संत्रा मृग बहराच्या फुटीवर प्रश्‍नचिन्ह

आकाशात ढगांची गर्दी; वातावरण बदलाने शेतकरी संकटात
Orange Fruit
Orange FruitAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
वरुड, जि. अमरावती : आंबिया बहराचे व्यवस्थापन करताना संत्रा बागांना अपेक्षित ताण मिळाला नाही. त्यातही वाढत्या तापमानामुळे संत्रा फळांची मोठ्या प्रमाणात गळ झाली. अशा परिस्थितीत आता मृग बहराची प्रतीक्षा आहे. मात्र बदलते वातावरण व अपुरा ताण मृग बहराच्या फुटीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे असल्याने जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी द्विधा मनःस्थितीत सापडला आहे.

विदर्भाच्या कॅलिफोर्नियासह (वरुड व मोर्शी) अचलपूर, चांदूरबाजार, नांदगाव, चांदूररेल्वे, अंजनगाव आदी तालुक्यांतील संत्रा बागांवर यंदा आंबिया बहर मोठ्या प्रमाणात फुलला होता. यामुळे हरखून गेलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या उत्पादनाची अपेक्षा होती. आंबिया बहराच्या फुटीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. मात्र दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानाची आंबिया बहराला दृष्ट लागली. ४५ अंश पार गेलेल्या तापमानात आंबिया बहराची फळे गळू लागली. त्यातच झाडावर शिल्लक असलेली फळे टिकविण्यासाठी बागांचे सिंचन सुरूच ठेवले.

आता मृग बहर फुटीचे दिवस जवळ येऊ लागले असतानाच त्याच्या फुटीसाठीसुद्धा संत्रा बागांना ताण देण्याची गरज असते. मात्र आंबिया बहर टिकविण्यासाठी ओलित केल्याने संत्रा बागांना अपेक्षित ताण मिळाला नाही. त्यात काही ठिकाणी फुललेल्या आंबिया बहराची फळे दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकची भर पडली आहे. आंबिया बहरासाठी कारणीभूत ठरलेले बदलते वातावरण मृग बहरावरही परिणाम करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हवामान विभागाने लवकर पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तर गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगांची गर्दी आकाशात होत असल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास संत्रा झाडांचा ताण तुटल्यामुळे मृग बहर फुटीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला दिसून येतो. फुललेला आंबिया बहर हातचा गेल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक गणिते बिघडली. आता मृगाच्या फुटीवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याने शेतकरी द्विधा मनःस्थितीत सापडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com