लिची फळांपासून जॅम, जेली, मुरंबा

प्रामुख्याने उन्हाळ्यात मिळणाऱ्या चविष्ट व आरोग्यदायी फळांपैकी एक म्हणजे लिची (शास्त्रीय नाव: लिची चायनेन्सिस, कुळ : सॅपिडेंसी, गण : सॅपिडेली.) आंबट गोड असे हे रसदार फळ मुळ चीन येथील असून, भारतात अठराव्या शतकात आणले गेले.
Lychee Fruit
Lychee FruitAgrowon
Published on
Updated on

सचिन शेळके, डॉ. संदीप प्रसाद

प्रामुख्याने उन्हाळ्यात मिळणाऱ्या चविष्ट व आरोग्यदायी फळांपैकी एक म्हणजे लिची (शास्त्रीय नाव: लिची चायनेन्सिस, कुळ : सॅपिडेंसी, गण : सॅपिडेली.) आंबट गोड असे हे रसदार फळ मुळ चीन येथील असून, भारतात अठराव्या शतकात आणले गेले. त्याची लागवड उष्ण कटिबंधीय देशांमध्ये उदा. चीन, इंडोनेशिया, थायलंड, आफ्रिका, बांगलादेश व भारत इथे केली जाते. भारतामध्ये लिचीची लागवड प्रामुख्याने बिहार, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात (विशेषतः ठाणे जिल्हा) करतात. भारतात लिची लागवडीचे क्षेत्र १६ हजार हेक्टर असून, त्यातील ८० टक्के क्षेत्र बिहारमध्ये आहे.

ओळख ः

लिचीचे झाड १० ते १५ मीटर उंच वाढते. फळांची काढणीही एप्रिल ते मे महिन्यात करतात. फळे घोसांमध्ये येतात. फळे २.५ सेंमी लांब, गोल, किंवा लंबगोल व आठळीयुक्त असतात. फळांची साल सुरवातीला हिरवी असून, नंतर लाल होतात. फळांमध्ये मांसल, सुवासिक व पांढरा गर असतो. त्यात बी आठलीसारखे, तपकिरी रंगाचे असते.

लिचीपासून प्रक्रिया पदार्थ:-

लिची फळापासून आपण ज्यूस, गर, जाम, जेली, कॅण्डी, ड्राय लिची फ्लेक्स, लिचीनट, कॅनिंग, रस, मुरंबा इ. प्रक्रियायुक्त पदार्थ बनवू शकतो.

लिची जॅम :

१. लिचीची १ किलो पक्व फळे स्वच्छ धुवून घ्यावीत. फळावरील साल व आतील बी काढून गराचे लहान तुकडे करून घ्यावेत.

२. हे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून गर व्यवस्थित एकजीव करावा. गरामध्ये ७५० ग्रॅम साखर व ५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड घालून मंद आचेवर १०३ अंश तापमानापर्यंत शिजवणे.

३. मिश्रण शिजवत असताना ढवळत राहावे. मिश्रणांचा ब्रिक्स ६८.५ टक्के झाल्यानंतर उष्णता देणे बंद करावे.

४. तयार झालेले जॅम थंड करून निर्जंतूक केलेल्या काचेच्या बरणीत भरावा. घट्ट झाकण लावून, त्यावर थोडे मेण (पॅराफिन वॅक्स) ओतावे. या जॅमच्या बरण्या थंड व कोरड्या जागी साठवाव्यात.

Lychee Fruit
Lychee FruitAgrowon

लिची स्क्वॅश :

१. १ लिटर पाण्यामध्ये २० ग्रॅम सायट्रिक ॲसिड, दीड किलो साखर पूर्णपणे विरघळून घ्यावे.

२. हे मिश्रण मस्लीन कापडातून गाळून घेतल्यानंतर त्यात १ किलो लिचीचा गर मिसळावा. एकजीव करून १० मिनिटे मंद आचेवर गरम करून घेणे.

३. थंड झाल्यावर त्यात ५ ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट मिसळून चांगले विरघळून घ्यावे.

४. तयार झालेला स्क्वॅश निर्जंतुकीकरण करून घेतलेल्या स्वच्छ बरणीत भरून हवाबंद करावे. स्क्वॅश पासून सरबत तयार करताना त्यात दोन ते तीन पट पाणी टाकून पिण्यासाठी वापरावे.

लिची जेली :

१. रसरशीत ताजी व पक्व फळे निवडून, त्यातील गर काढून घ्यावा.

२. गराच्या वजनाएवढी साखर मिसळून, त्यात प्रतिकिलो ५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळून घेणे.

३. मिश्रणाला मंद आचेवर उष्णता द्यावी. या वेळी ५ ग्रॅम पेक्टीन टाकावे. पेक्टीन वापरामुळे जेलीला घट्टपणा येतो.

४. मिश्रणामध्ये २ ग्रॅम केएमएस मिसळावे. ब्रिक्स तपासत राहावा. ६७.५ ब्रिक्सचे प्रमाण झाल्यावर जेली तयार होते. त्यानंतर उष्णता देणे बंद करावे.

५. ही तयार झालेली जेली रुंद तोंडाच्या निर्जंतूक केलेल्या बरणीत भरावे. हवाबंद करून ठेवावे. जेली थंड व कोरड्या जागी साठवावी.

Lychee Fruit
Lychee FruitAgrowon

लिची मुरंबा ः

१. पूर्णपणे पिकलेली लिची फळे स्वच्छ धुवून, साल काढावी. गराचे तुकडे करून घेणे.

२. या तुकड्याच्या वजनाएवढी साखर घ्यावी. एका स्टीलच्या पातेल्यात साखर व प्रतिकिलो २ ग्रॅम सायट्रिक ॲसिड व पाणी घेऊन

मिश्रण मिसळून मंद आचेवर शिजवावे. साखरेचा तीन तारी पाक तयार करून घ्यावे.

३. या पाकात लिचीचे तुकडे मिसळून मंद आचेवर शिजवावे. पाकाला दाटपणा येऊन मुरंबा तयार होतो.

४. तयार झालेला मुरंबा थंड करून निर्जंतूक केलेल्या काचेचा बरणीत भरावे. थंड व कोरड्या ठिकाणी साठवावे.

लिची पावडर :

१. परिपक्व लिची फळे स्वच्छ पाण्याने धुवून त्याची साल काढून घेणे.

२. फळांचे २ सेंमीचे तुकडे करून घेणे. कापलेले तुकडे ४ ते ५ मिनिटांसाठी मंद आचेवर ब्लांचिंग करून घेणे.

३. हे लिचीचे तुकडे ॲल्युमिनिअम ट्रेवर पसरावे. वाळवण यंत्रामध्ये ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानावर २ ते ३ तासांसाठी सुकवून घेणे.

४. वाळलेले तुकडे मिक्सरमधून दळून घेणे. नंतर पॉलिथीन पाऊचमध्ये पँकिंग करून घेणे.

Lychee Fruit
Lychee FruitAgrowon

लिची कॅण्डी :

१. १ किलो स्वच्छ धुतलेली परिपक्व लिची फळांचे साल काढावी. त्याचे कॅण्डीसारखे बारीक काप करून घ्यावे.

२. स्टीलच्या पातेल्यात ५०० ग्रॅम साखर घेऊन, त्यामध्ये ५ मि. लि. लिंबाचा रस घालावा. ते मिश्रण १० ते १५ मिनिटे मंद आचेवर गरम करावे. साखरेचा पाक तयार करून घेणे.

३. साखरेचा पाक गार झाल्यानंतर त्यात लिचीचे कापलेले तुकडे टाकावेत. त्या मिश्रणाला पुुन्हा ५ मिनिटे मंद आचेवर शिजवणे.

४. मिश्रणाला एका ट्रेमध्ये काढून ७ ते ८ तासांसाठी वाळवावेत. पूर्णपणे सुकलेल्या कॅण्डीवर बारीक दळलेली पिठी साखर भुरभुरावी..

५. तयार झालेली लिची कॅण्डी निर्जंतूक केलेल्या काचेच्या बरणीत भरून ठेवावे.

लिची नट:

१. लिचीची परिपक्व फळे स्वच्छ धुवून, त्याचे २ ते ३ सें. मी. आकाराचे काप पाडून घेणे. कापलेल्या लिची ॲल्युमिनिअमच्या ट्रेमध्ये घेऊन पसरावीत.

२. त्यानंतर सौर वाळवण यंत्रामध्ये २ दिवस ठेवावे. तुकड्यातील पाण्याचे प्रमाण १० ते २० टक्के झाल्यास ते सुकल्याचे समजावे.

३. सुकलेली फळे सौर वाळवणी यंत्रातून काढून थंड करून ते दाबून घ्यावीत.

४. तयार झालेले, सुकलेले लिची नट हे काचेच्या बरणीत भरावेत. मेणाने (व्हॅक्स) हवाबंद करावे. यामुळे त्यांची साठवणूक ६ महिन्यांपर्यंत शक्य होते.

लिची फळातील पोषक घटक ः

लिची फळांमध्ये जीवनसत्त्वे सी, ए, बी-कॉम्प्लेक्स, कर्बोदके, पोटॅशियम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आयर्न, फॉस्फरस, खनिजे असे अनेक पोषक घटक असतात.

प्रति १०० ग्रॅम प्रमाण :

ऊर्जा ६६ किलोकॅलरी, कर्बोदके १६.५ ग्रॅम, प्रथिने १.५ ग्रॅम,

जीवनसत्वे : जीवनसत्त्व सी ७५ मिलिग्रॅम, जीवनसत्त्व बी १५ मिलिग्रॅम

कॅल्शिअम: ५ मिलिग्रॅम, मॅग्नेशिअम १२ मिलिग्रॅम, फॉस्फरस ३० मिलिग्रॅम, पोटॅशिअम १७० मिलिग्रॅम, साखर १५ ग्रॅम, तंतुमय पदार्थ १.३ ग्रॅम.

आरोग्यदायी फायदे :

१. यातील बीटा कॅरोटिन आणि आलीग्रोनोल हे ह्रदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते.

२. शरीराला थंडावा मिळतो. वजन नियंत्रणात राहते.

३. उन्हाळ्यात होणारी शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

४. पोटाचे विकार आणि बद्धकोष्ठतेची समस्येवर आराम मिळते.

५. लिची कर्करोगाच्या पेशी व कोशिकांना वाढू देत नाही.

६. अस्थमापासून बचावासाठी लिचीचे सेवन उपयुक्त मानले जाते.

७. फळांतील गरामधील ॲण्टीऑक्सिडेंट्समुळे अशक्तपणा दूर राहतो.

८. लिचीचे मूळ साल आणि फुले यांच्यापासून काढा करून गुळण्या केल्यास घशाचे विकार होत नाही.

९. तंतुमय पदार्थांमुळे पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते.

१०. यातील जीवनसत्त्व ‘सी’ मुळे विविध रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढते.

सचिन अर्जुन शेळके, ८८८८९९२५२२ (आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सैम हिग्निनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com