Sugarcane Management : उसाचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे...
डॉ. सुनील गोरंटीवार
Sugarcane Crop : १) अवर्षण काळात तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो. जमिनीतील उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी होते.
२) मुळांच्या कार्यक्षेत्रातील तापमान वाढून मुळांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे मुळाद्वारे पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते. हरितद्रव्यांचे प्रमाण घटल्यामुळे उसाची पाने पिवळी पडू लागतात.
३) पूर्ववाढ व जोमदार वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे कांड्यांची लांबी आणि जाडी कमी होऊन वजनात घट येते. उसामध्ये तंतुमय पदार्थांच्या प्रमाणात वाढ होऊन दशीचे प्रमाण वाढते.
४) साखर चयापचय क्रियांवर परिणाम होऊन निर्मिती व उतारा घटतो.
५) पाण्याचा तीव्र ताण बसल्यास वाढ खुंटते. कधी कधी सरळ उंच वाढण्याऐवजी डोळे फुटून पांगशा फुटतात.
उपाययोजना ः
१) ऊस पिकासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाने पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
२) को ८६०३२, कोएम ०२६५ व को ७४० या जाती इतर जातींपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यामुळे नवीन लागवडीसाठी अशा जातीचा प्राधान्याने वापर करावा.
३) ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी यापुढे पाणी देताना एक आड सरीतून पाणी द्यावे.
४) पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावी, जेणेकरून पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
५) पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर तीन आठवड्यांनी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश आणि २ टक्के युरिया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.
६) पाण्याची कमतरता असल्यास बाष्पीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८ टक्के केओलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
७) पाण्याची कमतरता असेल अशा ठिकाणी नेहमीच्या पाटाने पाणी देण्याच्या पद्धतीऐवजी सुरुवातीस खर्चिक असली तरी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
८) पीक तण विरहित ठेवावे. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होऊन ऊस वाढीसाठी उपयुक्त ठरेल.
९) शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.
१०) लागवडीच्या पिकात तसेच खोडव्यामध्ये हेक्टरी ५ ते ६ टन पाचटाचे आच्छादन करावे. प्रति टन पाचटासाठी ८ किलो युरिया, १० किलो सुपर फॉस्फेट आणि १ किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.
हंगामनिहाय व्यवस्थापन ः
१) आडसाली :
- सध्या आडसाली लागवडीचा ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. पाण्याचा ताण कमी करण्यासाठी एक आड सरीस पाणी द्यावे. वाळलेली पाने काढून सरीमध्ये आच्छादन करावे.
२) पूर्वहंगामी :
- सद्यःस्थितीत पूर्वहंगामी ऊस जोमदार वाढीच्या (७ ते ८ महिने) अवस्थेमध्ये आहे. या हंगामातील उसासाठी एक आड सरीतून पाणी द्यावे.
- खालील पाने काढून त्याचे सरीमध्ये आच्छादन करावे. पट्टा पद्धतीने लागवड केली असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. पीक ताणविरहित ठेवावे.
३) सुरू हंगाम :
- सध्या पीक पूर्ववाढ व जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे. एक आड सरीतून पाणी द्यावे. पीक तणविरहित ठेवावे.
- सरीमध्ये बाष्पीभवन कमी करण्यासाठी पाचट आच्छादन करावे.
बांधणीच्या वेळेस पालाश खताची मात्रा शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त द्यावी.
- पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर २१ दिवसांनी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश आणि २ टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी.
- पीक तणविरहित ठेवावे. ज्या ठिकाणी पट्टा पद्धतीने लागवड केलेली आहे अशा ठिकाणी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
४) खोडवा :
- सध्या खोडवा पीकपूर्व वाढ व जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे. एक आड सरीतून पाणी द्यावे. खोडव्यामध्ये पाचट आच्छादन करावे.
- खोडव्यास पहारीच्या साह्याने पालाशची मात्रा शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त द्यावी. दर २१ दिवसांनी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश आणि २ टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी.
- पीक तणविरहित ठेवावे. पट्टा पद्धतीने लागवड केली असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
-----------------------------------------------------
संपर्क ः ०२१६९-२६५३३५
(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.