Grape Advisory : सततच्या पावसामुळे बागेत उद्‍भवणाऱ्या समस्या

सध्या द्राक्ष लागवडीखालील प्रत्येक भागात सतत पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. या वातावरणामध्ये जमिनीतील वाफसा परिस्थिती अजूनही आलेली नाही.
Grape Advisory
Grape AdvisoryAgrowon

सध्या द्राक्ष लागवडीखालील प्रत्येक भागात सतत पाऊस (Rain) सुरू असल्याचे चित्र आहे. या वातावरणामध्ये जमिनीतील वाफसा परिस्थिती अजूनही आलेली नाही. कमी झालेले तापमान, वाढत असलेली आर्द्रता (Humidity) आणि त्यामुळे वेलीमध्ये होत असलेल्या विपरीत घडामोडी आणि फळछाटणीच्या (Fruit Prunning) सद्यःस्थितीचा विचार करता खालील अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Grape Advisory
Grape Pruning : सांगलीत पन्नास टक्के द्राक्ष फळ छाटणी

१) काडी परिपक्वता ः

मागील आठवड्यामध्ये बागेतील वातावरण मोकळे असल्यामुळे काही भागांत काडी कच्ची असलेल्या ठिकाणी कोरड्या वातावरणामुळे परिपक्वता होण्यास सुरुवात झाली होती. मात्र सध्या पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे काडी परिपक्वता लांबणीवर जाण्याची शक्यता असेल. या वेळी जमिनीत वाफसा असल्यास पालाशची उपलब्धता जमिनीतून आणि फवारणीच्या माध्यमातून करावी. उदा. ०-०-५० सुमारे दीड किलो प्रति एकर या प्रमाणे एक आठवडा रोज द्यावे. किंवा ०-९-४६ एक किलो या प्रमाणे आठ ते दहा दिवस द्यावे. ज्या बागेत वाफसा आलेला नाही, बोदामध्ये जास्त प्रमाणात पाणी साचलेले आहे अशा ठिकाणी फक्त फवारणीच्या माध्यमातून पूर्तता करावी. पानाची परिस्थिती पाहून फवारणीची मात्रा व संख्या कमी अधिक करावी. साधारण परिस्थितीमध्ये ०-०-५० चार ते पाच ग्रॅम किंवा ०-९-४६ तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पाच ते सहा फवारण्या आवश्यक असतील. नवीन फुटी निघत असल्यास शेंडा पिंचिंग करून घेणे फायद्याचे असेल. ढगाळ वातावरण जास्त काळ टिकून राहिल्यामुळे वेलीला आवश्यक तितका सूर्यप्रकाश मिळालेला नसेल, याकरिता काड्या एकमेकांवर येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तारेवर काड्या व्यवस्थित बांधून घ्याव्यात.

Grape Advisory
BBF Technique : ‘बीबीएफ’ तंत्राद्वारे वाढविली सोयाबीन, हरभरा उत्पादकता

२) नुकतीच फळछाटणी झालेली बाग ः

बऱ्याचशा बागेत फळछाटणी होऊन सध्या पोंगा अवस्था दिसून येईल. या कालावधीमध्ये खरेतर वातावरण कोरडे असणे गरजेचे असते. कोरड्या वातावरणात वेलीची वाढ नियंत्रणात असते. मात्र या पोंगा अवस्थेत ज्या भागात पाऊस झाला किंवा सुरू आहे, अशा स्थितीमध्ये वेलीमध्ये शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढतो. परिणामी वाढ जास्त प्रमाणात होताना दिसते. पोंगा अवस्थेत वेलीचा जोम जरी दिसत नसला तरी त्याचे परिणाम चार ते पाच पाने अवस्थेत लगेच दिसून येतात. वातावरणातील झालेल्या बदलामुळे वाढीचा जोम वाढून या वेळी निघत असलेला द्राक्षघडाचे रूपांतर बाळीमध्ये होण्याची समस्या दिसून येते. काही परिस्थितीत गोळीघडही तयार होताना दिसतील. ज्या बागेत मुळांच्या कक्षेत पाणी जास्त प्रमाणात साचलेले आहे, अशा बागेत निघत असलेला घड पांढरा दिसून येईल. किंवा निघालेली फूटही पिवळ्या रंगाची दिसेल. या वेळी बागेत फारसे करता येत नसले तरी वाढीचा जोम नियंत्रणात ठेवण्यासाठी पालाशयुक्त खतांचा वापर जमिनीतून तसेच फवारणीच्या माध्यमातून करता येईल. या सोबत संजीवकांची फवारणीही तितकीच महत्त्वाची असेल. या वेळी घड जिरण्याची समस्या रोखण्यासाठी ६ बीए १० पीपीएम प्रमाणे करता येईल. बऱ्याचदा बागायतदार पोंगा अवस्था सुरू होण्यापूर्वीपासूनच ६ बीए व पालाशची फवारणी सुरू करतात. यावेळी डोळा फुगलेला असून केवळ कापसलेला असतो, त्यामुळे आपण करत असलेल्या फवारणीचे परिणाम मिळत नाहीत. पोंग्यातून एक ते दीड पान जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत फवारणीचे परिणाम मिळत नाहीत. यासाठी केलेली फवारणी पानाने शोषून डोळा फुटण्याची गरज असते. तेव्हा बागेतील परिस्थिती पाहून डोळ्यातून पान बाहेर निघाल्यानंतरच फवारणी करावी. पालाशची फवारणी करताना त्याचे प्रमाण फार कमी ठेवावे. उदा. अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी वाढीच्या या अवस्थेत पुरेसे होईल. खताच्या फवारणीची मात्रा वाढवण्यापेक्षा फवारण्यांची संख्या वाढविल्यास परिणाम चांगले मिळतील. या पूर्वी बागेत दोन ओळींच्या मध्य भागात चारी घेतलेली असल्यास बोद लवकर मोकळे होतील. वाफसा असलेल्या परिस्थितीत जमिनीतून खतांचा वापर (मॅग्नेशिअम आणि फेरस) करता येईल.

Grape Advisory
द्राक्ष बागेतील काडी परिपक्वता, आगाप छाटणी अवस्थेतील नियोजन

३) द्राक्ष घड कुजण्याची समस्या ः

दोन ते तीन आठवड्यांपूर्वी फळछाटणी केलेल्या बागेत या वेळी काडीवर काडीवर निघालेल्या फुटींची संख्या जास्त असेल, तसेच फुटींची वाढही जास्त झालेली असेल. एका काडीवर साधारणतः चार ते पाच डोळ्यांवर हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग केले जाते. या वेळी साधारणतः सात ते आठ पानांची अवस्था असेल. म्हणजेच प्रत्येक काडीवर ३५ ते ४० पाने असतील. वेलीवर असलेल्या काड्याची संख्या लक्षात घेता या वेळी प्री ब्लूम अवस्थेमध्ये दाट कॅनॉपी तयार झालेली आहे. कोरडे वातावरण असल्यास घडावर फारसे विपरीत परिणाम होणार नाहीत. मात्र सतत पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे वाढलेल्या आर्द्रतेमुळे एकतर डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव वाढतो. किंवा कुजेची समस्या निर्माण होते. प्री ब्लूम अवस्थेमध्ये घडात अजून देठ तयार झालेले नसले तरी घडावर पाणी साचून राहिल्यास तो घड कुजण्याची शक्यता वाढते. यासाठी वेळीच फेलफूट काढणे गरजेचे होते. या हंगामात सतत होत असलेल्या पावसाचा विचार करता काडीवर फेलफुटी शक्य तितक्या लवकर काढून घ्याव्यात. दरवर्षीच्या तुलनेत फुटींची संख्या कमी ठेवावी. कॅनॉपीमध्ये आर्द्रता कमी करण्याच्या दृष्टीने हे करणे अत्यंत गरजेचे असेल. ज्या बागेत वाफसा परिस्थिती अजून आलेली नाही, अशा भागात काही काळ पाऊस सुरू असल्यास डाऊनी मिल्ड्यू, करपा किंवा जिवाणूजन्य करपा यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल. फळछाटणीनंतर १४ ते १७ दिवसांच्या कालावधीत फेलफुटी काढण्याला प्राधान्य द्यावे.
सतत झालेल्या पावसामुळे बोदामधून पाणी व त्यासोबत उपलब्ध अन्नद्रव्येही वाहून गेली असतील. अशा स्थितीमध्ये द्राक्ष वेल अशक्त होऊ शकते. वेलीला ताण बसतो. यामुळे कुजेची समस्याही वाढताना दिसते. यावर मात करण्यासाठी वेलीला सशक्त करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. झिंक, बोरॉन ची फवारणी प्रत्येकी अर्धा ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे घ्यावी. पालाश दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे एक ते दोन फवारण्या करून घ्याव्यात. पाने पिवळी असलेल्या परिस्थिती वाढीचा जोम कमी असल्यास नत्रयुक्त किंवा नत्र स्फुरदयुक्त खतांची फवारणी करता येईल.
फेलफुटी काढताना कोवळ्या काडीवर जखमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस सुरू असलेल्या परिस्थितीत या जखमेमुळे कुजेची किंवा रोगाची समस्या येण्याची शक्यता असेल. तेव्हा फेलफूट काढल्यानंतर लगेच बुरशीनाशकांची फवारणी करून घ्यावी.

४) रोगनियंत्रण ः

बऱ्याच बागांमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. द्राक्ष बागेत छाटण्या पूर्ण झालेल्या नसून, अजून ५० टक्के छाटण्या होणे बाकी असल्याचे समजते. फळछाटणी झालेली नसलेल्या बागेमध्ये विविध प्रकारच्या रोगांची समस्या दिसून येईल. या बागेत पानगळ करण्यापूर्वी बोर्डो मिश्रण एक टक्के या प्रमाणे फवारणी करून घ्यावी. कॅनॉपी किती आहे, त्यानुसार फवारणीच्या द्रावणाची मात्रा अवलंबून राहील. सशक्त अशी पूर्ण कॅनॉपी असलेल्या बागेत साधारणतः पाचशे लिटर पाणी गरजेचे असेल. पानगळ झाल्यानंतर ट्रायकोडर्माची फवारणी वेली आणि तसेच खाली जमिनीवर सुद्धा करून घ्यावी. फळछाटणीपूर्वीच जर रोगनियंत्रण चांगल्या प्रकारे केले असल्यास फळछाटणीनंतर फारशा समस्या येत नाहीत. उदा. मांजरी वाइनगार्ड दोन मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी करतेवेळी वेलीवर काड्या, ओलांडा, खोड, बोद आणि दोन ओळींमधील जागा व बांधावरही व्यवस्थित फवारणी करून घ्यावी. वाढलेल्या आर्द्रतेमध्ये ही फवारणी दोन ते तीन वेळा केल्यास जमिनीवर उपलब्ध डाऊनी मिल्ड्यूचे बिजाणू नियंत्रणात आणण्यास चांगले मदत होते. बाजारात उपलब्ध असलेल्या ट्रायकोडर्माची फवारणी पाच ग्रॅम किंवा मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करता येईल.
फळछाटणी झालेल्या बागेमध्ये पोंगा अवस्था ते घडाची दोडा अवस्था असल्यास या वातावरणामध्ये डाऊनी मिल्ड्यू व करपाची समस्या जास्त जाणवू शकते. बऱ्याचदा एकाच बागायतदाराचे दोन प्लॉट वेगवेगळ्या अवस्थेत दिसून येतात. उदा. फळछाटणी झालेल्या नसलेल्या बागेशेजारी दुसरा प्लॉट पोंगा अवस्थेत असू शकतो. छाटणी झालेल्या प्लॉट जर वारे वाहत असलेल्या पुढील दिशेने असल्यास जुन्या बागेत रोगाचे बीजाणू किंवा जिवाणू सहजरित्या उडून पोंगा अवस्थेतील बागेमध्ये येऊ शकतात. त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो. अशा वेळी नवीन बागेच्या नियंत्रणाकडे लक्ष कमी देऊन जुन्या बागेची काळजी जास्त घ्यावी. हे टाळण्यासाठी छाटणीपूर्वीच नियोजन महत्त्वाचे असेल. उदा. वारा वाहत असलेल्या दिशेविरुद्धचा प्लॉटमध्ये सुरुवातीला छाटणी घ्यावी. या बागेत जैविक नियंत्रणावर जास्तीत जास्त भर द्यावा. कारण सध्याचे वातावरण त्यासाठी पोषक आहे.
-------------------------------------------------------
डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com