द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी करण्याचे तंत्र

वर्षभरात कधीही कलम केले तरी यशस्वी करण्यासाठी दाभोळकर प्रयोग परिवारातील नाशिक परिसरातील गटप्रमुख रामचंद्र भाऊ चुंबळे यांनी सलग तीन वर्षे प्रयोग केले आहेत. त्यांच्या अनुभवानुसार, अति पावसाचा कालावधी वगळता वर्षभरात केव्हाही म्हणजे जादा तापमानाच्या मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये कलम करून यशस्वी करता येते.
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी करण्याचे तंत्र
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी करण्याचे तंत्र
Published on
Updated on

महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम केले जाते. द्राक्ष पिकामध्ये १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत कलम केले जाते. शक्यतो वर्षातील अन्य महिन्यामध्ये कलम केले जात नाही. यामुळे कलम कोणत्याही कारणाने अयशस्वी झाल्यास कलम करण्यासाठी वर्षभर थांबावे लागते. यात वर्षभर बाग सांभाळण्याचा खर्च वाढण्यासोबतच उत्पादन सुरू होण्यास एक वर्ष आणखी लागते. हे टाळण्यासाठी वर्षभरात कधीही कलम केले तरी यशस्वी करण्यासाठी दाभोळकर प्रयोग परिवारातील नाशिक परिसरातील गटप्रमुख रामचंद्र भाऊ चुंबळे यांनी सलग तीन वर्षे प्रयोग केले आहेत. त्यांच्या अनुभवानुसार, अति पावसाचा कालावधी वगळता वर्षभरात केव्हाही म्हणजे जादा तापमानाच्या मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये कलम करून यशस्वी करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या तंत्रासाठी वेगळा व अधिक खर्चही करावा लागत नाही. त्यांच्या प्रयोग आणि अनुभवावर आधारीत हे तंत्र आपण सविस्तर समजून घेऊ. ग्राफ्टिंग करिता काड्यांची निवड ः ज्या रुटस्टॉकवर आपणास ग्राफ्टिंग करावयाचे आहे, त्याची उंची जमिनीपासून सव्वा ते दीड फूट असावी. रूटस्टॉकची काडी एकदम पक्की झालेली नसावी. कोवळी व नुकतीच पक्वतेला सुरुवात झालेली असावी. जेथे ग्राफ्टिंग करायची आहे, तेथे ती हिरवी असावी. अशा काडीत जोड जुळण्यास लागणारा रस म्हणजे कॅलस चांगल्या प्रमाणात असतो. त्यामुळे अशा काडीवरील ग्राफ्टिंगचा जोड यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त राहते. तसेच ज्या काडीचे ग्राफ्टिंग करायचे, त्या काडीचा मधला भाग चॉकलेटी तपकिरी झालेला असला पाहिजे. यावरून अशी काडी पूर्ण पक्व झालेली आहे, असे समजले जाते. अशा परिपक्व काडीचे ग्राफ्टिंग जास्त यशस्वी होते. काडी रोपण (ग्राफ्टिंग) करताना दोन्ही काड्या जुळवताना मध्ये गॅप राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. ग्राफ्टिंगसाठी प्लॅस्टिकची गाठ बांधण्याची पद्धत ग्राफ्टिंग केल्यानंतर त्या दोन काड्यांमध्ये गॅप राहू नये. जोडावर सतत दाब राहावा म्हणून प्लॅस्टिकची पट्टी बांधली जाते. ती घट्ट बांधली पाहिजे. जोड मिळून वाढ सुरू होताच काडीची जाडी वाढू लागते. अशा वेळी गाठ वर बांधलेली असल्यास तिथे वाढ कमी होऊन खाच पडते. हे टाळण्यासाठी गाठ ही मध्यभागी बांधावी. फॉईल पेपरने ग्राफ्टिंग पूर्ण झाकणे - फॉईल पेपरने केलेले ग्राफ्टिंग जोडापर्यंत पूर्ण झाकून घ्यावे. असे केल्याने काडीमधील जोडाजवळील ओलावा व आर्द्रता टिकून राहते. त्यामुळे जोड जुळण्याचे प्रमाण वाढते. वातावरणातील उष्णतेचा वाईट परिणाम जोडावर न होता त्या जवळचे सूक्ष्म वातावरण टिकून राहते. जोड जुळण्याचे व पर्यायाने ग्राफ्टिंग यशस्वी होण्याचे प्रमाण वाढते. ग्राफ्टिंग केलेली काडी ओली राहून आर्द्रता टिकण्याकरिता काही वेळा दिवसातून दोन वेळा काडीवर पाण्याचा फवारा देऊन ओलेपणा टिकवला जातो, तसा पाण्याचा फवारा फॉईल पेपर लावल्यास करण्याची गरज भासत नाही. ग्राफ्टिंग केलेल्या व फाइल पेपर लावलेल्या काडीला गवताचे आच्छादन करणे - ग्राफ्टिंग केल्यानंतरच्या कालावधीत उन्हे व उष्णता तीव्र असल्यास ग्राफ्टिंग यशस्वी होण्याचे प्रमाण कमी होते. हे टाळण्यासाठी फॉईल पेपरवर गवताचे आच्छादन करून पेंडी बांधावी. यामुळे वातावरणापेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने उष्णता कमी जाणवते. आर्द्रतायुक्त वातावरण तयार होते. तीव्र उन्हाच्या काळातही ग्राफ्टिंग यशस्वी होण्याचे प्रमाण वाढते. फॉईल पेपर लावणे व तापमान जादा असल्यास गवताचे आच्छादन फॉईल पेपरवर करणे ही पद्धत वापरल्यास वर्षभरात केव्हाही ग्राफ्टिंग करता येते. ते यशस्वीही होत असल्याचा रामचंद्र चुंबळे यांचा अनुभव आहे. फॉईल पेपर मधील डोळे तपासणे - ग्राफ्टिंग केल्यानंतर १० ते १४ दिवसाचे दरम्यान डोळे फुटण्यास सुरुवात होते. यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी दहा ते बारा वेलीवरील फॉईल पेपर काढून बघावेत. जिथे डोळे फुटलेले असतील, त्या ठिकाणचा फॉईल पेपर काढून टाकावा. नंतर १७ ते २० दिवसांनी राहिलेल्या सर्व ठिकाणचा फॉईल पेपर काढून घ्यावा. फुटायचे राहिलेल्या डोळ्यावर गवताचे आच्छादन करावे. तर फुटलेल्या डोळ्यांचे सर्व आच्छादन काढून टाकावे. डोळे न फुटल्यास पुन्हा ग्राफ्टिंग करावे - सामान्यतः ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये ग्राफ्टिंग केले जाते. त्यानंतर जर काही वेलीवरील ग्राफ्टिंग यशस्वी झाले नाही, काडी वाळून गेली तर पुन्हा ग्राफ्टिंग करण्यास वर्षभर थांबावे लागते. मात्र वरील पद्धतीनुसार आपण ग्राफ्टिंग यशस्वी न झाल्यास फेल गेल्यास ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये किंवा वर्षभरात केव्हाही पुन्हा ग्राफ्टिंग करू शकतो. सर्व बाग शंभर टक्के यशस्वी करता येते. याकरिता वरती सांगितल्याप्रमाणे पुन्हा केलेल्या ग्राफ्टिंगला फॉइलपेपर पेपर लावावा. तीव्र ऊन असेल तर पहिले पंधरा दिवस त्यावर गवताचे आच्छादन करावे. तीव्र ऊन नसल्यास गवताचे आच्छादन करण्याची गरज नाही. ही पद्धत इतर फळपिकांतही वापरता येईल. या पद्धतीने बागेत ग्राफ्टिंग १०० टक्के यशस्वी करता येत असल्याचे शेतकऱ्यांच्या सलग तीन वर्षांच्या प्रयोगातून लक्षात आलेले आहे. --------- रामचंद्र दगुजी चुंबळे, ९८२२६१२८७३ वासुदेव चिमणराव काठे, ९९२२७१९१७१ (लेखक नाशिक येथील प्रगतीशील शेतकरी असून, दाभोळकर प्रयोग परिवार, महाराष्ट्र समन्वयक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com