड, अतिसार, कॉलरा, कावीळ, पोलिओ, हगवण, खरूज, नारू, कोलायटिस, ॲमिबीओसिस इ. रोग होतात.
वरील बहुतांश बाबी नैसर्गिक असून, त्यात मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या पाणी प्रदूषणाचा विचार केलेला नाही. कारण अशी प्रदूषणे आणि त्यातून उद्‍भविणाऱ्या आजार व व्याधी हा खरेतर स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो.

वर सांगितलेल्या निकषाबरोबरच तलावांचे व नदीचे पाणी याच्या पाणी गुणवत्ता निर्देशांकात आणखी काही बाबींचा समावेश होतो. तो रासायनिक गुणवत्तेतच मोडतो. उदा. पाण्यातील विरघळलेला प्राणवायू (Dissolve Oxygen), जैविक प्राणवायूची मागणी (BOD) व रासायनिक प्राणवायूची मागणी (COD) हे ते निकष होत. पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण आठ पीपीएम असेल तर ते पाणी जलचरांसाठी उत्तम गुणवत्तेचे मानले जाते.
नैसर्गिक घटकांबरोबरच मानवाच्या प्रदूषणामुळे जमिनीवर साठलेले पाणी असो, की वाहते पाणी असो, वा भूजल अशा सर्वच पाण्याची गुणवत्ता खूपच खालावते आहे. शहरी भागात वैयक्तिक, घरगुती वापरातील विविध रसायने व कारखान्यांचे सांडपाणी यामुळे प्रदूषण वाढत आहे. तर ग्रामीण भागात कृषी क्षेत्रामध्ये विविध होत असलेल्या रसायनांच्या बेसुमार वापरामुळे पाणी गुणवत्तेचा निर्देशांक खूप खाली येत आहे. परिणामी शहरी असो की ग्रामीण सर्वच लोक विविध आजारांच्या विळख्यात सापडत आहेत. केवळ हॉस्पिटल व औषधे यावर भरमसाट खर्च करण्यापेक्षाही पाण्याची गुणवत्ता जपण्यासाठी, वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करणे कधीही हितावह ठरू शकते. माणसांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्यासाठीच नव्हे, तर वैयक्तिक आणि देशाच्या आर्थिक सुदृढतेसाठीही हे तितकेच आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com