
सध्या हळद लागवड (Turmeric Cultivation) होऊन पाच महिन्यांचा कालावधी (१५० दिवस) पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये उगवण आणि शाकीय वाढ (Turmeric Crop Growth) पूर्ण झालेली आहे. उगवण आणि शाकीय वाढ यानंतर पीकवाढीची पुढील दोन महिन्यांची (१५० ते २१० दिवस) अवस्था म्हणजे हळकुंड (Turmeric) फुटण्यास सुरवात होते.
जे नव्याने फुटवे आले असतात त्या फुटव्यांपासून हळकुंड येण्याचा हा कालावधी असतो. यावेळी वातावरणातील तापमानात घट होत असते. साधारणत: २० ते २५ अंश सेल्सिअस तापमानात हळकुंडे फुटत असतात. पिकाच्या योग्य वाढीसाठी सद्यःस्थितीत आंतरमशागतीची कामे वेळेवर करणे गरजेचे आहे. आंतरमशागतीच्या कामांमध्ये खते देणे, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण, फुलांचे दांडे न काढणे इत्यादी महत्त्वाच्या कामांचा समावेश होतो.
आंतरमशागत (भरणी करणे) ः
१) लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी पीक ३ ते ५ पानावर असताना भरणी करावी लागते. सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्डयामधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूच्या गड्डयांना लावणे म्हणजेच भरणी करणे होय. भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकले जातात. त्यांची चांगली वाढ होते.
भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये जवळजवळ १० ते १५ टक्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गादी वाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या साहाय्याने किंवा दोन गादीवाफ्यामधील जागेतील माती मोकळी करून गादीवाफ्यावर भर द्यावी. मजुराच्या खर्चात बचत होण्यास मदत होते. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास भरणी करताना ड्रिपर मातीखाली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
२) जर भरणी केली नसेल तर फुटव्यांपासून नव्याने आलेली हळकुंडे उघडी राहतात. सूर्यप्रकाशात हळकुंडे आल्यास ती हिरवी पडतात आणि वाढ खुंटते. कंदमाशी तसेच कंदकुज रोगाचा प्रसार होतो. त्यामुळे तत्काळ हळकुंडाला मातीची भर लावावी. त्यामुळे हळकुंडांचे चांगले पोषण होते.
खतांचे व्यवस्थापन ः
हळदीला हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश देण्याची शिफारस करण्यात आली आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्यावेळी द्यावयाचे असते. नत्र २ हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावयाचा असतो तर नत्राचा दुसरा हप्ता भरणीच्यावेळी (लागवडीनंतर १०५ दिवसांनी) देण्याची शिफारस आहे. भरणीच्यावेळी हेक्टरी २१५ किलो युरिया, २५ किलो फेरस सल्फेट द्यावे आणि २ टन निंबोळी किंवा करंजी पेंड द्यावी. भरणी करताना खते दिल्यामुळे खते योग्यरीत्या मातीत मिसळली जातात.
शाकीय वाढ पुर्ण झाल्यानंतर हळद पिकास कोणतेही नत्रयुक्त रासायनिक खत जसे की युरिया इत्यादी खत देवू नये. जर युरिया सारखी खते दिली तर हळदीची अतिरिक्त शाकीय वाढ होते. परिणामी पिकाची पुढील अवस्था जसे हळकुंड भरणे, हळकुंडाची जाडी आणि वजन वाढणे लांबणीवर पडते. ज्याठिकाणी पोटॅशयुक्त खतांची कमतरता असेल त्याठिकाणी हेक्टरी १२५ किलो पांढरा पोटॅश द्यावा. त्यामुळे हळकुंडांचे वजन वाढून हळकुंडांना चकाकी येते.
रुंद वरंबा पद्धतीमधील व्यवस्थापन ः
१) रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचे नियोजन करावे. ठिबक सिंचनाच्या वापरामुळे पाण्याचा अपव्यय टळून जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. परिणामी मुळांपाशी वाफसा लवकर आणि जास्त प्रमाणात तयार होतो, सूक्ष्मजीवांच्या क्रिया सुधारतात, मातीची सच्छिद्रता वाढते, जलधारण क्षमता वाढते. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढते, परिणामी अन्नद्रव्यांचे वहन सुलभ होऊन हळद पिकांच्या मुळाद्वारे शोषण अधिक होते. पाने लवकर मोठी होतात, हळद उत्पादनात वाढ होते. हळदीचा मुख्य गुणवत्ता घटक कुरकुमीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
२) दोन लॅटरमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. दोन तोट्यामधील अंतर जमिनीच्या प्रतीनुसार ठेवावे. रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते.
३) मातीचे प्रमाण, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी यांचे संतुलन राखावे. जमिनीत केवळ मातीचे कण राहिले तर जमीन कोरडी होईल त्यामुळे मुळांच्या वाढीला वाव मिळणार नाही. जमिनीत पाणी जास्त झाले तर जरुरीहून जास्त ओलेपणा (चिखल) होईल, परिणामी कंद कुजण्याचे प्रमाण वाढेल. ज्या जमिनीत मातीचे प्रमाण ४५ टक्के, सेंद्रिय पदार्थ ५ टक्के , हवा आणि पाणी प्रत्येकी २५ टक्के असते अशा जमिनीत पिकाची वाढ चांगली होते.
४) हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळीमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. शिफारशीत मात्रेपेक्षा पाण्याचे प्रमाण कमी पडले तर कंदाची योग्य वाढ होत नाही, प्रक्रियेनंतर अशा हळकुंडांचा रंग फिका पडतो, चमक घटते. परिणामी विक्री करताना दर कमी मिळतो. आठ महिने होईपर्यंत जमिनीच्या मगदूराप्रमाणे पिकास पाणी देत रहावे. कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज मर्यादित होत जाते.
संपर्क ः ०२३३-२४३७२७४
(कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि.सांगली)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.