Onion Cultivation : शेतकरी नियोजन - कांदा लागवड

नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागातील कळवण तालुका हा रब्बी कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. भौगोलिक स्थिती व वातावरण पोषक असल्याने शेतकऱ्यांचे कांदा हे मुख्य पीक झाले आहे.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon

शेतकऱ्याचे नाव : पंडित रामभाऊ वाघ

गाव : बार्डे, ता. कळवण, जि. नाशिक

एकूण क्षेत्र : स्वमालकीची ११ एकर आणि ५ एकर भाडेतत्त्वावर

कांदा लागवड : १३ एकर

नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागातील कळवण तालुका हा रब्बी कांद्यासाठी (Rabi Onion) प्रसिद्ध आहे. भौगोलिक स्थिती (Geographical Condition) व वातावरण पोषक असल्याने शेतकऱ्यांचे कांदा (Onion) हे मुख्य पीक झाले आहे. त्यासाठी सुधारित पद्धतींचा अवलंब करून चांगल्या गुणवत्तेचा कांदा उत्पादनासाठी (Onion Production) शेतकरी नियोजन करतात.

Onion Cultivation
Onion Cultivation : निफाड तालुक्यात उन्हाळ कांदा लागवड सुरू

लागवडपूर्व नियोजन

जमिनीची चांगली नांगरट करून, उभ्या आडव्या रोटाव्हेटरच्या साह्याने पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत तयार केली जाते. जमीन तयार झाल्यावर शेवटच्या रोटर पाळीच्या अगोदर कुजलेले कोंबडी खत व सेंद्रिय खत असे एकरी एक एक टन जमिनीत टाकून शेवटची रोटरची पाळी देण्यात आली.

त्यानंतर सारे दांड पाडून लागवडीसाठी बांधणी करून घेतली. यंदाच्या वर्षी २५ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान लागवड टप्प्याटप्प्याने मजुरांच्या उपलब्धनुसार लागवड पूर्ण करण्यात आली आहे.

Onion Cultivation
Onion Cultivation : खानदेशात उन्हाळ कांदालागवड सुरू

खत व्यवस्थापन

कांदा पुनर्लागवडीच्या अगोदर पहिले भर खत म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट एकरी तीन गोणी, म्युरेट ऑफ पोटॅश अर्धी गोणी, सल्फरयुक्त खत दहा किलो, ग्रॅन्युएल मायकोरायझा चार किलो असे एकत्रित करून तयार वाफ्यांमध्ये फोकून दिल्यानंतर कांदे लागवडीला सुरुवात केली.

दुसरे पाणी भरणीच्या वेळेस एकरी युरिया अर्धी गोणी, सिलिकॉनयुक्त खत ४० किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड नंबर दोन दहा किलो, सीवीड बेस ह्युमिक दाणेदार खत चार किलो हे असे सर्व एकत्र करून टाकून पाणी देण्यात आले.

साधारण बाराव्या दिवशी हा खताचा दुसरा डोस आला. काही क्षेत्राला युरियाऐवजी अमोनिअम सल्फेटचा वापर केला. तिसऱ्या पाण्याला साधारण २४ ते २५ व्या दिवशी एकरी १०:२६:२६ एक गोणी असा तिसरा डोस वापरला.

पीक व्यवस्थापन

पिकावरील प्रादुर्भावानुसार कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करण्यात येईल. पिकाला प्रवाही पद्धतीने पाणी दिले जाते. सरासरी जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांनी काही ठिकाणी १५ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या शंभराव्या दिवसापर्यंत दिल्या जातील.

असे शंभर ते एकशे दहा दिवसांपर्यंत काटेकोर लक्ष देऊन जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. जर वातावरणाने अशीच साथ दिली, तर एकरी २० टनांपर्यंत उत्पादन मिळेल.

काढणीपश्‍चात साठवणूक, विक्री नियोजन

साधारण मार्चमध्ये कांदा काढणी केल्यानंतर हाताळणी व प्रतवारी करून चाळीत साठविण्यात येणार आहे. दर साधण्यासह व कांद्याचा दर्जा राखण्यासाठी साठवणूक तंत्र महत्त्वाचे ठरते. त्यामुळे कांदा साठवणूक करताना आकारानुसार वर्गवारी केले जाते.

कांदा काढताना चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले व खराब कांदे यांचे वर्गीकरण केले जाते. वेगवेगळी साठवणूक केली जाते. प्रतवारीनुसार विक्री सोपी जाते. एप्रिलपासून स्थानिक बाजारात टप्प्याटप्प्याने विक्री करण्यास सुरुवात होते.

पुढील खरीप हंगाम सुरू होण्याच्या दरम्यान जास्त कांदा विक्री जून आणि जुलै महिन्यात नियोजन असते. यासह साठवलेला कांदा नोव्हेंबर महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने विक्री करतो. त्यामुळे सरासरी बाजारभाव अपेक्षेप्रमाणे मिळतात.

कांदा बीजोत्पादन

प्रतवारी केलेला ४५ ते ५५ मिमी आकाराचा कांदा निवडून बीजोत्पादनासाठी ५ ते ७ गुंठे क्षेत्रावर डेंगळे नोव्हेंबरच्या शेवटच्या सप्ताहात लागवड केली जाते. या वर्षापासून पॉलिमल्चिंग पेपरवर लागवड केली जात आहे. यातून ३० ते ३५ किलो बियाणे मिळते. त्यामुळे बियाण्याचा अतिरिक्त खर्च वाचतो आहे.

रोपवाटिकेचे आदर्श व्यवस्थापन

दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला रोपनिर्मितीचे नियोजन केले जाते. यासाठी पाण्याचा निचरा होणारी व उंचवट्याची जमीन निवडली जाते. एक एकर रोपवाटिकेसाठी (४० गुंठे) २० किलो बियाणे वापरले जाते. या वर्षी २ एकर रोपवाटिकेमध्ये ४० किलो बियाणे होते.

त्या ४० किलो बियाण्यामध्ये साधारण १३ एकर क्षेत्रावर कांदा लागवड झाली. पावसामुळे २० टक्के रोपवाटिकेचे नुकसान झाले होते. म्हणून कमी क्षेत्रावर लागवड झाली आहे. घरगुती बीजोत्पादनातून ३० किलो आणि १० किलो बियाणे उत्पादक कंपनीकडून विकत घेतले होते.

यामध्ये बियाणे टाकण्यापूर्वी बियाणे उगवणक्षमता चाचणी केली जाते. त्यानंतर बीजप्रक्रिया करण्यासाठी रासायनिक व जैविक पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानंतर गादी वाफ्यावर बियाणे टाकून रोपे तयार केली जातात. ५५ ते ६० दिवसांचे सशक्त रोपांची लागवड केली जाते.

- पंडित वाघ, ७५८८८१७७६९

(शब्दांकन ः मुकुंद पिंगळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com