जनावरांचा नैसर्गिक आहार हिरवे गवत (Green Fodder) हा आहे. परंतु दुभत्या जनावरांना अधिक ऊर्जा मिळावी व दूध उत्पादन (Milk Production) वाढावे, म्हणून काही शेतकरी जनावरांना तेलासारखे स्निग्ध पदार्थ (फॅट) (Fat) देतात. त्यामुळे फक्त वनस्पतीजन्य पदार्थ पचवू शकणारे ओटीपोटातील असंख्य जिवाणू मरतात. त्याचा विपरीत परिणाम जनावरांच्या पचनशक्तीवर होतो. हे टाळण्यासाठी स्निग्ध पदार्थ देण्यापूर्वी त्यावर विशिष्ट अशा क्षारांचे आवरण तयार करण्याची पद्धती वापरली जाते. त्याला ‘बायपास फॅट’ (Bipass Fat) असे म्हणतात. या बायपास फॅटमुळे जनावरांच्या दुधामध्ये ७ ते २० टक्क्यांनी वाढ होत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. अशा प्रकारचे बायपास फॅट परदेशामध्ये अनेक वर्षांपासून वापरले जाते.
बायपास फॅट म्हणजे काय?
- कृत्रिमरीत्या वनस्पतीजन्य तेलाचे किंवा चरबीचे विघटन केले जाते. त्यांच्या कणांवर विशिष्ट प्रकारच्या क्षाराचे आवरण तयार केले जाते. या क्षाराच्या आवरणामुळे ओटीपोटातील जिवाणूंना अपाय न होता स्निग्ध पदार्थ पुढे आतड्यात पाठवले जातात. आतड्यामध्ये आवरणाचे विघटन होऊन या चरबीचे पचन होते. हे आवरण केलेले फॅट म्हणजेच "बायपास फॅट' होय.
- यामुळे जनावरांना त्वरित उपलब्ध अशा ऊर्जेचा स्रोत म्हणून बायपास फॅट उपयुक्त ठरतील. जनावरांच्या नैसर्गिक आहारातील ऊर्जेची पूर्तता होण्यास मदत होऊ शकते.
- या नव्या पद्धतीमध्ये वनस्पतीजन्य तेल, पाम, फॅटी ॲसिड यांचा वापर करून बायपास फॅट तयार करणे शक्य आहे.
दूध उत्पादनवाढीसाठी होऊ शकतो फायदा
- दुभत्या जनावरांना प्रतिदिन १५ ते २० ग्रॅम (दुधाच्या क्षमतेनुसार वाढवताही येईल) बायपास फॅट दिल्यास दुधाच्या उत्पादनात ७ ते २० टक्के वाढ होते. त्यातून शेतकऱ्यांना प्रतिदिन प्रतिगाय १२ ते ४० रुपये अधिक फायदा होऊ शकतो.
- बायपास फॅट वापरामुळे जनावरांची प्रजनन क्षमता सुधारते. त्याचप्रमाणे जनावरांच्या आरोग्यात सुधारणा होते. अत्यंत कमी प्रमाणात बायपास फॅट वापरावे लागते.
- कमी खर्चामध्ये दूध उत्पादन वाढल्याने दुग्धउत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल.
बायपास फॅट कसे कार्य करते?
गायी-म्हशींना दिले जाणारे खाद्य, चारा यांसारख्या घटकांचे पचन करण्याचे काम कोठीपोटात लाखोंच्या संख्येने असलेले सूक्ष्म जीवाणू करत असतात.
त्यामुळे चांगल्या प्रकारची प्रथिने, स्निग्ध पदार्थ जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायीं म्हशींना लगेचच उपलब्ध होत नाहीत, म्हणूनच बायपास फॅटचे संतुलित पशु आहारात महत्व जास्त आहे. कारण ते थेट आतड्यांमध्ये पचनासाठी उपलब्ध होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.