
अलीकडे आहार आणि आरोग्याबाबत जागरुकता वाढत आहे. अळिंबीमध्ये (Mushroom) भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत पोषक घटकांचे प्रमाण दुप्पट असते. त्यामुळे जागरुक लोकांच्या आहारात अळिंबी म्हणजेच मशरूमचा वापर होतो. त्यामुळे अळिंबीला सध्या मागणी वाढत आहे. तसेच अळिंबीच्या निर्यातीस (Export) असलेला वाव आणि हॉटेल्समध्ये असलेली मागणी यामुळे अळिंबी उत्पादनात चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
धिंगरी अळिंबीच्या (Oyster Mushroom) लागवडीची पद्धत सोपी व कमी कालावधीची असल्याने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व कमी भांडवलामध्ये अळिंबी उत्पादनाचा व्यवसाय सुरू करता येतो. महाराष्ट्रातील हवामान धिंगरी आळिंबीला अनुकूल असल्याने वर्षभर लागवड करणे शक्य आहे.
अळिंबीच्या प्रजाती कोणत्या?
अळिंबीच्या जगात १२ हजारांहून अधिक जाती असल्याची नोंद आहे. परंतु निसर्गात आढळणारी सर्वच अळिंबी खाण्यास योग्य नसते. खाण्यायोग्य किंवा विषारी अळिंबीतील फरक सहजपणे सांगता येत नाही. तज्ज्ञांकडून याविषयी खात्री करूनच अळिंबीची लागवड करावी लागते. खाण्यास योग्य जातींपैकी ५ ते ६ जाती व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यात येतात. भारतामध्ये मुख्यतः बटण मशरूम, धिंगरी, भात पेंढ्यावरील अळिंबी (वोल्व्हिएला वोल्वासा) या जातींच्या अळिंबीची लागवड केली जाते. हिमाचल प्रदेश, आसाम, पंजाब राज्यात बटण अळिंबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात धिंगरी अळिंबीचे उत्पादन घेतात. बटण अळिंबीपेक्षा धिंगरी अळिंबीचे उत्पादन अल्प खर्चात अत्यंत अल्प जागेत घेता येते. धिंगरी किंवा शिंपला अळिंबीला इंग्रजीत ऑईस्टर असे म्हणतात.
अळिंबीतील पौष्टीक घटक कोणते?
अळिंबीमध्ये भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत प्रथिने, खनिजे, लोह, तांबे, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम आणि ब, क जीवनसत्त्वाचे प्रमाण दुप्पट असते. हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी, त्वचारोग, वजन कमी करण्यासाठी व आम्लपित्तावर अळिंबी उपयुक्त मानली जाते.
धिंगरी अळिंबी का आहे फायदेशीर ?
धिंगरी अळिंबीचे कमी भांडवलामध्ये शेतातील टाकाऊ वस्तूंवर उत्पादन घेता येते.
कमी वेळ व कमी मजुर लागत असल्यामुळे गृहिणींसाठी हा चांगला पूरक व्यवसाय ठरु शकतो.
उत्पादन व प्रक्रिया पद्धत सोपी असल्याने उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता नसते.
धिंगरी अळिंबी उत्पादनासाठी आवश्यक बाबी कोणत्या?
- उत्पादनासाठी बंदिस्त स्वरूपाच्या झोपडीमध्ये, बांबूचे किंवा मातीचे घर यामध्ये चांगले उत्पादन घेता येते.
- अळिंबी उत्पादनासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा आवश्यक आहे.
- गव्हाचा भुसा,कपाशीच्या काड्या, भाताचा पेंढा, गवत, सोयाबीनचा भुसा,कडबा, इत्यादी घटकावर आळिंबी उत्पादन घेता येते. उत्पादन प्रामुख्याने कच्च्या मालावर अवलंबून असल्यामुळे तो वेळेत उपलब्ध होणे आवश्यक असते.
- अळिंबी उत्पादनासाठी प्लॅस्टिकच्या पॉली प्रॅापिलीनच्या ८० ते १०० गेज जाडीच्या पिशव्या वापरतात.
- अळिंबीच्या बियाणांस स्पॉन असे म्हणतात. प्लॅस्टिकच्या पिशवीत ५०० ग्रॅम, १ कि.ग्रॅ. या नुसार बियाणे उपलब्ध असते.
आवश्यक वातावरण
- अंधारमय वातावरणात ७० ते ८० टक्के आर्द्रता आणि १८ ते २८ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या ठिकाणी अळिंबीची चांगली वाढ होते. चांगल्या उत्पादनासाठी खेळती हवा असणे ही एक महत्त्वाची बाब आहे.
- उत्पादनाकरिता खूप मोठी अवजड व महाग यंत्र किंवा साहित्य लागत नाही. कच्चा माल भिजवण्यासाठी ड्रम, पाणी गरम करण्यासाठी हीटर, वातावरण नियंत्रित करण्यासाठी फॉगर्स, ह्युमिडी फायर गरज असते. याशिवाय अळिंबी वाळविण्यासाठी ड्रायर, तापमानाची नोंद ठेवण्यासाठी थर्मामीटर, आर्द्रता तपासण्यासाठी हायग्रोमीटर ची आवश्यकता असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.