Ghonas Caterpillar
Ghonas CaterpillarAgrowon

Ghonas Caterpillar : घोणस अळीविषयीचे गैरसमज व वस्तुस्थिती

अलीकडेच घोणस अळी वा स्लग कॅटरपिलर ही अळी काही भागांत आढळून आली. तिच्याबाबत अनेक गैरसमज व अफवा यांचा प्रसार झाला. मात्र या किडीची शास्त्रीय ओळख करून घेतल्यास वेळेवर तिचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होईल व गैरसमजही दूर होतील.

डॉ. सी. एस. पाटील, डॉ. एस. टी. आघाव, उदय पवार

अलीकडील काळात काही ठिकाणी घोणस अळी (Ghonas Caterpillar) आढळून आली. ही अळी चावा घेत असल्याची अफवा (Ghonas Caterpillar Rumor) पसरल्याने शेतकरी व मजुरांमध्ये कमालीची भीती पसरली असल्याचे दिसून येत आहे. तथापि, या किडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतल्यास गैरसमज दूर होऊन तिचे व्यवस्थापन करणे सहज शक्य होते.

घोणस अळीविषयी

या अळीस इंग्रजीत ‘स्लग कॅटरपिलर’, तर ग्रामीण भागात ‘घुले वा घोणस अळी’ असे म्हटले जाते. ही पतंगांच्या (लिमाकोडीडे) प्रजातीतील बहुभक्षी कीड आहे. सर्वसाधारणपणे आंबा, नारळ, तेलताड, एरंडी, लिंबूवर्गीय फळे, बांधावरील गवत, शोभेच्या वनस्पती व विशेषत: देशी बदाम आदींवर तुरळक प्रमाणात आढळते. असे असले तरी परिसरातील पिकांवर या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास, पानांचा हिरवा भाग खाऊन फक्त शिरा ती शिल्लक ठेवते.

Ghonas Caterpillar
Ghonas Worm : घोणसअळीने चावा घेतला,अन तो थेट रुग्णालयात पोहचला

जीवनक्रम-

जीवनक्रम अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्थांतून पूर्ण होतो. मादी पतंग यजमान वनस्पतींच्या पानांच्या खालच्या बाजूस गोलाकार आकाराची, फिकट पिवळ्या रंगाची १० ते ५० अंडी समूहात घालते. दोन ते चार दिवसांत अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्यांचा रंग पिवळसर, हिरवट असतो. संपूर्ण शरीरावरती बारीक केस वा काटे असतात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या मोहक हिरव्या रंगाच्या असतात.

त्यांच्या शरीरावर संरक्षणासाठी लाल रंगाचे विषारी काट्यांचे चार समूह पाठीकडील बाजूने पुढील व मागील भागात तयार झालेले असतात. पूर्ण वाढलेल्या अळ्या छद्‍मपादांनी (स्युडोलेगस) संथ गतीने चालतात व रेशमासारखा चकचकीत द्रव सोडतात. त्याच्या साह्याने वनस्पतींना घट्ट चिकटून राहतात. अळी अवस्थेचा कालावधी ३० ते ४० दिवसांचा असतो. कोषावस्था करड्या रंगाच्या टणक रेशमी आवरणात ३० ते ३२ दिवसांत पूर्ण होते. किडीचे पतंग हिरवट तपकिरी रंगाचे असतात. पुढील पंखांचा रंग हिरवा तपकिरी असतो, तर मागील पंख पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. नर पतंग २ ते ४ दिवस, तर मादी पतंग ५ ते ८ दिवस जगते.

घोणस अळी बाबतचे गैरसमज व तथ्य

१) घोणस अळी ही नवी कीड नसून आशिया व आग्नेय आशिया खंडातील देशांमध्ये (भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, म्यानमार, चीन, जपान आदी.) आढळणारी सर्वसामान्य प्रजाती आहे. शक्यतो पावसाळ्यात, पावसाच्या परतीला, उष्ण व आर्द्र हवामानात ती दिसून येते. अंगावर बारीक केस असतात. त्याखाली काही विष ग्रंथी असतात. केसातून ते विशिष्ट रसायन किंवा विष स्वसंरक्षणासाठी बाहेर टाकतात.

२) घोणस अळी चावा घेते असे म्हणणे चुकीचे असून, अळीच्या शरीरावरील संरक्षक विषारी काट्यांचा त्वचेशी संपर्क आल्यास दाह होतो. हलके, जळजळणारे पुरळ उठतात किंवा खाज सुटते. अति संवेदनशील व्यक्तींना (ॲलर्जी) जास्त त्रास संभवतो.

३) अळी कुठल्याही प्रकारे पाठलाग करत नाही. उलटपक्षी तिच्या शेंब्यासारख्या संथ चालण्याच्या सवयीमुळे व एकंदर फुगीर आकारामुळे तिला ‘स्लग कॅटरपिलर’ असेही म्हटले जाते.

४)अळीच्या दंशाने अर्धागवायू झाल्याची कुठलीही नोंद नाही. तथापि, विषाच्या तीव्रतेमुळे काही

कालावधीसाठी दंश झालेला भाग बधिर झाल्याने हा गैरसमज पसरला असावा.

५) घोणस अळीचा दंश झाल्याने मृत्यू होतो, असे चित्र काही समाजमाध्यमांतून बिंबवल्याचे काही ठिकाणी दिसून आले होते. शास्त्रीयदृष्ट्या त्याला कुठलाही आधार नाही.

घोणस अळीचे नियंत्रण करताना घ्यावयाची दक्षता

हे करू नये---करावे

१)घोणस अळ्या आकर्षक रंगसंगती व फुगीर आकाराच्या असल्याने कुतूहलापोटी त्यांना स्पर्श करू नये.

2) शेतात काम करत असताना दिसून आल्यास त्यांचा स्पर्श कटाक्षाने टाळावा. त्यासाठी संरक्षक साधनांचा (हातमोजे, संपूर्ण बाह्यांचा अंगरखा) वापर करावा.

3) अळीचा डंख झाल्यास घाबरू नये.

4)डंख झालेल्या जागी तत्काळ कागद चिकट चिटकविण्यासाठी वापरण्यात येणारी चिकट पट्टी हलक्या हाताने लावून पुन्हा काढून घ्यावी. यामुळे अळीचे केस सहजपणे निघून जाऊन दाह कमी होण्यास मदत होते.

5) डंख झालेल्या ठिकाणी कुठलेही तेल किंवा मलम लावणे टाळावे.

6) ज्या ठिकाणी डंख झाला आहे त्या ठिकाणी बर्फ लावावा. खाण्याचा (बेकिंग) सोडा व पाण्याची पेस्ट

करून लावल्यास तात्पुरते वेदनाक्षमन होते.

7) अति वेदना होत असल्यास स्वत: औषधोपचार करू नयेत.

8) वेळ न दवडता जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावेत.

9) नियंत्रणासाठी पिकावर सरसकट रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी.

10) सुरुवातीच्या अवस्थेतील (लहान) अळ्या आढळल्यास पाच टक्के निंबोळी अर्क किंवा

ॲझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (नॅपसॅक पंपाद्वारे). या अळीच्या नियंत्रणासाठी सद्यपरिस्थितीत शिफारशीत रासायनिक कीटकनाशके उपलब्ध नाहीत. मात्र अन्य किडींच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी पुढील कीटकनाशके वापरावीत. प्रमाण १० लिटर व नॅपसॅक पंपासाठी.

-प्रोफेनोफॉस (५० ईसी) २० मिलि

-क्विनॉलफॉस (२५ ईसी)३० मिलि

-क्लोरपायरिफॉस (२० ईसी) २५ मिलि

-इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ४ ग्रॅम

६) अफवा पसरवू नये.

६) अफवांना बळी पडू नये.

संपर्क ः डॉ. सी. एस. पाटील, ९४२०२९१२५२

(डॉ. पाटील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख,

डॉ. आघाव, सहाय्यक प्राध्यापक तर उदय पवार, संशोधन सहयोगी या पदी कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com