Global Warming : जागतिक तापमान वाढ कमी करणे शेतकऱ्यांच्या हातात

Soil Health : भू-सूक्ष्मजीवशास्त्र सांगते, की कुजविण्याची क्रिया जमिनीबाहेर करणे चुकीचे. ती थेट जमिनीतच झाली पाहिजे. कुजविणे जितके दीर्घकाळ चालू राहील तितके सुपीकतेसाठी जास्त चांगले असते.
Global Warming
Global WarmingAgrowon
Published on
Updated on

प्रताप चिपळूणकर

Geo-Microbiology : भू-सूक्ष्मजीवशास्त्र सांगते, की कुजविण्याची क्रिया जमिनीबाहेर करणे चुकीचे. ती थेट जमिनीतच झाली पाहिजे. कुजविणे जितके दीर्घकाळ चालू राहील तितके सुपीकतेसाठी जास्त चांगले असते. या नियमांचे पालन करून आपण शेती करण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये ‘हवामान बदलाच्या स्थितीत शाश्‍वत शेती संशोधन’ या विषयावर परिषद झाली. या परिषदेला कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, कुलगुरू आदी मंडळी उपस्थित होती. या चर्चेत जागतिक तापमान वाढ कशी कमी करता येईल हा एक प्रमुख अभ्यासाचा विषय होता.

खनिज तेलाच्या ज्वलनामुळे प्रामुख्याने तापमान वाढ होत आहे असे सर्वांचे मत आहे. हे आपण कमी करू शकत नाही; वाढतच जाणार आहे. मात्र शेती करण्याच्या पद्धतीत बदल करून यावर शेतकरी काही प्रमाणात नियंत्रण आणू शकतील, असे एका शास्त्रज्ञाचे मत होते. हवेतील कर्बवायूचे प्रमाण वाढल्याने तापमान वाढ होते.

निसर्गात कर्बवायूचे वितरण (आकडे १० ९ (दहावर नऊ पूज्य या परिमाणात)
१) हवा ---७००
२) जमिनीवरील सजीव मृत----७००
जिवंत--- ४५०
३) खनिज तेल साठे---१०,०००
४) समुद्राचे पाणी---३५,०००
५) समुद्रातील सजीव---मृत---३०००
जिवंत--- १०
६) समुद्र तळातील गाळ----२,००,००,०००

Global Warming
Global Warming : जागतिक तापमानवाढीचा परिणाम ; आर्क्टिक महासागरातील बर्फ वितळतोय वेगाने

समुद्रावर आपले नियंत्रण नाही. जमिनीवर आपण नियंत्रण करू शकतो. वरील चौकटीमध्ये हवेच्या तुलनेत जमिनीत कर्बाचे प्रमाण १=१.६ दाखविले आहे ते हवेच्या तीन पट हवे. ते आपण १=३ करू शकलो, तर आपण शेतकरी जागतिक तापमान वाढ नियंत्रणात आणू शकतो. जंगल तोड, पूर्वमशागत, बागायत करणे, रासायनिक खत वापर, भरपूर उत्पादन घेणे, शेणखत, कंपोस्टचा वापर ही सेंद्रिय कर्ब कमी होण्यामागील कारणे आहेत. एखादे पीक वाढविण्यासाठी जमिनीतील सूक्ष्मजीवांना मोठ्या प्रमाणात काम करावे लागते.

या कामापोटी त्यांच्याकडून सेंद्रिय कर्बाचा वापर होऊन तो संपत जातो. ज्या प्रमाणात तो संपतो त्या प्रमाणात शेतकरी जमिनीला परत देत नाही. यांत्रिकीकरणानंतर सेंद्रिय कर्ब संपण्याचा वेग वाढला आणि जमिनीला परत देण्याचा वेग कमी कमी होत गेला. हरितक्रांतीनंतर १५ ते २० वर्षांत उत्पादन पातळी घटत चालली. याला कारण जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होणे. आपल्याला तो परत १ = ३ या गुणोत्तराकडे नेण्याचा आहे.

जमिनीतील सेंद्रिय कर्ब ः
जमिनीमध्ये संपून जाणारा आणि टिकून राहणारा असे दोन प्रकारचे सेंद्रिय कर्ब असतात. जमिनीच्या वरील भागापासून संपून जाणारा सेंद्रिय कर्ब तयार होतो. जमिनीच्या खालील भागापासून टिकून राहणारा सेंद्रिय कर्ब तयार होतो. आजपर्यंत आपण केवळ संपून जाणारा सेंद्रिय कर्ब (शेणखत, कंपोस्ट) तयार करीत आहोत आणि वापरत आलो आहोत.

जमिनीखालील अवशेष म्हणजे धसकटे, जळण किंवा कचरा. शास्त्र असे सांगते, की तुम्ही कितीही शेणखत, कंपोस्ट जमिनीत मिसळा ते चार महिन्यांच्या एका हंगामी पिकाअखेर संपून जाते. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी कशी टिकून राहणार?

उष्ण कटिबंधासाठी सेंद्रिय खत व्यवस्थापन
वर्षातील जास्त काळ तापमान उष्ण असल्याने पिकाच्या वाढीबरोबर जादा उष्णतेमुळे सेंद्रिय कर्बाचे विघटन होऊन तो संपून जातो. हा नियम चांगले कुजलेल्या खतासाठी आहे; कुजणाऱ्या पदार्थांसाठी नाही. अशा परिस्थितीत आपण चांगले कुजलेले खत न वापरता कुजणारा पदार्थ वापरणे जास्त चांगले.


भू-सूक्ष्मजीवशास्त्र सांगते, की कुजविण्याची क्रिया जमिनीबाहेर करणे चुकीचे. ती थेट जमिनीतच झाली पाहिजे. कुजविणे जितके दीर्घकाळ चालू राहील तितके सुपिकतेसाठी जास्त चांगले. या नियमांचे पालन करून आपण शेती करण्याच्या पद्धतीत बदल करावयाचे आहेत. असे बदलाचे प्रयोग मी मागील ३३ वर्षांपासून माझ्या शेतावर करीत आहे. त्यातील काही निरीक्षणे जमीन सुपीकतेसाठी महत्त्वाची आहेत.

१) चांगले कुजलेले खत सर्व जमिनीला देणे अशक्य आहे. सर्व जमिनीसाठी कुजणारा पदार्थ गोळा करून वापरणेही अशक्य आहे. यातून जागेला फुकटात उपलब्ध होणारे मागील पिकांचे अवशेष हाच पुढील पिकांसाठी सेंद्रिय खत देणारा पदार्थ.
२) जमिनीवरील भाग कुजवून मला उत्पादन वाढ मिळाली नाही. मग जमिनीखालील भाग कुजविण्याचा निर्णय झाला. ते कसे कुजविणे शक्य आहे यावर चिंतन करता विना नांगरणी अगर पूर्वमशागत न करता पुढील पिकाच्या पेरणीचा निर्णय झाला. या प्रयोगात मात्र उत्पादनात एकदम ५० टक्के वाढ मिळाली. केवळ एकाच वर्षात जमीन ३५ वर्षांपूर्वीप्रमाणे उत्पादन देऊ लागली. यामागील कारणांचा शोध घेतला असता जमिनीखालील अवशेषांमुळे मिळणारा सेंद्रिय कर्ब पुढे दोन पिकांच्या ओळीतील तण मुख्य पिकाला त्रास होणार नाही असे वाढवून जागेलाच तणनाशकाने मारून स्थिर कर्बाला संपणाऱ्या कर्बाची जोड दिली. जमिनीची सुपीकता दरसाल वाढत गेली अगर टिकून राहिली. यासाठी शेतकऱ्यावर अगर सरकारवर एक पैशाचाही बोजा नाही. या मार्गाने शेतीत शाश्‍वतता आणणे शक्य आहे. सर्व खर्च कमी व उत्पादन जास्त. प्रचलित शेतीचे गणित नेमके याउलट आहे.

३) पूर्वमशागत बंद झाल्याने प्रतिवर्ष १२५ ते १५० लिटर डिझेल जाळणे बंद. खनिज तेल ज्वलनातून होणारे कर्बाचे उत्सर्जन बंद अगर कमी. जमिनीत कर्ब साठत गेल्याने हवेतील कर्बाचे प्रमाण कमी करणे शक्य. एका शास्त्रज्ञाने म्हटले आहे, की असे सर्व शेतजमिनीत कर्बाचे स्थिरीकरण करणे चालू केल्यास साठत जाणारा कर्ब खनिज तेलाच्या ज्वलनामुळे बाहेर पडणाऱ्या, हवेत मिसळणाऱ्या कर्बापेक्षा कित्येक पटीने जास्त असेल. या तंत्राच्या वापराने शेतकरी जागतिक तापमान वाढ नियंत्रणात आणू शकेल. या तंत्रावर चारही कृषी विद्यापीठांत शास्त्रोक्त पद्धतीने प्रयोग होणे गरजेचे वाटते, तरच या तंत्राचे योग्य मूल्यमापन होईल.
४) विना नांगरणी शेती तंत्राचा वापर बागायतीइतकाच कोरडवाहू शेतीलाही होऊ शकतो. हे मी अनुभवातून सांगू इच्छितो. या तंत्राचा जमिनीला, पिकाला, शेतकऱ्याला, पर्यावरणाला व राष्ट्राला सर्वांनाच फायदा होणार आहे.

संपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८
(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com