
शेतकरी ः प्रमोद अनिल जाधव
गाव ः फोंडशिरस, ता, माळशिरस, जि. सोलापूर
एकूण क्षेत्र ः ६ एकर
डाळिंब लागवड ः ४ एकर
एकूण झाडे ः १३००
फोंडशिरस (ता. माळशिरस) येथे प्रमोद जाधव यांची सहा एकर शेतजमीन आहे. त्यात चार एकरावर डाळिंबाची (Pomegranate) सुमारे १३०० झाडे आहेत. त्यापैकी दीड एकरावरील ६०० झाडांवर हस्त बहर धरला जातो. तर उर्वरित अडीच एकरांवरील ७०० झाडांवर आंबिया बहर धरला जातो. हस्त बहरातील बागेची २०१० रोजी १८ बाय ८ फुटांवर, तर आंबिया बहरातील बागेची १४ बाय ९ फुटांवर लागवड (Pomegranate Cultivation) केली आहे. डाळिंबामध्ये प्रामुख्याने हस्त आणि आंबिया बहर धरला जातो. साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हस्त बहर, तर जानेवारीमध्ये आंबिया बहर धरला जातो. प्रयोगशाळेतून पान आणि देठाची परीक्षण केले जाते. त्यानुसार रासायनिक खतांच्या (Chemical Production) बेसलचे डोसचे प्रमाण ठरविले जाते. येत्या काळात उर्वरित २ एकरामध्येही डाळिंब लागवड करण्याचे त्यांचे नियोजन आहे.
युरोपात निर्यात ः
युरोपामध्ये निर्यात करण्यासाठी २०१८ पासून रासायनिक अंशमुक्त (रेसिड्यू फ्री) उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यादृष्टीने सर्व बाबींचे काटेकोर नियोजन केले जाते. मागील वर्षी हस्त बहरात युरोपमध्ये १६ टन मालाची निर्यात केली. त्यास प्रतिकिलो डाळिंबास साधारण १३० रुपये इतका दर मिळाला. युरोपात फक्त हस्त बहरातील फळांस चांगली मागणी असते. त्यानुसार सर्व बाबींचे नियोजन करतो, असे प्रमोद यांनी सांगितले.
हस्त बहराचे नियोजन ः
- बहर धरण्याच्या आधी शेणखत, रासायनिक खतांचा बेसल डोस देणे, अनावश्यक काडी विरळणी, लागलेली फळे, कळी तोडणे इत्यादी कामांवर भर दिला जातो.
- त्यानुसार जून महिन्यात एकरी ४ ट्रॉली याप्रमाणे शेणखताची मात्रा दिली. तसेच रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. निबोळी पेंड, एनपीके, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची प्रत्येकी २ किलो प्रमाणे दिले.
- खतांच्या मात्रा दिल्यानंतर जून ते ऑगस्ट या कालावधीत बागेस ताण दिला. साधारण दीड महिना बागेस ताण दिला जातो. ताण तोडतेवेळी ७ ते ८ तास ठिबकद्वारे सिंचन केले.
- बहर धरण्यासाठी या आठवड्यात बागेची पानगळ केली.
आगामी नियोजन ः
- पानगळ केल्यानंतर बागेची छाटणी केली जाईल. त्यानंतर झाडांवर बोर्डोची फवारणी घेतली जाईल.
- काडी बळकट होण्यासाठी ०ः५२ः३४ आणि ०ः०ः५० तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारण्या घेणार आहे.
- पीएसबी, केएसबी एकरी १ किलो प्रमाणे दिले जाईल.
- कळी दिसण्याच्या अगोदर विद्राव्य खतांच्या मात्रा ड्रीपद्वारे दिल्या जातील.
- कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बुरशीनाशके आणि कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातील.
- येत्या काळात पावसाचे प्रमाण आणि जमिनीतील वाफसा यांचा अंदाज घेऊन सिंचनाचे नियोजन केले जाईल.
- प्रमोद जाधव, ९८५०९९४११५
(शब्दांकन ः सुदर्शन सुतार)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.