Agriculture Processing Production
Agriculture Processing ProductionAgrowon

Agriculture Processing Production : सिद्धाई ब्रॅंडची उत्पादने पोहोचली राज्यासह अमेरिकेपर्यंत

रत्नागिरी येथील महेश गर्दे यांनी विविध कोकणी मेव्यांपासून तब्बल ६० प्रकारची उत्पादने तयार करून राज्यातील विविध शहरांमध्ये सिद्धाई ब्रॅण्डने त्यास बाजारपेठ मिळवून दिली आहे.

Success Story : रत्नागिरी येथील महेश गर्दे या युवकाने कोकणातील विविध शेतीमालापासून प्रक्रिया उत्पादने (Agriculture processing production) तयार करून त्यांना अल्पावधीतच चांगली बाजारपेठ देण्याचा प्रयत्न केला आहे. महेश यांची ही वाटचाल जाणून घेण्याजोगी आहे.

रत्नागिरी शहरातील जुने आंबा बागायतदार (Mango producer) बबनराव पटवर्धन यांच्याकडे महेश यांचे वडील मोहन यांनी शेती व्यवस्थापनाचे सुमारे ४५ वर्षे काम पाहिले.

महाविद्यालयीन शिक्षण घेताना महेशदेखील पटवर्धन यांच्या हॉटेल-लॉजिंग व्यवस्थापनात मदत करायचे. त्यांची अकाउंटिंग मॅनेजमेंट’ विषयातील फर्मही आहे.

कोरोना काळात मिळालेली संधी

कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय, नोकऱ्या धोक्यात आल्या. यात काळात महेश यांनाही पर्यायी व्यवसायाची चाहूल लागली. अ‍ॅग्रोवनचे वाचक असल्याने शेती प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व ते जाणून होते. शिवाय कोरोना संकटात अनेक पदार्थांची मागणी लक्षात येत होती.

कोकणातील शेतमालावर प्रक्रिया केल्यास मोठ्या प्रमाणात व्यवसाय निर्मिती करता येऊ शकते हे लक्षात आले. त्यानंतर ऑनलाइन प्रशिक्षणांमध्ये सहभाग घेत अभ्यास सुरु केला.

प्रक्रिया निर्मिती, बाजारातील परिस्थिती, ‘मार्केटिंग’ आदींची सविस्तर माहिती घेतली. नाशिक, पुणे येथेही प्रशिक्षण घेतले. कुडाळ भागात प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला.

Agriculture Processing Production
Mahanand Milk : दूधपुरवठ्याअभावी ‘महानंद’ला घरघर

उद्योगाचा श्रीगणेशा

दरम्यान, पंतप्रधान रोजगार सृजन योजनेअंतर्गत २५ लाख रुपयांचा प्रक्रिया उद्योगासाठीचा प्रस्ताव कोकण विदर्भ ग्रामीण बँकेकडे सादर केला. बँकेकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर रत्नागिरीपासून २७ किलोमीटरवरील पोचरी येथे प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.

सन २०२० मध्ये निर्मिती सुरू केली. तत्पूर्वी रत्नागिरी तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांशी संवाद साधून कच्चा माल उपलब्ध होण्याविषयी नियोजन केले. त्यासाठी सामाजिक कार्यातील संपर्क उपयुक्त ठरला.

...असा आहे प्रक्रिया उद्योग

आज ‘सिद्धाई’ ब्रॅण्डने सुमारे ६० प्रकारांची उत्पादने महेश तयार करतात. त्यासाठी ७० टक्के कच्चा माल शेतकऱ्यांकडून घेण्यात येतो. प्रातिनिधीक उत्पादने पुढीलप्रमाणे.

-कोकम- सिरप, आगळ, पावडर, बटर, चटणी.

-आवळा- ज्यूस, लोणचे, मावा, पेठा, सुपारी

-काजू- काजूगर, बोंडांपासून सिरप

-जांभूळ- ज्यूस, पाचक

-लोणची- आंबा गोड व तिखट लोणचे, मिरची लोणचे

-मिरची ठेचा

-लिंबू चटणी

-आंबा- जॅम, आंबापोळी, पल्प

-नाचणीपासून २१ प्रकार- उदा. पीठ, ढोकळा, अप्पे, शेव, पापड, साखरेपासून व साखरेविरहित सत्त्च, पापड आदी.

-फणस पोळी व गरे

-गावठी सांडगी व ताक मिरची

दर्जा व नावीन्यावर भर

आमसुलापासून (कोकम) पावडर आणि बियांच्या तेलावर प्रक्रिया करून बटर बाजारात आणले आहे. त्यास ग्राहकांकडून मागणी आहे. कोकम सरबत तयार केल्यानंतर शिल्लक सालींवर यांत्रिक प्रक्रिया करून पावडर तयार केली जाते.

ती शंभर ग्रॅमच्या पॅकिंगमधून विक्रीस आणली आहे. आमसूल आरोग्याला चांगले असते. मात्र अनेक वेळा ते आवर्जून खाल्ले जातेच असे नाही. त्यासाठी पावडरीचा हा पर्याय वापरला आहे.

रातांब्यातील (आमसूल फळ) बिया फोडून त्यातील अर्क काढला जातो. तो गरम केल्यावर घट्ट होतो. त्याचा त्वचाविकारांसाठी ‘क्रीम’ म्हणून उपयोग करण्याचा प्रयत्न आहे.

फणसाचे गरे

फणसाचे गरे तळून किंवा वाळवून भाजी करण्यासाठी विकले जातात. तळून ठेवल्यास एकाचवेळी विक्री होत नाही. त्यासाठी हे गरे कापून, उन्हात वाळवून व पॅकिंगमध्ये योग्य पद्धतीने साठवून गरजेनुसार बाहेर काढून तळले जातात.

त्यानंतर विक्री केली जाते. लोणची बनविण्यासाठीही टप्प्याटप्प्याने प्रक्रिया करण्याचे तंत्र वापरले आहे.

Agriculture Processing Production
Grape Market : द्राक्षाचे भाव का वाढले नाहीत?

‘पावडर’ निर्मिती

फणसाचे गरे काढल्यानंतर वाया जाणाऱ्या बियांची (आठळा) पावडर तयार केली जाते. याच पद्धतीने जांभळाच्या बियांची पावडर केली जाते. त्याचे औषधी गुण आहेत. दोन्ही पावडरींना बाजारात मागणी आहे.

आश्‍वासक वाटचाल

सुरुवातीला २५ लाख व आजमितीला ५० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. यंत्रामध्ये आवश्‍यक ती सर्व आधुनिक सामग्री आहे. कर्ज मंजूर झाल्यानंतर पहिल्या वर्षी सुमारे ४० टन फळांवर प्रक्रिया करत विविध उत्पादने बाजारात आणली.

पुढील वर्षी म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३६ लाख रुपयांची उलाढाल झाली. यापुढील वर्षात ती एक कोटीपर्यंत नेण्याचे लक्ष निश्‍चित केले आहे.

प्रभावी मार्केटिंग

महेश यांनी ‘सोशल मीडिया चा वापर उत्पादनांच्या विक्री-मार्केटिंगसाठी केला आहे. रत्नागिरी शहरात स्वतःची दोन आऊलेटस उभारली आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आदी शहरांत वितरक नेमले आहेत. गोव्यातही नव्याने वितरक नेमणूक केली आहे.

सिद्धाई ब्रॅण्डने उत्पादने बाजारात आणली असली तरीही त्यावर ‘रत्नागिरीचा स्वाद’ असाही प्रचार केला आहे. व्यवसायात महेश यांना पत्नी विद्या, मित्र उमेश महामुनी, वैशाली महामुनी, अवधूत मुळे यांचे मोलाचे सहकार्य मिळते.

अमेरिकेत निर्यात

गेल्या वर्षी कोकम सिरप, आमरस, आगळ, जांभूळ सिरप आदी पाच उत्पादनांची अमेरिकेतील न्यू जर्सी येथील कंपनीला निर्यात केली आहे. सुमारे तीन ते चार टप्प्यात साडेचार ते पाच टन माल पाठवण्यात महेश यशस्वी झाले आहेत. परदेशात माल पाठविण्यापूर्वी पदार्थांची गुणवत्ता व घटक यांचे परिक्षण होते.

महेश गर्दे, ९४२२००३१२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com