Soil Health : जमिनीतील सूक्ष्मजीवशास्त्र समजाऊन घ्या...

Soil Microbiology : शेणखत, कंपोस्टपेक्षा जमिनीखालील अवशेषांचे खत जास्त चांगले. कुजण्याची क्रिया जागेला होणे गरजेचे आहे आणि दीर्घ काळ चालू ठेवणे महत्त्वाचे आहे.
Soil Health
Soil Health Agrowon
Published on
Updated on

प्रताप चिपळूणकर

Soil : शेणखत, कंपोस्टपेक्षा जमिनीखालील अवशेषांचे खत जास्त चांगले. कुजण्याची क्रिया जागेला होणे गरजेचे आहे आणि दीर्घ काळ चालू ठेवणे महत्त्वाचे आहे. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कुजविणारा आणि पिकाला पोषण देणारा असे सूक्ष्म जीवांचे दोन गट असतात. त्यांचे शास्त्र समजाऊन घेणे आवश्यक आहे.

पीक पेरणीपूर्वी जमिनीची मशागत करणे गरजेचे आहे हे शास्त्रज्ञ सांगतात. तसे शेतकऱ्यांना परंपरागत ज्ञानाने माहीत आहे. आज आपण पाहतो नांगर, कुळव, मेलपट, जमिनीची रचना करण्याची यंत्रे, पेरणीची यंत्रे, अशी कित्येक यंत्रे मशागत आणि पेरणीसाठी लागतात. ती सर्व एका दिवसात तयार झाली नाहीत. कित्येक पिढ्यांत सुधारणा होत होत आजची अवजारे तयार झालेली आहेत. माझ्या पिढीला सुरवातीला बैलाने चालवायची अवजारे त्यानंतर ट्रॅक्टर, पॉवर टिलरने चालवायच्या अवजारांमध्ये सतत विकास हे स्थित्यंतर पहावयास मिळाले. मशागतीचे यांत्रिकीकरण झाल्यावर बैल सांभाळणे कमी होत गेले. लाकडी अवजारांची जागा लोखंडी अवजाराने घेतली.ज्यांना सवय आहे त्यांनी ट्रॅक्टर, पॉवर टिलर घेतले. ज्यांना शक्य नाही, त्यांनी भाडे देऊन मशागत करून घेतली. आज मशागतीचा खर्च शेतकऱ्यांना डोईजड झाला आहे. तरीही मशागत चांगली झाली पाहिजे. यापासून ना शेतकरी दूर गेला ना शास्त्रज्ञ.

जमिनीमध्ये सेंद्रिय खत निर्मिती ः
घट्ट झालेली जमीन प्रथम नांगराने फोडून पोकळ केली जाते. या काळात शेतात मोठी ढेकळे निघतात. अवजारे उभी आडवी फिरवून ती बारीक केली जातात. मग कुळव, मेलपट मारून जमीन एकदम बारीक पिठासारखी केली जाते. त्यानंतर शक्य असेल तितके शेणखत, कंपोस्ट शेवटच्या कुळवाच्या पाळीत मातीत मिसळतो. धसकटे गोळा करून जमीन स्वच्छ करतो. मेलपट मारून जमीन बसविली की मशागत पूर्ण झाली. मीही ३० ते ३५ वर्षे असेच अपार श्रद्धेने हे काम करीत आलो आहे. उत्तम मशागत झाल्याचे कसे ओळखावे, शेवटची मेलपट(दिंड)ची पाळी मारत असता मागे धुरळा उडाला पाहिजे अगर जमिनीवर चाबूक मारला तर त्याचा स्पष्ट वळ जमिनीवर उठला पाहिजे.

Soil Health
Soil Health : महाराष्ट्रातील जमिनीतील गंधकाचे प्रमाण का घटतेय?

मात्र १९९० साली असे लक्षात आले की ही धसकटे म्हणजे कुजणारा पदार्थ, ज्यापासून सेंद्रिय खत तयार होऊ शकते. भू-सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास या काळात सुरू झाला होता. जमिनीमध्ये पिकाला वाढीच्या कामात असंख्य सूक्ष्मजीव मदत करीत असतात. त्यांना हे काम करणेसाठी सेंद्रिय खत गरजेचे आहे. अनेक कारणामुळे आपण ते गरजे इतके देऊ शकत नाही. यामुळे सूक्ष्मजीवांना गरजे इतके काम करता येत नाही. त्यामुळे उत्पादकता कमी होत आहे. धसकटापासून जर सेंद्रिय खत बनत असेल तर ती पैसे खर्च करून गोळा करून, पेटविणे अगर बांधावर नेऊन फेकून देणे हे चुकीचे आहे. मी तत्काळ १९९० साली धसकटे गोळा करणे बंद झाले. शेतीतील एक काम कमी झाले, जमिनीतील काही प्रमाणात सेंद्रिय खत मिळाले.

Soil Health
Soil Moisture : आंतरमशागतीतून टिकवा जमिनीतील ओलावा

मशागतीच्या खर्चापोटी मोठ्या प्रमाणात भाडे द्यावे लागते, यासाठी बँकेकडून कर्ज काढून पॉवर टिलर घेतला. पॉवर टिलरने मशागत करून बैलाने उसासाठी सरी काढली. यामुळे भाडे पूर्ण बंद झाले. लावणीसाठी सरीत पाणी सोडले तर ते पोकळ जमिनीतच मुरू लागले. अत्यंत सावकाश पुढे सरकू लागले. जमीन गरजेपेक्षा जास्त पोकळ झाली आहे, ती दबली जाऊन सरी सोडणे गरजेचे आहे. ३५ अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने एकेरी पल्टी फाळाने सरी सोडत असता ट्रॅक्टरचे चाक वरंब्याखाली आणि सरीच्या तळात जाऊन आपोआप जमीन दाबली जाते. यामुळे पाणी कमी लागते, जे उसासाठी गरजेचे आहे. हे लक्षात आल्यावर पॉवर टिलरने नांगरणी आणि पल्टी फाळाने सरी काम चालू केले. तरीही जवळ पॉवर टिलर, बैल असून सरीसाठी भाडे मोजावे लागते, ते वाचविता येईल का ? यावर चिंतन चालू होते. मग पुढे १५० सें.मी.चा पट्टा नांगरावयाचा आणि १५० सें.मीचा पट्टा नांगरायचा नाही हे ठरविले. यामुळे वरंब्याखाली कठीण
न नांगलेले रान राहिले. बैलाचे सरी काढावयाच्या अवजाराने नांगरलेल्या पट्ट्यात फिरवून बीन नांगरलेल्या पट्ट्यात माती चढविली आणि सऱ्या वरंबे तयार झाले. वरंबे कठीण असल्याने आडवे पाणी मुरले नाही. सरीतून जलद पुढे सरकले. कमीत कमी पाण्यात लावण झाली. पाणी कमी लागण्याचे फायद्याबरोबर उसाची प्राथमिक अवस्थेतील गरज योग्य प्रकारे भागल्याने पिकाचाही भरपूर फायदा झाला व खर्चात बचत बचत झाली.


सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रयोग ः
सूक्ष्मजीवशास्त्राने शिकविले की, सेंद्रिय पदार्थ रानातच कुजविला पाहिजे. आता या दोन नवीन नियमांचे पालन कसे करावयाचे यावर चिंतन सुरू झाले. पहिला प्रश्‍न असा पदार्थ कोठून पैदा करावयाचा? मनाला बंधन घालून घेतले की, असा पदार्थ बाजारातून पैसे मोजून आणावयाचा नाही. लांबून आणावयाचा नाही. वाहतूक, भरणी, उतरणी नको. रानात विसकटणे, कालविणे नको. चिंतन केल्यानंतर पहिले लक्ष गेले ऊस तुटून गेल्यानंतर मिळणारे पाचट. पाचट कुजविण्याचे अनेक प्रयोग १५ वर्षे केले. परंतु आढावा घेतल्यानंतर उसाच्या उत्पादनात वाढ दिसून आली नाही. आता आणखी दुसरा पदार्थ शोधणे गरजेचे होते.

उसातून भातात जात असता जमीन नांगरली जात होती. उसाचे जमिनीखालील अवशेष गडी जळणासाठी घेऊन जात. आता हे अवशेष कुजविण्यावर चिंतन सुरू झाले. जमीन नांगरली तर ही खोडकी गडी नेणार, आपल्याला मिळणार नाहीत. मग अजिबात जमीन न नांगरता भात करता येईल का? उन्हाळ्यात जमीन कठीण असते. कोरड्या रानात, पेरणी शक्य नाही. पाऊस पडून अगर ओलीतानंतर टोकण करून पेरणी करणे शक्य असल्याचे लक्षात आले. वरंब्यातील खोडक्याचे अवशेष सतत भातात उगवत राहतील आणि भात मार खाईल. या व्यतिरिक्त ते जिवंत राहिल्यास त्याचे खत होणार नाही. यासाठी उसाचे अवशेष शिफारशीत तणनाशकाने संपविले. टोकण पद्धतीने शून्य मशागतीवर भात शेती सुरू केली. याप्रमाणे पहिले पीक २००५ साली घेतले. हा एक प्रयोग होता. परंपरेच्या पूर्ण विरुद्ध होता.परंतू या शेतीत भाताची उगवण, फूट वगैरे उत्तम झाली, चांगले उत्पादन मिळाले.

आता पुढील ऊस लावण या जुन्या सरी वरंब्यावर शून्य मशागतीत करण्याचे ठरविले. फक्त सरीच्या तळात कांडी पुरली जाण्यापुरती नांगराचे एक हलके तास मारून मशागत संपविली. नेहमीप्रमाणे लावण केली. हाही एक चेष्टेचा विषय होता. काही पिकणार नाही असा इतरांचा सल्ला होता. लावण, उगवण, फुटीची अवस्था व नेहमीप्रमाणे भरणी झाली. त्यानंतर ४० ते ५० दिवसांनंतर उसाची अशी काय वाढ चालू झाली की मी त्या रानात गेल्या २० ते २५ वर्षात असा ऊस पाहिला नव्हता. लोकरी मावा, पाणी लांबल्यामुळे वाळणे अशी काही संकटे येऊनसुद्धा ज्या रानात एक आरसाठी एक टनापुढे काटा जात नव्हता, तेथे आता १.५ टन उत्पादन मिळाले. खर्च कमी व उत्पादन, उत्पन्न जास्त मिळाले. अशा प्रकारे २००५-०६ हंगामात शून्य मशागतीचा जन्म माझ्या शेतावर झाला. पुढे याची शास्त्रीय कारणमींमासा करणे क्रमप्राप्त झाले.


जमिनीखालील अवशेषांचे खत ः
माझ्या शेती प्रयोगातून एक लक्षात आले की शेणखत, कंपोस्टपेक्षा जमिनीखालील अवशेषांचे खत जास्त चांगले. कुजण्याची क्रिया जागेला होणे गरजेचे आहे आणि दीर्घ काळ चालू ठेवणे महत्त्वाचे आहे. येथे लक्षात घेण्याची एक गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कुजविणारा आणि पिकाला पोषण देणारा असे सूक्ष्म जीवांचे दोन गट असतात.
यातील पहिला गट जमिनीला सुपीकता देतो तर दुसरा पिकाला पोषण. पहिल्या गटात अनेक बुरशी ॲक्टीनोमायसेटस्‌ आणि जिवाणूंचा समावेश आहे. एका शास्त्रज्ञाने लिहिले आहे की जमीन सुपीक करणेसाठी बुरशी जमिनीत वाढली पाहिजे. ते येथे आपोआप साध्य होते. मशागत म्हणजे पूर्वी आपण जी कामे कित्येक दिवस करीत होतो ती सर्व कामे या ठिकाणी सूक्ष्मजीव फुकटात करून देतात. यामुळे ही शून्य मशागत शेती होती असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात ती १२ महिने चोवीस तास, निरंतर मशागत पद्धत आहे. शेणखत भरपूर टाकूनही जमिनीची सुपीकता वाढविता येत नाही. या तंत्राने २०-२५ वर्षे वापरून बिघडवलेली सुपीकता केवळ एकाच वर्षात २०-२५ वर्षापूर्वीप्रमाणे होते,याकडे मी शेतकऱ्यांचे लक्ष वेधू शकतो.
--------------------------------------------
संपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८
(लेखक कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com