Sangli Grape News : द्राक्ष हंगामाच्या (Grape Season) सुरुवातीलाच मणेराजुरी येथील शेतकऱ्यांची द्राक्ष व्यापाऱ्याकडून सुमारे ४० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे.
त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शासनाकडूनही अशा फसवणुकीबाबत धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरवर्षीच्या द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक हे समीकरणच झाले आहे. यावर्षी तर हंगामाच्या पहिल्या महिन्यातच ४० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. द्राक्ष हे नाशवंत पीक आहे.
ते वेळेवर काढून बाजारात पोहचणे गरजेचे असते. त्याचाच गैरफायदा घेऊन दरवर्षी व्यापारी कोट्यवधीचा गंडा शेतकऱ्यांना घालत असल्याची स्थिती आहे.
एकीकडे दरवर्षीच्या फसवणुकीचे प्रकार थांबत नाहीत आणि दुसरीकडे शेतकरी कोणतीही काळजी न घेता द्राक्ष व्यापाऱ्यांना द्राक्षे देताना दिसत आहेत.
वास्तविक द्राक्षे व्यापाऱ्यांचे पूर्ण नाव गाव माहीत असणे अपेक्षित आहे. मात्र, तसे दिसत नाही. व्यापाऱ्याचा मध्यस्थ म्हणून स्थानिक दलाल काम करतो. त्याच्यावर विश्वास ठेवून शेतकरी द्राक्ष देतात आणि नंतर तो मध्यस्थ दलाल ही हात वर करून रिकामा होतो.
आतापर्यंत अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. शेतकऱ्यांचे प्रबोधन अपेक्षित आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर यांनी बांधावर जाऊन गावोगावी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला होता.
तशा पद्धतीचे प्रबोधन कृषी विभाग, पोलिस, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे.
भाकरीच हिरावली जातेय
दुर्दैवाने फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची दाद शेवटपर्यंत लागत नाही. केवळ पोलिसांकडे कागदोपत्री फसवणुकीची नोंद एवढेच शेतकऱ्यांच्या वाटणीला येते.
अनेक शेतकऱ्यांची भाकरीच यातून हिरावली जाते. गेल्या वर्षी तर पाच कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गंडा शेतकऱ्यांना बसला होता. हे दुष्टचक्र आणखी किती वर्षे चालणार? हा प्रश्नच आहे.
प्रबोधन, जनजागृती हवी
अनेक वर्षांपासून द्राक्ष बागायतदारांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत आहे. मात्र त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये प्रबोधन आणि जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.