Fertilizers : युरियाचा योग्य वापर आवश्यक...

संतुलित प्रमाणात नत्र:स्फुरद:पालाश वापर करणे गरजेचे आहे. दीर्घ मुदतीच्या पिकांना युरिया खताची मात्रा विभागून द्यावी. नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करावा.
Fertilizers Use
Fertilizers UseAgrowon
Published on
Updated on

नत्रयुक्त रासायनिक खतामध्ये (Chemical Fertilizers) युरियाचा (Urea) वापर सर्वाधिक जास्त वापर केला जातो. अमोनिअम व कॅल्शिअम नायट्रेटचा वापर फक्त दोन टक्के शेतकरी करतात. युरिया खतामुळे पिकांना नत्राची मात्रा तत्काळ लागू पडते. पिकाची वाढ जोमाने होते. पिकांमध्ये हिरवा गडद रंग निर्माण होतो. इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत कमी असते. ठिबकच्या माध्यमातून देता येते. काही प्रमाणात फवारणीद्वारे देता येतो. पिकांना विभागून देण्यास योग्य असल्यामुळे शेतकरी युरिया खत वापरास अधिक पसंती देतात. सर्वसाधारणपणे नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांच्या गुणोत्तर हे ४:२:१ चांगले समजण्यात येते. संतुलित प्रमाणात नत्र:स्फुरद:पालाश वापर करणे गरजेचे आहे. तृणधान्य पिकांना नत्राची गरज असते. तृणधान्यासाठी २:१:१ नत्र:स्फुरद:पालाश गुणोत्तर असावे. कडधान्यांसाठी १:२:१ नत्र:स्फुरद:पालाश गुणोत्तर असावे.

Fertilizers Use
Paddy : भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापन

युरिया खताचे गुणधर्म ः
- युरिया हे कृत्रिम सेंद्रिय नत्रयुक्त खत आहे. यामध्ये ४६ टक्के अमाइड नत्र असते.
- खत पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असते. खत आम्लधर्मीय आहे.
- युरियामध्ये २०.६ टक्के ऑक्सिजन,२० टक्के कार्बन, ७ टक्के हायड्रोजन आणि १ ते १.५ टक्का बाययुरेट हे उपघटक असतात.
- दमट हवामानात आद्रता शोधून घेतल्यामुळे खताचे खडे होतात. अन्य ‍खतांत मिसळताना पाणी सुटणार नाही याची खात्री घ्यावी.
- नत्राचे अमाइड रूपांतर युरीयेज विकारामुळे अमोनियात होऊन नंतर ते नाइट्रेट स्वरूपात होते.

युरियाचा काटेकोर वापर आवश्यक ः
१) केवळ नत्रयुक्त खतांचा वापर केला तर पिकांची फक्त शाकीय वाढ होते.
२) रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उत्पादनात घट येते.
३) पिकांमध्ये लुसलुशीतपणा राहून खोड नाजूक राहते, पीक लोळते. पिकांचा कालावधी वाढतो.
४) युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील कर्ब:नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जिवाणूंची संख्या कमी होते.
५) पालाश, कॅल्शिअम, बोरॉन आणि तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता भासते.
६) जमिनीमध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रोबॅक्टरसारख्या जिवाणूच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
७) गांडुळांच्या संख्येवर परिणाम होतो. जमिनीच्या जडणघडणीवर परिणाम होतो.
८) युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते (१० पीपीएम), जलचर प्राण्यांची हानी होते. पाण्यातील शेवाळ आणि पानवनस्पतींची वाढ होते.
९) युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे हवेचे प्रदूषण होते. युरियातील अमाइड नत्राचे रूपांतर अमोनिया आणि नायट्रेटमध्ये होते. नायट्रस ऑक्साइड, नायट्रिक ऑक्साइड यासारखे नत्राचे वायू हवेचे प्रदूषण वाढवतात.हे वायू ३०० पटीने कार्बन डायऑक्साइडपेक्षा घातक आहे.
१०) पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन वायूच्या स्तरास छिद्रे पडून, सूर्यापासून तयार झालेली अतिनील किरणे जमिनीच्या पृष्ठभागावर पोहोचतात. त्यामुळे वातावरणातील तापमान वाढण्यास मदत होते.
११) विना निमकोटेड युरिया वापरल्याने त्याचा पाण्याबरोबर संपर्क होताच तो लगेच विरघळतो. त्यातील नत्र पिकांना उपलब्ध होण्याची क्रिया तत्काळ सुरू होऊन काही प्रमाणात पाण्याबरोबर जमिनीत वाहून जातो. त्यामुळे जमिनीतील पाणी दूषित होते. या संपूर्ण प्रक्रियेद्वारे नायट्रस ऑक्साइड हा हरितगृह वायू तयार होतो. त्यामुळे वातावरणातील हवा दूषित होते.

Fertilizers Use
Paddy : भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापन

युरियाचा अवाजवी वापर टाळण्यासाठी...
१) खते देण्यापूर्वी माती परीक्षण करावे. या अहवालानुसार खते द्यावीत.
२) नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करावा.
३) हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
४) नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळी फेकून न देता, दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.
५) कालावधी कमी असल्याने नत्र खताची मात्रा विभागून द्यावी.
६) एक किलो नत्र देण्यासाठी २.१७ किलो युरिया द्यावा.
७) युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना ॲझोटोबॅक्टर/ ॲसिटोबॅक्टर जिवाणू संवर्धक आणि द्विदल पिकांना रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी. जिवाणू खताच्या वापरामुळे तृणधान्य, द्विदल पिके व भाजीपाला पिकांमध्ये १५ ते २० टक्के नत्राची बचत होते. उसामध्ये ५० टक्क्यांपर्यंत बचत होते.
८) भातामध्ये युरिया- डीएपी ब्रिकेटचा वापर करावा.
९) पाणथळ जमिनीत प्रामुख्याने अमोनियाधारक नत्रयुक्त खतांचा वापर करावा.
११) कोरडवाहू शेतीमध्ये नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळेस पेरून द्यावीत.
१२) ऊस, केळी, बीटी कापूस यांसारख्या दीर्घ मुदतीच्या पिकांना युरिया खताची मात्रा विभागून द्यावी.
१३) नायट्रेटयुक्त खते वाहून जाऊ नयेत म्हणून नियंत्रित आणि हलकी ओलिताची पाळी द्यावी. चोपणयुक्त जमिनीत युरिया हे शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताबरोबरच द्यावे. युरिया खताची मात्रा २५ टक्क्यांनी वाढवून द्यावी.
१४) राज्यातील ५२ टक्के जमिनीत गंधकाचे प्रमाण कमी आहे.अशा जमिनीत युरियाला पर्यायी अमोनिअम सल्फेटचा वापर केल्यावर पिकांना नत्राबरोबर गंधक हे अतिरिक्त अन्नद्रव्य मिळून त्याचे चांगले परिणाम दिसतात.
१५) युरिया फेकून किंवा पेरून देण्यापेक्षा पाण्यात मिसळून फवारणीद्वारे दिला तर अत्यंत कमी खतामध्ये चांगले परिणाम दिसतात.
१६) युरियाला पर्याय म्हणून काही नत्रयुक्त विद्राव्य खते बाजारात उपलब्ध आहे. देशात उत्पादित होणारा आणि आयातीत युरिया सर्व उत्पादक व पुरवठादार यांना नीम कोटिंग करूनच पुरवठा व विक्री करणे बंधनकारक आहे.

संपर्क ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com