Grape Harvesting Management : द्राक्ष काढणीनंतर विश्रांतीच्या काळात बागेकडे दुर्लक्ष नको

द्राक्ष काढणीनंतर बागेमध्ये सध्या विश्रांतीचा काळ सुरू होत आहे. मात्र अनेक बागायतदार विश्रांतीच्या काळामध्ये बागेकडे चक्क दुर्लक्ष करतात. त्याचा फटका त्यांना पुढील हंगामात बसतो. द्राक्ष उत्पादन चक्रामध्ये हा विश्रांतीचा काळ महत्त्वाचा असून, या काळात मिळवलेल्या ऊर्जेवरच पुढील हंगामातील यश अवलंबून असेल.
Grape Harvesting
Grape HarvestingAgrowon

डॉ. एस. डी. रामटेके, शरद भागवत, आप्पासो गवळी

Grape Orchard Management : सद्यःस्थितीत बऱ्याचशा बागांमध्ये द्राक्ष काढणी (Grape Harvesting) झालेली आहे किंवा काढणी होऊन खरडछाटणीच्या परिस्थितीत आहेत. भारतामधील द्राक्ष वाढीचे चक्र लक्षात घेता आपल्याकडे दोन वेळेस छाटणी घेण्याची पद्धती आहे. ज्यांनी फळछाटणी लवकर घेतली असेल, त्यांच्याकडे काढणी झालेली असेल.

आता खरड छाटणीसुद्धा तितक्याच लवकर होणे आवश्यक आहे. ज्या बागेत एवढ्यातच फळछाटणी झाली असेल अशा ठिकाणी विश्रांती देणे गरजेचे आहे. द्राक्ष काढणीनंतर एप्रिल खरडछाटणीपर्यंतचा विश्रांतीचा कालावधी द्राक्ष उत्पादन चक्रामध्ये महत्त्वाचा आहे.

मागील वर्षाच्या उत्पादनामध्ये वेलीच्य क्रयशक्तीचा झालेला व्यय आणि द्राक्ष वेलींची सतत वाढ चालू राहणे या प्रक्रियेमध्ये वेलीस नैसर्गिक विश्रांती मिळू शकत नाही. दोन वेळची छाटणी व अधून मधून सबकेन, विरळणी याद्वारे नाहीसे होणारे अन्नघटक, उत्पादनात नाहीसे होणारे अन्नघटक व त्याद्वारे खर्ची झालेले वेलीची शक्ती विचारात घेता काढणीनंतर वेलीस विश्रांती देणे अत्यंत आवश्यक आहे.

विश्रांतीचा कालावधी ३० ते ४० दिवसांचा असावा. मात्र द्राक्ष काढणीनंतर वेलीस विश्रांती देणे म्हणजे वेलीस ताण देणे नाही, ही बाब समजून घेणे गरजेचे आहे.

काही शेतकरी बागेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. वेलीच्या विश्रांतीच्या काळातही बागेची पूर्ण निगा राखली तरच वेलीची आजवर खर्ची पडलेली ऊर्जा शक्ती भरून येईल. विश्रांतीच्या कालावधीमध्ये पुढील गोष्टींवर लक्ष देणे महत्त्वाचे ठरते.

Grape Harvesting
Grape Export : सांगलीतून १६ हजार टन द्राक्षाची निर्यात

१. द्राक्ष काढणीनंतर वेलींचे पोषण व्यवस्थापन :

विश्रांतीच्या कालावधीमध्ये वेलीचे पोषण व्यवस्थापन करावे. म्हणजे वेलीची झीज भरून निघते. तसेच वेलीमधील अन्नद्रव्ये वाढण्यास मदत होते. खरडछाटणीनंतर बाग फुटण्यास मदत होईल. विश्रांतीच्या कालावधीत द्राक्ष काढल्यानंतर एकूण खतमात्रेपैकी दहा टक्के खतमात्रा बागेस द्यावी.

बोद फोडून शेणखत आणि शिफारशीनुसार रासायनिक खतांचा वापर करावा. रासायनिक खतांमध्ये प्रति एकरी २६.६ किलो नत्र, ३५.५ किलो स्फुरद व २६.६ किलो पालाश यांचा अंतर्भाव असावा.

२. द्राक्ष काढणीनंतर पाणी देणे :

बऱ्याच वेळा विश्रांतीच्या कालावधीमध्ये द्राक्ष बागायतदार पाणी देण्याचे थांबवतात, त्यामुळे वेलीला ताण पडू शकतो. द्राक्ष काढणीनंतर बागेस पाणी चालू ठेवणे आवश्यक आहे. उत्पादन पक्वतेच्या काळात वेलीतील पांढऱ्या मुळांची वाढ कमी कमी होत जाऊन पूर्णपणे थांबलेली असते. विश्रांतीच्या कालावधीमध्ये पाणी दिल्यास पांढऱ्या मुळ्यांची वाढ भरपूर होण्यास मदत होईल.

३. फवारणी :

मागील हंगामातील झालेला रोग व किडींचा प्रादुर्भावाचा विचार करता त्यांच्या व्यवस्थापनाकडे आतापासून लक्ष दिल्यास पुढील हंगामातील फवारण्यांची संख्या कमी करता येऊ शकते. कारण मागील हंगामातील जिवाणू, बुरशींचे बीजाणू किंवा किडींच्या वेगवेगळ्या सुप्तावस्था बागेत असू शकतात.

द्राक्ष काढणीनंतर गेल्या हंगामात ज्या कीड किंवा रोगाचा अधिक प्रादुर्भाव होता, त्याच्या सुप्तावस्था नष्ट करण्यासाठी योग्य त्या शिफारशीत बुरशीनाशक व कीटकनाशक यांची एक फवारणी पूर्ण झाड ओले होईपर्यंत घ्यावी.

४. आंतरमशागत :

वेलीच्या ओळींमधील जागा किंवा बोद वर्षभरातील कामामुळे पूर्णपणे कठीण किंवा घट्ट झालेला असतो. अशा घट्ट मातीमध्ये मुळांची वाढ होण्यात अडचणी येतात. त्यामुळे येथील माती व घट्ट झालेले बोद तीन-चार इंच खणून मोकळी करून घेणे गरजेचे असते.

ओळीमधील जागा किंवा बोद या ठिकाणी ट्रॅक्टरची अवजारे पोहोचत नाहीत. अशा ठिकाणी मजुराच्या साह्याने काम करावे लागते. मात्र जुनी मुळे काही प्रमाणात तुटल्यामुळे नवीन मुळांच्या वाढीस मदत होते. बोदामध्ये हवा खेळती राहून नवीन मुळांच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते. अशा प्रकारे माती मोकळे केल्याचा फायदा एक महिन्यानंतर निश्‍चितच बागेत दिसून येतो.

५. विश्रांतीच्या काळातील तपासणी :

मागील उत्पादन काळात आपल्या बागेमध्ये कोणत्या अडचणी, समस्या आल्या? आपल्याकडून कोणत्या चुका घडल्या? यांची माहिती व नोंदी करण्याचे काम विश्रांती काळात जरूर करावे. म्हणजे एप्रिल छाटणीच्या सुरुवातीपासूनच पूर्वी झालेल्या व्यवस्थापनातील चुका सुधारता येतात.

त्याच प्रमाणे विश्रांती काळात वेलीचे निरीक्षण करून त्यांच्या आधार पक्के करून घ्यावेत. खराब झालेले ओलांडे काढावेत. त्यामुळे छाटणीनंतर काड्यांना योग्य प्रकारे वळण देता येते. विश्रांती काळात मातीचे नमुने तपासून घ्यावेत. त्याच्या निष्कर्षानुसार माती सुधारणा, खतमात्रा यांचे नियोजन करता येते.

६. छाटणीच्या वेळेचे तापमान :

एप्रिल छाटणी करतेवेळी तापमान मुख्यतः उष्ण व कोरडे असते. तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असताना फुटीस कारणीभूत संप्रेरकांचे विघटन व ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे छाटणीनंतर फुटी निघण्यास चालना मिळत नाही. उष्णतेमुळे डोळ्यांतर्गत उत्सर्जनाची व श्‍वसनाची क्रिया खूप वेगाने होत असते.

उपलब्ध अन्नसाठ्याचा वापरही वनस्पतीला करणे शक्य होत नाही. ताणाची स्थिती निर्माण होऊन ॲबसिसीक ॲसिडची निर्मिती होते. या आम्लाच्या प्रभावामुळे डोळे सुप्तावस्थेत जातात. त्यामुळे डोळे उशिरापर्यंत न फुटणे, डोळ्यांची मर किंवा उन्हाने ओलांडे तडकण्याचे प्रमाण वाढीस लागते.

काही प्रयोगांमधून एप्रिल छाटणीनंतर ज्या ओळींमध्ये शेडनेट वापरून सावली केली होती, अशा ठिकाणी फूट लवकर व चांगली निघाल्याचे दिसून आले. या फुटींची नंतरची वाढदेखील चांगली होती. शक्य असल्यास बागेमध्ये छाटणीनंतर २१ ते ३० दिवसांपर्यंत ५० टक्के शेडनेट वापरावे.

काही द्राक्ष बागायतदार घडाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कापडांचा साड्यांचा वापर करत आहेत. ही सावली छाटणीनंतरही काही कालावधीपर्यंत ठेवल्यास त्याचा एप्रिल छाटणीनंतरच्या फुटींसाठी चांगला उपयोग होईल.

Grape Harvesting
Grape Cultivation: द्राक्षाची गोडी वाढवण्यासाठी शासनाने काय करायला हवं?

७. संजीवकांचा वापर :

हायड्रोजन सायनामाइडच्या द्रावणाचा वापर डोळ्यांची सुप्तावस्था मोडण्यासाठी केला जातो. एप्रिल छाटणीनंतर हायड्रोजन सायनामाइडचा वापर केला असता एकसारखी फूट निघण्यास मदत होते. मात्र सध्या असलेली प्रचंड उष्णतेचा ताण वेलीवर मुळातच अधिक आहे, अशा स्थितीमध्ये हायड्रोजन सायनामाईडचा वापर करण्याची फारशी आवश्यकता नाही.

मात्र हवामानातील बदलानुसार ज्यांना हायड्रोजन सायनामाइडची गरज वाटते, त्यांनी २० ते ३० मिलि प्रति लिटर या प्रमाणात त्याचा पेस्टिंगसाठी वापर करावा. याच्या वापरामुळे विघटनाने तयार होणारे युरिक आम्ल वेलीमधील ॲबसिसिक ॲसिडच्या प्रमाणावर नियंत्रण आणते. डोळ्यांची सुप्तावस्था मोडते.

अर्थात, पेस्टिंग केल्यावर देखील चांगली फूट निघण्यासाठी वर वर्णन केलेले अन्य घटकही सामान्य असावे लागतात. पाणी व खतांच्या योग्य नियोजनाद्वारे निर्माण होणारा वेलींच्या अंतर्गत शक्ती फूट निघण्यासाठी कार्यान्वित झाली तरच केलेल्या पेस्टिंगसाठी पूरक ठरते.

त्याचा परिणाम म्हणून छाटणीनंतर एकसारखी व चांगली फूट निघते. म्हणूनच विश्रांती काळातही बागेतील नियोजन योग्य प्रकारे केले पाहिजे. अन्यथा, वेली उशिरा किंवा एक सारख्या न फुटण्याची समस्या उद्‍भवू शकते.

डॉ. एस. डी. रामटेके, ९४२२३१३१६६,(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी जि. पुणे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com