
श्रीलंकेच्या शेतकऱ्यांना (Agriculture Shrilanka) एका रात्रीत रासायनिक शेती (Chemical farming) सोडून सेंद्रिय शेती करायचं फर्मान राष्ट्रपतींनी सोडलं. हा निर्णय स्वतःच्या पायांवर धोंडा मारल्यागत होईल, असं तेथील शेतीशास्रज्ञ आणि बुद्धिजीवीनीं सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो व्यर्थ ठरला. रासायनिक रोगापेक्षा हा सेंद्रिय उपाय अघोरी होता. लवकरच त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. सहा महिन्यांपूर्वी तांदळाच्या उत्पादनात (Paddy Production) स्वयंपूर्ण असलेल्या देशाला तांदूळ आयात (Paddy Import) करावा लागला. म्हणजे शेतीरसायनांवरील चाळीस कोटी डॉलर्स वाचवण्याच्या नादात, तांदूळ आयात करण्यासाठी पंचेचाळीस कोटी डॉलर्स खर्च झाले. चार आण्याच्या कोंबडीसाठी बारा आण्याचा मसाला खर्ची पडला.
पाच-सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. आम्हाला सेंद्रिय खते आणि कीटकनाशकाने हवी आहेत, असे सांगणारे श्रीलंकेतून बरेच फोन आले. श्रीलंकेत अचानक असं काय झाल, असा प्रश्न मला पडला. माझ्या श्रीलंकन मित्राचा फोन आला तेव्हा त्याचं उत्तर मिळालं. ‘‘डॉक्टर, तुमची सेंद्रिय उत्पादनं आम्ही आयात करतो आहोत; पण आता त्यांचं आमच्या देशात उत्पादन करूया का?’’ असा सवाल त्यांनी केला. हे मित्र म्हणजे श्रीलंकेतील प्रथितयश उद्योजक. देशातील खताच्या व्यवसायात गेली तीन दशकं मोठं योगदान देणारी प्रमुख व्यक्ती. ‘एवढ्यात श्रीलंकेत उत्पादनाची घाई का?’ असा प्रश्न केल्यावर त्यांनी रावणाच्या देशातील शेतीची रामकहाणी सांगायला सुरुवात केली.
श्रीलंकेच्या या सेंद्रिय शेती धोरणाच्या असेंद्रिय अधःपतनाच्या बोधकथेची सुरुवात श्रीलंकेतील राजकारण्यांनी चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्यास सुरुवात केली तेव्हापासून झाली. या आपत्तीची बीजे २००५ पासून पेरली गेली.
आधीच मरण यातना सोसणाऱ्या श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचा गाडा कोविड महामारीच्या काळात आणखीनच गाळात गेला. पर्यटन व्यवसायाचे तीन तेरा वाजले. डॉलरचा स्रोत आटला. नोव्हेंबर २०१९ मध्ये ७५० कोटी डॉलर्सचा ‘परकीय चलनसाठा’ जून महिन्यात २८० कोटी डॉलर्सपर्यंत आटला. बँकेत डॉलर्सचा खणखणाट, वाढती आयात आणि घटलेली निर्यात यामुळे व्यापार तूट आणखी वाढली. पर्यायाने श्रीलंकेचा रुपया गडगडला आणि समुद्री बेटांच्या देशाचा बुडत्याचा पाय अजून खोलात गेला. महागाई भरमसाट वाढली. पेट्रोल, डिझेलसारख्या अत्यावश्यक गोष्टी विकत घेण्यासाठी देखील पैसे उरले नाहीत. कर्ज फेडायला पैसे कोठून आणणार?
सर्वांत सोपा उपाय म्हणजे नवीन नोटा छापणे. २०२० मध्ये ६५० बिलियन श्रीलंकन रुपयाच्या नोटा छापल्या. त्यापैकी २१३ बिलियन रुपये परदेशी कर्ज फेडण्यात गेले. गेल्या ऑगस्मध्ये परत नोटा छापल्या. पण दात कोरून किती पोट भरणार? देश चालवायचा असेल तर बचत करावी लागेल. म्हणून जिथं शक्य असेल तिथून बचतीला सुरुवात झाली. डॉलर वाचवायच्या वाटा शोधणे सुरू झाले. सरकारी बाबूंचा कागदोपत्री ‘कॉपी पेस्ट’चा रिसर्च सुरू झाला. आणि सिंहली भाषेत ‘युरेका युरेका’ म्हणत त्यांनी अजब सत्य शोधून काढलं. दरवर्षी रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या आयातीवर ४० कोटी डॉलर्स खर्च होतात. यावर बंदी घातली तर तो पैसे वाचवता येईल हा जावईशोध सरकारी जावईबाबूंनी लावला. ‘आणि लोकांनी जाब विचारल्यावर काय करायचं?’ या प्रश्नाला सेंद्रिय शेतीची गोळी द्यायचं ठरलं....
(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)
अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.
अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -
अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.