Rabbi Sowing : शेतीत निवांतपणा कधी अनुभवता येणार ?

उन्हामुळे जमीन तळणं गरजेचं होतं,ते ही होत नव्हतं.मी सुरूवातीला असं म्हटलं की, रब्बी अजिबात पेरायची नाही.विहीर गच्च भरलेली,शेततळं भरलेलं.नरेश अस्वस्थ होता.
Rabbi Jowar
Rabbi Jowar Agrowon

परवा सायंकाळी लातुरला जाताना मी नरेशला म्हटलं,मला गृहीत धरून तू शेतीतील नियोजन करू नकोस.मी इथं असेन,माझा मुड असेल तर मी मदत करेन. पण मदत करेनच असं नाही. तुझं नियोजन तू लाव....तो म्हणाला,हो..मामा.

नरेश शिंदेला आम्ही पगार देतो, म्हणून तो नोकरीला आहे असं म्हणायचं.बाकी त्याला आम्ही कुटुंबातील सदस्यच मानतो.त्याची बायको अनिता हिला आम्ही मुलगी मानतो.गबरू,अन्वी यांना नातवंडाचाच दर्जा आहे.हे सगळं कृतीतून आहे.आमच्या शेतीचं सगळं भवितव्य नरेशवर आहे.याची त्यालाही जाणीव आहे. त्याच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडू नये याबाबत मी सजग असतो.

गेल्या पाच-सहा वर्षांपासून रब्बीला आठ-दहा एकरवर आम्ही ज्वारी पेरत होतो.त्याला पाणी देणं,कोळपणी याचा ताण पडू लागला.जनावरांचा चारा हाच यामागचा उद्देश होता.यातून फारसं उत्पन्न होत नव्हतंच.पण कामाचा ताण पडू लागला.शिवाय दोन पिक घेतल्याने जमिनीला विश्रांतीही मिळत नव्हती.

आधीचं हलकी जमीन,त्यात दोन पिकं हे अन्यायकारक होतं.यावर्षी सगळी गाई,म्हशी,वासरं मिळून अकराजण आहेत. त्यामुळं चाऱ्याची निकड संपली.शिवाय उन्हामुळे जमीन तळणं गरजेचं होतं,ते ही होत नव्हतं.मी सुरूवातीला असं म्हटलं की, रब्बी अजिबात पेरायची नाही.विहीर गच्च भरलेली,शेततळं भरलेलं.नरेश अस्वस्थ होता.

तो बोलला,मामा एवढं पाणी आहे,त्याचं काय करायचं? मी म्हटलं,शेतात पाणी असलं की छान वाटतयं....गेल्या सात -आठ वर्षांपासून आपण घरच्या जोंधळ्याची भाकरी खातोय...ती ज्वारी पण विकत घ्यायची का?मी म्हटलं,ठीक आहे.आपल्या गोठ्यालगतच्या एक एकरवर ज्वारी पेर.त्याने त्या रानाला पाळी घातली.रोटर करून घेतलं.ज्वारी पेरून लगेच स्प्रिंकलरने पाणी दिलं.आज ती ज्वारी कुठं कुठं दिसतेय.दोन दिवसात सगळी बाहेर येईल.

Rabbi Jowar
Animal Care : दुध उत्पादनवाढीसाठी बायपास फॅट

पाणी तर भरपूर आहे...आणखी काय पेरायचं?...मी सांगीतलं,उत्पन्नाचं , आपल्यासाठी काही पेरायचं नाही.पाण्याचा वापर जमिनीचा कस वाढविण्यासाठी करायचा. आता जमिनीला थोडं खायला द्यायचं...! मग बरू पेरावा असावा निर्णय झाला.ते बियाणे मिळेना.बरूसारखंच धैंचा नावाचं हिरवळीचं पिक घ्यायचं असं ठरलं.बरूची अनेकांकडं चौकशी केली होती.मित्र बाबासाहेब कोरे यांचे सुपूत्र कुणाल कोरे या़च्यामुळं दिड क्विंटल ( ८०रूपये किलो) बियाणे मिळालं.

परवा कारमध्ये ते घेऊन आलो.काल नरेशने बाहेरून रोटावेटर मागवून चार एकर रोटर करून घेतलं.आज सकाळी त्याची पेरणीची लगबग सुरू होती.दुसरा सालगडी काल त्याच्या गावाकडं गेलाय. साडे-अकरा वाजता नरेशचा मला फोन आला...मामा फक्त पाच मिनीटं वावराकडं या..बी नीट पडतयं की नाही ते पाहा...

मी नुकताच प्रुफं तपासत बसलो होतो.उठून वावरात गेलो.त्यानं पेरणी सुरू केली.व्यवस्थित बी पडत होतं..मी परत निघणार इतक्यात लक्षात आलं,वावरात तीन ठिकाणी दहा-बारा दगडांचे ढीग आहेत.ते बाहेर काढले नाहीत तर,पेरणीला अडचण होती.हे दगड पुन्हा पसरले असते.दोघांनी मिळून दगड बाहेर टाकले...

मी परत येऊन काम सुरू केलं.अर्ध्या तासाच्या आत पुन्हा फोन आला...शेळीवाल्यानं दहा-बारा शेळ्या गवताच्या रानात सोडल्यात...माझं ऐकत नाहीय.. पुन्हा उठलो.शेळीवाल्याला अंदाज आला असावा.मी जाईपर्यंत शेळ्या वावराबाहेर आल्या होत्या.मी काही बोलण्याच्या आतच तो खुलासा करू लागला....

वावरात औषध हुडकत होतो... त्यामुळं शेळ्या आल्या..मी त्याच्याकडं फक्त बघितलं आणि परत फिरलो.. पुन्हा मी बसलोय..

आणखी तासाभरात नरेशचा नक्की फोन येणार....मामा..तेवढे पायपं जोडून पाणी चालू केलं की निवांत होतयं बघा...

मी म्हटलं,या शेतात निवांतपण असं नाही रं बाबा... एकापाठोपाठ एक कामं भुतासारखी मानगुटीवर बसतात..इथं राहून त्यांच्यापासून सुटका करून घेणं महाकठीण!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com