Agriculture Methods : पारंपरिक कृषी पद्धतीच्या तुलनेमध्ये आधुनिक आणि कृत्रिम कृषी पद्धतीमध्ये लेट्यूस पिकाचे उत्पादन दुप्पट होत असल्याचे दिसून आले आहे. पिकाची वाढ आणि उत्पादनाचे प्रदीर्घ विश्लेषण इंग्लंड येथील सरे विद्यापीठामध्ये करण्यात आले. हीच बाब भविष्यातील जागतिक अन्नसुरक्षेसमोरील आव्हानामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आधुनिक कृत्रिम कृषी पद्धतींचा अवलंब आवश्यक ठरणार आहे.
पारंपरिक शेती पद्धतीवर वाढत्या लोकसंख्येचा ताण सातत्याने वाढत आहे. त्यातच वातावरण बदलामुळे वाढत असलेल्या तापमानाची समस्याही वाढणार आहे. अशा स्थितीमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता जगभरातील शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीमध्ये उभ्या राहत असलेल्या वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी जगभरातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि कृत्रिम शेती पद्धतीकडे वळविण्याची आवश्यकता निर्माण होत आहे.
हीच बाब तपासण्यासाठी जगभरातील पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने लेट्यूस पिकांचे उत्पादन करून, त्याच्या तुलनात्मक अभ्यासावर प्रकाशित केलेल्या विविध १२० पेक्षा अधिक संशोधनाचे पुन्हा विश्लेषण करण्यात आले.
१२० पेक्षा अधिक प्रकाशित संशोधनाचे विश्लेषण केल्यानंतर त्यात कृत्रिम पद्धतीचा वापर केल्यास उन्हाळ्यात उत्पादन दर ५० टक्के आणि हिवाळ्यात ३०० टक्क्यांपर्यंत अधिक राहत असल्याचे समोर आले आहे. अधिक अचूकतेने मांडायचे, तर पारंपरिक शेती पद्धतीमध्ये लेट्यूस उत्पादनासाठी ६० ते १२० दिवस लागतात व त्याचे प्रति वर्गमीटर १.८८ किलो सरासरी उत्पादन मिळते.
तर आधुनिक कृत्रिम पद्धतीमध्ये सरासरी चाळीस दिवसांमध्ये लेट्यूल वाढून, त्याचे प्रति वर्गमीटर ३.६८ किलो इतके सरासरी उत्पादन हाती येते. उभ्या मजल्याच्या कृत्रिम शेतीमध्ये तर पारंपरिक पिकापेक्षा कितीतरी अधिक (प्रति वर्गमीटर ६.८८ किलो) उत्पादन मिळू शकते.
या विश्लेषणाविषयी अधिक माहिती देताना सरे विद्यापीठातील डॉ. झो. एम. हॅरिस म्हणाले, ‘‘वातावरणातील बदलामुळे हवामानामध्ये अनेक वेळा आणीबाणीची स्थिती आपल्यासमोर तयार होत आहे. त्याचे भयावह आव्हान जागतिक अन्नसुरक्षेसाठी असणार आहे. अशा तीव्र वातावरणामध्ये नियंत्रित शेतीमध्ये पिकांची लागवड शक्य होऊ शकते. आधुनिक कृत्रिम शेती पद्धतीतून पिकांची वाढ आणि उत्पादनामध्ये चांगला परिणाम मिळवणे शक्य आहे.
हे तंत्रज्ञान कोणत्या पिकांमध्ये आणि कोणत्या काळामध्ये समाजासाठी अधिक उपयुक्त ठरू शकते, हे समजून घेण्यासाठी वेगवेगळ्यया काळातील पिकांच्या वाढीचा आणि उत्पादनाच्या प्रमाणाचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आमच्या मेटा अभ्यासातून आधुनिक कृत्रिम पद्धतीचे महत्त्व अधिरेखित झाले आहे. पण त्यातील अधिक बारकावे जाणून घेण्यासाठी अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.