Botany Scientist : गोडवा देणारी शास्त्रज्ञ : डॉ. जानकी अम्मल

डॉ. जानकी अम्मल यांचं नाव फारसं कुणाला माहिती नसेल, पण त्यांचा आपल्या सर्वांच्या जीवनातली गोडी वाढवण्यात फार मोठा वाटा आहे. उसाची गोडी वाढवण्यासंदर्भातलं त्यांचं संशोधन फार मौलिक आहे.
Botany Scientist
Botany ScientistAgrowon

डॉ. जानकी अम्मल (Dr. Janki Ammal) यांचं नाव फारसं कुणाला माहिती नसेल, पण त्यांचा आपल्या सर्वांच्या जीवनातली गोडी वाढवण्यात फार मोठा वाटा आहे. उसाची गोडी वाढवण्यासंदर्भातलं त्यांचं संशोधन फार मौलिक आहे. डॉ. जानकी अम्मल यांची विशेष ओळख म्हणजे त्या भारतातील पहिल्या महिला वनस्पतिशास्त्रज्ञ (Botanist) होत. केरळमधल्या तेल्लीचेरी या ठिकाणी ४ नोव्हेंबर १८९७ ला जानकी अम्मल यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मद्रास इलाख्याचे सुभेदार होते. त्यांनी आपल्या पाचही मुलींना उत्तमोत्तम शाळांमध्ये दाखल करून शिक्षण दिलं.

अर्थातच तत्कालीन मद्रासमधलं वातावरण फार कर्मठ होतं. स्त्रियांनी शिकून घराबाहेर पडणं फारच कठीण होतं. पण जानकीच्या कुटुंबातून मात्र मुलींना त्यासाठी कायमच प्रोत्साहन मिळत राहिलं. मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर तिने काही काळ एका मिशनरी महाविद्यालयात अध्यापन केलं. नोकरी करतानाही तिने आपलं शिक्षण सुरूच ठेवलं होतं. तिच्या उत्तम अभ्यासाचं फळ म्हणून अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाची बार्जर ही मानाची शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी तिने थेट अमेरिका गाठली. अभ्यासासाठीचे अथक परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर तिने मिशिगन विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळवली. भारतात परत येताना त्या प्रा. डॉ. जानकी अम्मल झालेल्या होत्या.

Botany Scientist
Crop Management : सूर्यप्रकाश ठरवतो वनस्पतींची वाढ आणि विकास

वनस्पतिशास्त्र हा डॉ. जानकी यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. आपलं पुढील सारं आयुष्यच त्यांनी या विषयातील संशोधनासाठी वाहून घेतलं. भारतात परतल्यावर त्यांनी त्रिवेंद्रमच्या महाराजा कॉलेजमध्ये अध्यापनकार्य सुरू केलं. त्या वेळी वेंकटरामन आणि सी. ए. बार्बर हे दोन शास्त्रज्ञ ऊस पिकासंदर्भात काही संशोधन करत होते. त्यासाठी त्यांनी कोइमतूर येथे ‘शुगरकेन ब्रीडिंग सेंटर’ची स्थापना केली होती. डॉ. जानकी यांना त्याबद्दल माहिती मिळताच त्यासुद्धा या संशोधन कार्यात सामील झाल्या.

Botany Scientist
Tur Crop Management : तुर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कोणते उपाय कराल?| Agrowon | ॲग्रोवन

या ठिकाणी काम करत असताना जानकी यांनी ऊस आणि इतर गवतवर्गीय वनस्पतींवर महत्त्वाचं संशोधन केलं. त्यांच्या संशोधनामुळे संपूर्ण भारतभर उसाच्या भौगोलिक वितरणाचं विश्‍लेषण करण्यास मदत झाली. या कार्यात मानाचा शिरपेच खोवला गेला तो एका विशेष प्रकारच्या हायब्रीड उसाचे वाण शोधल्याने! उसाच्या वेगवेगळ्या वाणांचा संकर करून त्यांनी अधिक उतारा देणारा जास्त गोड वाण शोधून काढला. त्यांच्या या संशोधनाचं सर्वत्र फार कौतुक झालं.

असं असलं तरी सर्वच परिस्थिती डॉ. जानकी यांना कायमच अनुकूल होती असं मात्र मुळीच नाही. जातिभेद आणि लिंगभेदपूर्ण दूषित वागणूक अनेकदा त्यांच्या वाट्याला आली. वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना पुरुष सहकाऱ्यांकडून त्यांना कायम उपेक्षेची वागणूक मिळाली. ईर्षेपोटी त्यांच्या कामात अनेक अडथळे आणले गेले. पण डॉ. जानकी फार धीराच्या होत्या. अत्यंत प्रतिकूल आणि निराशाजनक वातावरणातसुद्धा त्यांनी आपलं संशोधनकार्य अविरतपणे सुरू ठेवलं. या कामाचाच एक भाग म्हणून त्या लंडनला गेल्या. तिथल्या एका फलोत्पादन संशोधन केंद्रात त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून काम सुरू केलं. त्या वेळी दुसरं महायुद्ध सुरू होतं. त्यामुळे त्यांना लवकर भारतात परतता आलं नाही. या लंडन वास्तव्यात त्यांनी ‘क्रोमोझोम ॲटलास ऑफ कल्टीव्हेट प्लांट्‍स’ हे महत्त्वाचं पुस्तक लिहून काढलं. सायटोजेनेटिक्स आणि फायटोलॉजीमध्ये त्यांनी मूलभूत संशोधन केलं.

पंडित नेहरू यांनी डॉ. जानकी यांना भारतात परत बोलावून घेतलं आणि ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था’ इथे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली. यासोबतच आणखीही काही सरकारी संस्थांसोबत काम करत डॉ. जानकी यांनी भारताच्या वैज्ञानिक प्रगतीत महत्त्वाचं योगदान दिलं. डॉ. जानकी यांनी फुलझाडांच्या गुणसूत्ररचनेचा विशेष अभ्यास केला. ज्या वनस्पतींवर त्यांनी काम केलं त्यांपैकी एक महत्त्वाचं फुलझाड म्हणजे मॅग्नोलिया. विस्ली सोसायटीच्या आवारात त्यांनी लागवड केलेल्या एका फुलझाडाच्या प्रजातीचं नाव ‘मॅग्नोलिया कोबस जानकी अम्मल’ असं आहे.

त्यांनी वांगी पिकाचे सुद्धा अधिक उत्पन्न देणारे काही खास वाण तयार केले. ‘सायलेंट व्हॅली’ या केरळमधील शिल्लक राहिलेल्या अखेरच्या वर्षावनाची निवड १९५८ मध्ये इथे जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यासाठी केली गेली होती. या जंगलात पशुपक्षी आणि वनस्पतींच्या हजारो प्रजाती गुण्यागोविंदाने नांदत होत्या. हा प्रकल्प झाल्यास या जंगलाची फार मोठी हानी होणार होती. या प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं. या आंदोलनात डॉ. जानकी अग्रभागी राहिल्या आणि सरकारी धोरणाला कडाडून विरोध केला.

डॉ. जानकी अम्मल आजीवन अविवाहित राहिल्या. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी वनस्पती शास्त्रातील संशोधनाला वाहून घेतलं होतं. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या सामाजिक जीवनात सक्रिय होत्या. गांधीवादी विचारसरणीचा त्यांच्यावर बराच प्रभाव होता. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तत्त्व त्यांनी कायम अंगीकारलं. वनस्पतिशास्त्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने १९७७ मध्ये पद्मश्री सन्मान देऊन गौरवलं. कृतार्थ जीवन जगल्याच्या समाधानात १९८७ मध्ये त्यांनी देह ठेवला. भारतीय अर्थव्यवस्थेला ऊर्जा देणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करणाऱ्या ऊस, वांगी आणि फुलांच्या संकरित जाती शोधून काढणाऱ्या थोर शास्त्रज्ञ डॉ. जानकी अम्मल यांचे आपण कायमच ऋणी असले पाहिजे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com