Cotton Pest : कपाशीवरील फुलकिड्यांचे व्यवस्थापन
डॉ. बस्वराज भेदे, डॉ. खिजर बेग, गणेश सोनुले
Cotton Thrips Management : सध्या कपाशीवर नियमित येणाऱ्या (थ्रिप्स टॅबॅकी) आणि नवीन फुलकिडीच्या (थ्रिप्स पार्विस्पिनस) प्रजातीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. पोषक वातावरणामुळे पिकावर प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे प्रत्यक्ष नुकसान होतेच शिवाय ‘टोबॅको स्ट्रिक’ या विषाणूचा प्रसारदेखील होतो. त्यामुळे कपाशीवरील फुलकिडींचा प्रादुर्भाव ओळखून तत्काळ उपाययोजना कराव्यात.
कपाशीवरील फुलकिडीच्या प्रजाती ः
- कपाशीवरील किंवा कांद्यावरील फुलकिडे (थ्रिप्स टॅबॅकी)
- तैवानी किंवा दक्षिण पूर्व आशियायी फुलकिडे (थ्रिप्स पार्विस्पिनस)
ओळख :
कपाशीवरील किंवा कांद्यावरील फुलकिडे ः
- अत्यंत लहान व नाजूक असून १ मि.मी.पेक्षा कमी लांब असतात.
- रंगाने फिक्कट पिवळसर किंवा तपकिरी असतात.
- सूक्ष्मदर्शी खाली पाहिल्यानंतर किडीच्या पंखांच्या कडा केसाळ दिसतात.
- किडीची पिले सूक्ष्म असून त्यांना पंख नसतात.
- पानाच्या मागील बाजूला आढळून येते.
तैवानी किंवा दक्षिण पूर्व आशियायी फुलकिडे ः
- ही प्रजाती दोन वर्षांपासून दक्षिण भारतात मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात येत आहे.
- किडीच्या प्रौढ मादीचे शरीर गडद तपकिरी रंगाचे असून डोके व धड मागील शरीरपेक्षा फिक्कट असते. पाय पिवळ्या रंगाचे असतात.
- प्रौढ नर मादीपेक्षा आकाराने लहान व पिवळ्या रंगाचे असतात.
- ही प्रजाती प्रामुख्याने फुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसते.
जीवनक्रम ः
- पूर्ण वाढ झालेली मादी पानाच्या पेशीत अंडी देते. ही अंडी पानाच्या मागच्या भागात असतात.
- एक मादी ३० ते ४० अंडी देते. अंडी आकाराने खूप लहान असतात.
- अंड्यातून २ ते ५ दिवसांत पिले बाहेर येतात. पिले पांढरट ते फिक्कट पिवळसर रंगाची असतात.
- पिलावस्था ४ ते ६ दिवसांची असते.
- पिले ही प्रौढ फुलकिड्यासारखीच दिसतात, पण त्यांना पंख नसतात.
- पिलांची शेवटची अवस्था जवळपास २० तास जमिनीत कोषावस्थेप्रमाणे निश्चल राहते.
- पिल्ले तीन वेळा कात टाकून ५ ते ६ दिवसांत प्रौढ अवस्थेत पोहोचतात.
- पूर्ण वाढ झालेला फुलकिडा १० ते १५ दिवस जगतो.
- किडीच्या एका वर्षात साधारण ३ ते ४ पिढ्या पूर्ण होतात.
नुकसानीचा प्रकार ः
- किडीची पिले आणि प्रौढ कापूस पिकाच्या पानामागील भाग खरवडून त्यातून रस शोषण करतात.
- प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होऊन प्रथम पांढुरक्या आणि नंतर तपकिरी रंगाच्या होतात.
- पाने, फुले व कळ्या आकसतात. झाडाची वाढ खुटंते.
- जास्त प्रादुर्भावामध्ये पाने व झाड काळपट-तपकिरी दिसते.
- कोरडवाहू कपाशीवर किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून सुरू होतो. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात जास्त प्रादुर्भाव आढळून येतो.
- कापूस पिकाशिवाय मिरची, द्राक्ष, तोंडली, दुधी भोपळा, पेरु इत्यादी पिकांमध्ये किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
आर्थिक नुकसान पातळी : १० फुलकिडे प्रति पान
व्यवस्थापन ः
- कपाशी लागवड शिफारशीप्रमाणे योग्य अंतरावर करावी. पिकामध्ये जास्त दाटी झाल्यास फुलकिड्याचा प्रादुर्भाव वाढतो.
- शिफारशीपेक्षा जास्त नत्रयुक्त रासायनिक खतांचा आणि संप्रेरकांचा वापर करू नये.
- कोळपणी व खुरपणीची कामे वेळेवर करून तण नियंत्रण करावे. तसेच किडीच्या पिलांची शेवटची अवस्था जमिनीत कोषावस्थेप्रमाणे निश्चल राहते. ही अवस्था कोळपणी व खुरपणी केल्यामुळे नष्ट होते.
- रासायनिक कीटकनाशकासोबत विद्राव्य खते, संप्रेरके, एकापेक्षा जास्त कीटकनाशके यांचे मिश्रण करू नये.
रासायनिक फवारणी ः (प्रमाण ः प्रति १० लिटर पाणी)
- फ्लोनीकॅमीड (५० डब्ल्यूजी) ३ ग्रॅम किंवा
- स्पायनेटोरम (११.७ एससी) ८ मिलि किंवा
- बुप्रोफेझीन (२५ एससी) २० मिलि किंवा
- डायनोटेफ्युरॉन (२० एसजी) ३ ग्रॅम किंवा
- फिप्रोनील (५ एससी) ३० मिलि
- फिप्रोनील (१८.८७ एससी) ७.५ मिलि किंवा
- डायफेन्थुरॉन (५० डब्ल्यूपी) १२ ग्रॅम
महत्त्वाचे...
-कीटकनाशकांचे वरील प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठी (उदा. नॅपसॅक पंप) आहे.
- फवारणी करताना सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी.
- एका वेळी एकाच कीटकनाशकाची फवारणी करावी.
- गरजेनुसार कीटकनाशकाची आलटून-पालटून फवारणी करावी.
डॉ. बस्वराज भेदे, ७५८८०८२०२८, ९८९०९१५८२४
(कीटकशास्त्रज्ञ, कापूस संशोधन केंद्र, नांदेड,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.