Vineyard Management : द्राक्षातील आरोग्यदायी फेनॉलिक घटक : रेझवेराट्रोल

द्राक्ष झाडांना काही इजा झाली किंवा काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असता वेलीमध्ये रेझवेराट्रोल तयार होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले.
Grape
GrapeAgrowon
Published on
Updated on

डॉ. सचिन एकतपुरे, डॉ. संदीप हिंगमिरे

Vineyard Management: द्राक्षातील काही फेनॉलिक सेंद्रिय रसायने (Organic Component) ही विशेषतः वेली स्वतःचा दुष्काळ किंवा रोगापासून बचाव करण्यासाठी तयार केली जातात. ही सेंद्रिय रसायने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यामध्ये मोलाची भूमिका निभावतात.

त्यापैकी रेझवेराट्रोल हा महत्त्वाचा घटक वेगवेगळ्या बेरीवर्गीय पिकांमध्ये उदा. ब्लूबेरी, रास्पबेरी, ब्लॅकबेरी, तुती, द्राक्षे इ. आढळतो. द्राक्षाची साल, बिया आणि देठामध्ये त्याचे प्रमाण जास्त असते. रेझवेराट्रोलमुळे माणसांचे वजन होतात. त्यांचे जुनाट आजार कमी होण्यास मदत होते.

द्राक्ष झाडांना काही इजा झाली किंवा काही बुरशीजन्य रोगांचा (Grape Fungal Disease) प्रादुर्भाव झाला असता वेलीमध्ये रेझवेराट्रोल तयार होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले. विशेषतः ते रोगप्रतिबंधक म्हणून कार्य करत असल्याने याला याला वनस्पती प्रतिजैविक असेही म्हणतात.

या रेझवेराट्रोलमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे उच्च कोलेस्टेरॉल, कर्करोग, हृदयविकार, मधुमेह, अल्झायमर आणि अन्य काही दुर्धर रोगांवरील उपचारांमध्ये त्याचा वापर केला जातो.

सोबतच त्यातील जिवाणू आणि बुरशी नाशक गुणधर्म हे मूत्र आणि पचनमार्गातील संसर्गावर उपयोगी ठरतात. उपचार करण्यास मदत करतात. रेझवेराट्रोल चे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात.

Grape
Grape Farming : द्राक्ष बागायतदार संघाची शिवार फेरी

रेझवेराट्रोलच्या नियमित सेवनाचे शरीरासाठी फायदे :

१) दाहक विरोधी गुणधर्म - द्राक्षामध्ये आढळणारे फ्लॅव्होनॉइड्स आणि प्रोअँथोसायनिडिन हे रासायनिक घटक जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात. मेंदूशी संबंधित विकार उदा. अल्झायमर, पक्षाघात यामध्ये रेझवेराट्रोल प्रभावीपणे काम करते. नियमितपणे द्राक्षे आहारात असल्यास त्याचा फायदा होतो.

२) कर्करोगावर प्रभावी- द्राक्षांमधील रेझवेराट्रोल हे अँटिऑक्सिडेंट शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यास मदत करते. विशेषतः कर्करोग शरीरातील अन्य भागात पसरू देत नाही.

गॅस्ट्रिक कॅन्सर, स्तनाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, ल्युकेमिया इ. रोगामध्ये त्याचा परिणाम दिसून येतो. द्राक्षांमधील क्वेरसेटीन, अँथोसायनिन्स आणि कॅटेचिन्स या अन्य अँटीऑक्सिडंट्समध्येही कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म आहेत. कर्करोगाच्या वाढीच्या सर्व टप्प्यांवर त्याला रोखण्याचे काम रेझवेराट्रोल करत असल्याचे बऱ्याच अभ्यासातून दिसून आले.

३) हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग- कोलेस्टेरॉल तयार करणाऱ्या प्रथिनांवर हल्ला करून रेझवेराट्रोल रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत करते. त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो.

रेझवेराट्रोलमध्ये रक्ताच्या गाठी होऊ न देणारे घटकही असल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. त्याच बरोबर रक्तदाबही कमी करण्यात फायदेशीर ठरते.

४) डोळ्यांसाठी फायद्याचे - सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे डोळ्याच्या नाजूक पेशींचे नुकसान होऊ शकते. द्राक्षांतील ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन यासारखी संयुगे अतिनील किरणांपासून संरक्षण करतात. सोबत मोबाईलमधून उत्सर्जित होणाऱ्या हानिकारक किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करतात.

५) चिर तारुण्यासाठी मदत - द्राक्ष खाल्ल्याने उत्साह वाढतो. ती नियमित आहारात असल्यास तरुण राहण्यास मदत करतात. रेझवेराट्रोल सर टी१ हा घटक जनुकाला उत्तेजित करतो. तसेच पेशींचे संरक्षण करतो. त्यामुळे रेड वाइन ही तारुण्यासोबत दीर्घायुष्याशी जोडली जाते.

६) मधुमेह : मधुमेहाच्या टाइप-२ प्रकारामध्ये रेझवेराट्रोल शरीरामधील साखर कमी करते. रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते. प्राण्यांवरील अभ्यासामध्ये रेझवेराट्रोल इन्सुलिनला प्रतिरोधकता निर्माण होऊ देत नाही.

रक्तातील साखरेची पातळी कमी करते आणि उच्च रक्तदाब देखील कमी करत असल्याचे दिसून आले आहे. मधुमेही रुग्णांमध्ये रेझवेराट्रोलचा वापर केल्यास ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतात. या तणावामुळे मधुमेहाची गुंतागुंत निर्माण होते.

७) सांधेदुखीसाठी उपयोगी- संधिवाताच्या त्रासामुळे सांध्याचे दुखणे एवढे वाढते की दैनंदिन कामेही करता येत नाहीत. रेझवेराट्रोलच्या नियमित वापरामुळे सांध्यामधील कुर्चा खराब होण्यापासून वाचवता येतो. सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो.

Grape
Grape : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर फसवणुकीची टांगती तलवार

रेझवेराट्रोल वापरासंबधी महत्त्वाचे...

रंगीत आणि हिरव्या दोन्ही द्राक्षांमध्ये रेझवेराट्रोल असले तरी लाल द्राक्षामध्ये (विशेषत: त्यांच्या सालीमध्ये) त्याचे प्रमाण जास्त असते. रेड वाइन पिण्यापेक्षाही नियमितपणे सालीसह द्राक्षे खाल्ल्याने रेझवेराट्रोलचे अधिक फायदे मिळू शकतात.

द्राक्षाच्या नियमित आहारातून रेझवेराट्रोल आपल्याला मिळू शकते. त्याचा भविष्यात हे आजार होऊ नयेत, यासाठी नक्कीच फायदा होतो. मात्र एखाद्या आजारावर उपचार करण्यासाठी द्राक्षातील रेझवेराट्रोल वेगळे करून त्यापासून विविध औषधे विकसित करण्यात आली आहेत.

मात्र त्याचा वापर आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नये. रेझवेराट्रोलच्या अति वापरामुळे जखम किंवा शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव न थांबण्याची समस्या उद्भवू शकते. हे लक्षात ठेवावे.

डॉ. सचिन एकतपुरे, ९८९०२७३३३० (लेखक भारतीय कृषी अनुसंधान परिषद-राष्ट्रीय द्राक्षं संशोधन केंद्र, मांजरी, पुणे येथे संशोधन सहाय्यक या पदावर कार्यरत आहे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com