Wheat Cultivation : तंत्र गहू लागवडीचे...

बागायती वेळेवर पेरणीची योग्य वेळ नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा आहे. या कालावधीत पेरणी केल्यास उत्पादन चांगले येते. वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे.
Wheat Cultivation
Wheat CultivationAgrowon
Published on
Updated on

डॉ. योगेश पाटील, डॉ. सुरेश दोडके, डॉ. भानुदास गमे

बागायती वेळेवर पेरणीची योग्य वेळ नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा आहे. या कालावधीत पेरणी केल्यास उत्पादन (Wheat Production) चांगले येते. वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. उशिरा पेरणीसाठी हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे. संरक्षित पाण्याखालील लागवडीसाठी ७५ ते १०० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.(Wheat Sowing)

बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. तथापि, मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येईल. एक किंवा दोन पाणी उपलब्ध असल्यास लागवड जमिनीत ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी जमिनीतच करावी. शक्यतो हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे.

१) पिकाच्या मुळ्या जमिनीत ६० ते ७५ सें. मी. खोलवर जातात. म्हणून या पिकासाठी चांगली भुसभुशीत जमिनीची निवड करावी. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरावे.

२) संरक्षित पाण्याखालील पेरणी १ ते १० नोंव्हेंबरमध्ये करावी. बागायती वेळेवर पेरणीची योग्य वेळ नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा आहे. या कालावधीत पेरणी केल्यास उत्पादन चांगले येते. बागायती गव्हाची पेरणीसुद्धा उशिरा करता येते. परंतु वेळेवर पेरणी केलेल्या गव्हापेक्षा उत्पादन कमी येते.

Wheat Cultivation
Rice Cultivation : १२ एकरात भाताच्या ५० वाणांची लागवड करणारा शेतकरी

३) बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यास हेक्टरी २.५ क्विंटल उत्पादन कमी येते. त्यामुळे १५ डिसेंबर नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.

४) वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. उशिरा पेरणीसाठी हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे. संरक्षित पाण्याखालील लागवडीसाठी ७५ ते १०० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.

५) पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम (७५ टक्के डब्ल्यूएस) ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून बियाणे वाळवल्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम अ‍ॅझोटोबॅक्टर आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. जिवाणू खतांच्या बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.

६) पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी. वापसा आल्यावर जमीन कुळवावी. बागायत गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळीत २० सेंमी आणि उशिरा पेरणी १८ सेंमी अंतर ठेवून करावी. पेरणी ५ ते ६ सें. मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते.

७) संरक्षित पाण्याखालील पेरणी दोन ओळींत २० सेंमी अंतर ठेवून करावी. पेरणी उभी-आडवी अशा दोन्ही बाजूंनी न करता ती एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते.

८) बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंद आणि ७ ते २५ मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत.

Wheat Cultivation
Gladiolus Cultivation : ग्लॅडिओलस लागवडीसाठी निवडा योग्य वाण

सुधारित जाती ः

बागायत वेळेवर पेरणी :

सरबती जाती ः फुले समाधान, त्र्यंबक, तपोवन, एम.ए.सी.एस. ६२२२, एमएसीएस-६४७८.

- ही बागायती उशिरा पेरणीसाठी फुले समाधान, एकेएडब्ल्यू - ४६२७ जातीची शिफारस.

- पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास एनआयएब्ल्यू - १४१५ (नेत्रावती) आणि एचडी २९८७ (पुसा बहर) जातींची निवड करावी.

बन्सी जाती ः

- बागायती वेळेवर पेरणी एनआयडीडब्ल्यू - २९५ (गोदावरी) जातीची निवड करावी.

- एमएसीएस-४०२८, एमएसीएस- ४०५८ जातींची निवड करावी.

खपली गहू ः

- या गव्हाचा वापर रवा, खीर आणि नाश्त्याचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो.

- तंतूंचे प्रमाण इतर गव्हाच्या तुलनेत जास्त असते (१६ टक्क्यांपेक्षा जास्त).

- या गव्हाच्या खाद्यपदार्थामध्ये ग्लायकॅमिक निर्देशांक कमी असतो, मधुमेही रुग्णांच्या आहारात समाविष्ट.

- जात ः एमएसीएस- २९७१.

नवीन प्रसारित जाती ः

१) फुले समाधान (एनआयएडब्ल्यू १९९४) ः

- बागायती क्षेत्रात वेळेवर (१ ते १५ नोव्हेंबर) तसेच उशिरा (१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर) पेरणीसाठी योग्य.

- वेळेवर पेरणीसाठी उत्पादन ४६.१२ क्विंटल/हेक्टर.

- उशिरा पेरणीमध्ये उत्पादन ४४.२३ क्विंटल / हेक्टर.

- तांबेरा रोग तसेच मावा किडीस प्रतिकारक्षम.

- टपोरे व आकर्षक दाणे, प्रथिनांचे प्रमाण १२.५ ते १३.८ टक्के.

- चपातीची प्रत उत्कृष्ट व प्रचलित जातीपेक्षा सरस.

- प्रचलित जातीपेक्षा ९ ते १० दिवस लवकर येतो.

२) फुले सात्त्विक (एन.आय.ए.डब्ल्यू.३१७०)ः

- संरक्षित पाण्याखाली पेरणीसाठी प्रसारित.

- प्रथिनांचे प्रमाण ११ ते १२ टक्के, बिस्कीट स्प्रेड मानक १० पेक्षा जास्त.

- दाण्याचा कडकपणा खूप कमी म्हणजे (३० ते ४५ टक्के) तसेच ब्रेड गुणवत्ता स्कोअर ७.० ते ७.५०, ग्लूटेन इंडेक्स ८० ते ८५ टक्के.

- चपातीचा गुणवत्ता स्कोअर हा ७ ते ७.५. यामध्ये लोहाचे प्रमाण हे ३५ ते ४० पीपीएम, झिंक ३० ते ३५ पीपीएम. -तांबेरा रोगास प्रतिकारक्षम.

- उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल प्रति हेक्टरी.

३) एनआयडीडब्ल्यू -११४ ःः

- द्विपकल्पीय विभागातील जिरायती किंवा एका ओलिताखाली (एक पाणी पेरणीनंतर ४२ दिवसांनी) वेळेवर पेरणीसाठी शिफारशीत बन्सी जात.

- तांबेरा रोगास प्रतिकारक

- शेवया, कुरड्या व पास्ता यासाठी उत्तम

- तयार होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस.

- उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल प्रति हेक्टरी.

खत व्यवस्थापन ः

- बागायती पिकासाठी हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्यावेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर ३ आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावे. उशिरा केलेल्या पेरणीसाठी हे प्रमाण हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश इतके द्यावे. निम्मे नत्र व स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर ३ आठवड्यांनी द्यावे.

- पश्‍चिम महाराष्ट्रातील मैदानी खोल काळ्या जमिनीवर गव्हाच्या उत्पादनाकरिता पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी १ टन शेणखत मिसळून पेरणी जोड ओळीत (१५ ते २० सेंमी) करून प्रति हेक्टर ७० किलो नत्र,३५ किलो स्फुरद किलो, युरिया-डीएपी ब्रिकेटमार्फत (२.७ ग्रॅ. वजनाची ब्रिकेट) १५ सेंमी अंतराच्या जोड ओळीत प्रत्येकी ३० सेंमी अंतरावर १० सेंमी खोल खोचावी.

- पश्‍चिम महाराष्ट्राच्या मैदानी प्रदेशातील लोहाची कमतरता असणाऱ्या जमिनीमध्ये अधिक उत्पादन, आर्थिक फायदा व जमिनीतील लोहाची पातळी राखण्यासाठी पिकास शिफारशीत अन्नद्रव्यांसोबत (१२०:६०:४०) नत्र : स्फुरद : पालाश किलो प्रति हेक्टर अधिक १० टन शेणखत प्रती हेक्टरी, मुरविलेले हिराकस २० किलो प्रति हेक्टरी (१०० किलो शेणखतात १५ दिवस मुरवून) जमिनीतून द्यावे.

- बागायती क्षेत्रात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पिकास शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा देऊन पेरणीनंतर ५५ ते ७० दिवसांनी २०० ग्रॅम १९:१९:१९ या विद्राव्य खताची किंवा डीएपी या खताची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

-----------------------

संपर्क ः डॉ. योगेश पाटील, ९४२१८८६४७४

(कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com