Sugarcane Weed Control : उसामधील लव्हाळा तणाचे व्यवस्थापन

Weed Control : रासायनिक तणनाशकाची फवारणी व कोळपणी एका आड एक महिन्याच्या अंतराने एक ते दोन वेळा केल्यास लव्हाळा तणाचे प्रभावी नियंत्रण केले जाऊ शकते. शेतातील काडीकचरा व उसाच्या पाचटाचे आच्छादन केल्याने लव्हाळ्याचा प्रादुर्भाव कमी होतो. लव्हाळा हे तण सावलीमध्ये फारसे वाढत नाही.
Sugarcane
SugarcaneAgrowon

डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. गणेश पवार, डॉ. अशोक कडलग

Lavala Weed Control : रासायनिक तणनाशकाची फवारणी व कोळपणी एका आड एक महिन्याच्या अंतराने एक ते दोन वेळा केल्यास लव्हाळा तणाचे प्रभावी नियंत्रण केले जाऊ शकते. शेतातील काडीकचरा व उसाच्या पाचटाचे आच्छादन केल्याने लव्हाळ्याचा प्रादुर्भाव कमी होतो. लव्हाळा हे तण सावलीमध्ये फारसे वाढत नाही. त्यामुळे आंतरपीक म्हणून द्विदलवर्गीय पिकांचा ऊस पीक पद्धतीमध्ये समावेश करावा. द्विदल पिके झपाट्याने वाढून जमीन आच्छादून टाकतात. याचा तणांच्या उगवण व वाढीवर परिणाम होतो.

ऊस पिकामध्ये तणनियंत्रण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. योग्य वेळी तणनियंत्रण न केल्यास उत्पादनात सरासरी १२ ते ७२ टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता असते. पीकवाढीच्या सुरुवातीच्या काळात तण नियंत्रण न केल्यास ऊस उत्पादनात प्रति हेक्टरी १७.५ टन एवढी घट येऊ शकते. त्याशिवाय ऊसतोडणी किंवा काढणीचा खर्च अतिरिक्त वाढतो. पहिल्या सात आठवड्यांमध्ये ऊस पिकात तणांमुळे नत्र ४ टक्के आणि स्फुरद व पालाशमध्ये २.५ टक्के पालाश इतकी खतमात्रा ही जमिनीतून घेतली जाते.

त्यामुळे रासायनिक खतांच्या कार्यक्षमतेत घट येऊन पिकास खतांच्या दिलेल्या मात्रा वाया जातात. ऊस पिकामध्ये सुरुवातीची १२० दिवसांपर्यंतचा काळ हा अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे या अवस्थेत तणनियंत्रण अत्यंत आवश्यक असते. ऊस लागवडीमध्ये विशेषतः लव्हाळा या तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे लागवडीच्या सुरुवातीपासूनच तण नियंत्रणासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

Sugarcane
Integrated Weed Management : अमरवेल तणाचे एकात्मिक व्यवस्थापन

ओळख ः
- लव्हाळा किंवा नागरमोथा हे बहुवार्षिक तण आहे. या तणाच्या प्रामुख्याने पिवळा लव्हाळा म्हणजेच सायप्रस  इसक्युलन्ट्स cyperus esculentus) आणि जांभळा लव्हाळा, अर्थात सायप्रस रोटून्डस (Cyperus rotundus) असे दोन प्रकार पडतात.
- जांभळ्या प्रकारच्या लव्हाळ्याचे कंद जमिनीमध्ये थोड्या खोलीवर असतात. लव्हाळ्याच्या कंदाची साखळी तयार होऊन जमिनीत ४५ ते ६० सेंमी खोलीपर्यंत पसरते. तर पिवळ्या लव्हाळ्यात जमिनीमध्ये कंद नसतात. त्या ऐवजी मुकुटासारखे लहान कोंब येतात. त्यातून लहान मुळे येऊन शेवटी टोकाला लहान कंद तयार होतात. जमिनीची मशागत करून लव्हाळ्याचे मातृझाड नष्ट केल्यानंतर त्याच्या मुकुटातील कोंबामधून नवीन लव्हाळा फुटतो.
- पिवळ्या लव्हाळ्याचा प्रसार हा प्रामुख्याने बियांमार्फत होतो. या बियांची उगवणक्षमता ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत असते. याचे कंद आकाराने लहान व हळूहळू वाढतात. तर जांभळ्या लव्हाळ्याच्या बियांची उगवणक्षमता २ ते १० टक्के एवढीच असते. याचे कंद आकाराने मोठे असून झपाट्याने वाढतात.

Sugarcane
Cotton Weed Control : कापूस पिकातील आंतरमशागत, तण नियंत्रण

- सुरुवातीच्या पहिल्या महिन्यामध्ये जांभळ्या लव्हाळ्याच्या मातृकंदापासून ४ नवीन कंद तयार होतात. आणि तिसऱ्या महिन्यापर्यंत कंदांची संख्या १०० पर्यंत पोहोचते. त्यामुळे जांभळा लव्हाळा हा पिवळ्या लव्हाळ्याच्या तुलनेत अधिक नुकसानकारक ठरतो.
- मध्यम व हलक्या जमिनीमध्ये लव्हाळ्याचा प्रादुर्भाव खोल व काळ्या जमिनीपेक्षा अधिक असतो.

एकात्मिक तणनियंत्रण पद्धती ः
कोणतेही पीक व मशागत नसलेल्या जमिनीमध्ये एका हंगामात लव्हाळ्याचे साधारणतः १० ते ३० दशलक्ष कंद तयार होतात. त्यामुळे हे तण जास्त नुकसानकारक म्हणून ओळखले जाते. या तणाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीचा अवलंब अत्यंत उपयुक्त ठरतो. पारंपरिक पद्धतीमध्ये उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट करावी. त्यामुळे २ ते ३ आठवड्यांत लव्हाळा तणाचे कंद उघडे पडून सुकून नष्ट होतात. सलग २ ते ३ वेळा वखरणी केल्यास देखील कंद नष्ट होण्यास मदत होते.

रासायनिक नियंत्रण ः
१) उगवणपूर्व (प्रमाण ः प्रति एकर)
मेट्रिब्युझीन (७० टक्के डब्ल्यू.पी.) ४०० ग्रॅम किंवा
डायुरॉन (८० टक्के डब्ल्यू.पी) ८०० ग्रॅम किंवा
सल्फेनट्रॉझोन (३९.६ एस. सी.) ६०० मिलि
- निवडक प्रकारातील तणनाशक,
हॅलोसल्फुरॉन मिथाईल (७५ टक्के डब्ल्यूजी) ३६ ग्रॅम प्रति एकर प्रमाणे तण २ ते ३ पानांवर असताना फवारणी करावी किंवा
२, ४ डी अमाइन सॉल्ट (५८ टक्के एस.एल.) २.५० लिटर प्रति एकर

२) पीक लागवड नसलेल्या क्षेत्रामध्ये तण उगवणीनंतर (आंतरप्रवाही तणनाशक),
ग्लायफोसेट ८०० मिलि प्रति एकरी या प्रमाणे वापर केल्यास परिणामकारक ठरते.
(लेबल क्लेम आहेत.)

घ्यावयाची काळजी ः
रासायनिक तणनाशकाची फवारणी व कोळपणी एका आड एक महिन्याच्या अंतराने एक ते दोन वेळा केल्यास लव्हाळा तणाचे प्रभावी नियंत्रण केले जाऊ शकते. त्याचबरोबर शेतातील काडीकचरा व उसाच्या पाचटाचे आच्छादन केल्याने लव्हाळ्याचा प्रादुर्भाव कमी होतो. लव्हाळा हे तण सावलीमध्ये फारसे वाढत नाही. त्यामुळे आंतरपीक म्हणून द्विदलवर्गीय पिकांचा ऊस पीक पद्धतीमध्ये समावेश करावा. द्विदल पिके झपाट्याने वाढून जमीन आच्छादून टाकतात. याचा तणांच्या उगवण व वाढीवर परिणाम होतो.
-------------------
- डॉ. अभिनंदन पाटील, ९७३७२७५८२१
- डॉ. गणेश पवार, ९६६५९६२६१७
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com