

शेतकरी नियोजन ः काजू
-------------------------------------------------
शेतकरी नाव ः सचिन विजय कोलते,
गाव ः करूळ, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग
एकूण क्षेत्र ः ३० एकर
काजू लागवड ः ८ एकर
एकूण झाडे ः ८००
-----------------
Cashew Crop : माझी करूळ (ता. वैभववाडी) येथे ३० एकर जमीन आहे. त्यापैकी ८ एकरांमध्ये मी ८०० काजू लागवड केली आहे. यामध्ये वेंगुर्ला ४, वेंगुर्ला-७ आणि १०० झाडे देशी जातीची लागवड आहे. देशी काजूचे उत्पादन नैसर्गिक पद्धतीने घेतले जाते.
या वर्षीचे नियोजन -
* या वर्षीचा काजू हंगाम मे अखेरीला संपला.त्यानंतर काजूच्या झाडाखाली पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो काजूच्या बुंध्याजवळ घालण्यात आला आहे. रोगग्रस्त झाडे मुळासकट काढून त्या ठिकाणी आता नवीन लागवड करण्यात येत आहे.
* या वर्षी मॉन्सून उशिराने आला. त्यामुळे शेतीची सर्वच कामे विलंबाने सुरू आहेत. जुलैमध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे. या महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर झाडांना खत घालण्यात येईल. शेणखत प्रत्येक झाडाला पाच किलो तर रासायनिक प्रति झाड दोन किलो घालतो. आवश्यक खताची खरेदी करून ठेवण्यात आली आहे.
* बाग संपूर्ण डोंगरात असल्यामुळे येथे झाडे झुडपे सतत वाढतच असतात. ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर ही झुडपे तोडून काजूच्या मुळावर पालापाचोळा घातला जातो.
* बागेत अजिबात तणनाशकाचा वापर केला जात नाही. बागेच्या सभोवताली पाऊस कमी झाल्यानंतर आगरेषेप्रमाणे तणनाशकाचा वापर केला जातो. झाडांचा आकार मोठा असल्यामुळे आता बागेत तणाचे प्रमाण कमी असते. परंतु मोकळ्या जागी आलेले तण आणि वाढलेली इतर लहान मोठी खुरटी झुडपे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपासून काढण्याचे काम केले जाते. त्याकरिता ग्रास कटरचा वापर केला जातो.
* ऑक्टोबरमध्ये झाडांना पालवी येण्यास सुरुवात होते. या कालावधीत काजूवर टी मॉस्किटो बगचा प्रादुर्भाव हमखास जाणवतो. या कालावधीत संपूर्ण बागेची पाहणी केली जाते. टी मॉस्किटोचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शिफारशीप्रमाणे एक फवारणी घेतली जाते. १०० देशी झाडांना अजिबात फवारणी केली जात नाही.
* नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये काजूला मोहोर फुटण्यास प्रारंभ होतो. मोहोर येण्याच्या वेळी थ्रिप्सचा प्रादुर्भावाची शक्यता असते. त्या कालावधीत संपूर्ण बागेचे निरीक्षण केल्यानंतर पुन्हा एक फवारणी केली जाते.
* फेब्रुवारी महिन्यापासून काजू हंगामाला सुरुवात होते. या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापासून हंगाम सुरू झाला. झाडावरून पडलेल्या काजू बी एकत्र करून ठेवल्या जातात. आठवडाभर एकत्र केलेले काजू स्वच्छ धुऊन कोवळी उन्हे देऊन त्यांची साठवणूक केली जाते. एक दोन दिवसाआड पडलेल्या काजू बी एकत्र कराव्या लागतात. त्यानंतर मोठा साठा झाल्यानंतर काजू बी ची विक्री केली जाते. या वर्षी अडीच टन काजू बीची विक्री करण्यात आली.
* या वर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काजू हंगाम सुरू होता. देशी काजूचा हंगाम मात्र मे अखेरीपर्यंत सुरू होता. या काजूंना पालवी काजूदेखील येतात. २० मेनंतर संपूर्ण बागेतील झाडांखाली पडलेल्या पाल्यापाचोळ्याखाली असलेली काजू एकत्र करण्यात आला.
------------------------------
सचिन विजय कोलते, ९५१८३९४५४३
(शब्दांकन ः एकनाथ पवार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.