Soil Health : कमी पाऊस, चुनखडीयुक्त मातीमधील व्यवस्थापन

Grape Advisory : ज्या भागात गरजेपेक्षा कमी पाऊस झालेला आहे, अशा ठिकाणी द्राक्ष बागेमध्ये काही अडचणी येणे स्वाभाविक आहे. या ठिकाणी फक्त पाण्याचीच अडचण येईल असे नाही, तर पाण्यातील उपलब्ध असलेले अधिक क्षार हीही महत्त्वाची समस्या असते.
Soil Health
Soil HealthAgrowon
Published on
Updated on

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय

Grape Management : वातावरणाचा अंदाज घेताना येणाऱ्या आठवड्यात पावसाची उघडीप राहून वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच द्राक्ष विभागातील सध्याच्या परिस्थिती व एकूणच वातावरणाचा आढावा घेतला असता बऱ्याच भागांमध्ये अजूनही अपेक्षित गरजेइतकाही पाऊस पडलेला नसल्याचे दिसून येते. उदा. सांगली जिल्ह्यातील जत आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका. विशेषतः जत तालुक्यातील द्राक्ष शेती ही प्रामुख्याने बेदाणा निर्मितीसाठी व थोड्या प्रमाणात स्थानिक बाजारपेठेसाठी केली जाते. या तालुक्यात दरवर्षी पाऊस कमी पडत असला तरी या वर्षी त्याही पेक्षा कमी पाऊस पडल्याचे बागायतदारांकडून कळते. इंदापूर तालुक्यात प्रामुख्याने काळ्या द्राक्ष जातींची (नानासाहेब पर्पल, कृष्णा सीडलेस व सरिता सीडलेस इ.) तर थोड्या प्रमाणात हिरव्या जाती (थॉमसन आणि माणिक चमन इ.) याची प्रामुख्याने द्राक्ष शेती केली जाते. हा आगाप छाटणीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये फळछाटणीही जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते.

अन्नद्रव्य व्यवस्थापन ः
ज्या भागात गरजेपेक्षा कमी पाऊस झालेला आहे, अशा ठिकाणी द्राक्ष बागेमध्ये काही अडचणी येणे स्वाभाविक आहे. या ठिकाणी फक्त पाण्याचीच अडचण येईल असे नाही, तर पाण्यातील उपलब्ध असलेले अधिक क्षार हीही महत्त्वाची समस्या असते. बागेतील पाण्यामध्ये क्षार असलेल्या परिस्थितीमध्ये बागेमध्ये सिंचनाद्वारे हेच क्षार जमा होऊन राहतात. ज्या वर्षी चांगला पाऊस होतो, त्या वेळी पावसाचे पाणी बोदातून निचरा होऊन जाते. या पाण्यासोबत बोदातील जमा झालेले क्षारही वाहून जातात. मात्र कमी पाऊस झालेल्या परिस्थितीत उपलब्ध क्षार तसेच मुळांच्या कक्षेमध्ये राहतात. त्यांचा निचरा होत नाही. त्याचे विपरीत परिणाम वेलीच्या वाढीवर होताना दिसतात. पाने करपणे, पाने सुकणे, वाढ थांबणे इ. महत्त्वाच्या अडचणी या बागेत दिसतात. या बागेत फुटींची वाढ व्यवस्थित होत नाही. फुटीच्या पेऱ्यातील अंतर कमी राहणे, पानांचा आकार कमी असणे, व काडीची परिपक्वता लवकर येणे इ. गोष्टी आढळून येतील. या बागेमध्ये सूक्ष्मघड निर्मिती मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसते.

Soil Health
Soil Nutrient Management : चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन कसे करणार?

या बागेत छाटणी घेण्यापूर्वी बोद व्यवस्थितरीत्या खोदून घ्यावेत. नवीन तयार झालेल्या बोदामध्ये छोटी चारी तयार करावी. बोदामध्ये अशा प्रकारे पाणी द्यावे की बोदामधील पूर्ण पाणी बाहेर निघून जाईल. त्याच सोबत त्यामधील क्षारसुद्धा निघून जाऊन मुळांच्या कक्षेतील वातावरण स्वच्छ होईल. ज्या बागेत पाऊस भरपूर झालेला असेल, अशा ठिकाणी मुळांच्या कक्षेतून क्षार तसाही निघून गेला असेल. मात्र ज्या ठिकाणी बोद तयार झालेले नाहीत, व सपाट जमीन आहे, अशा ठिकाणी मात्र पाऊस जास्त होऊनही चांगले परिणाम मिळत नाहीत. अशा बागेत छाटणीपूर्वी बोद तयार करून घ्यावेत. दोन ओळीमध्ये नांगराच्या साह्याने चारी घ्यावी. जेणेकरून या बोदातील क्षारवट पाणी निघून येईल.

चुनखडी असलेल्या बागेत मात्र पाऊस जास्त झालेला असला तरी उपाययोजना महत्त्वाच्या असतील. या बागेत छाटणीपूर्वी शेणखतामध्ये सल्फर मिसळून बोदामध्ये द्यावे. ही उपाययोजना न केल्यास चुनखडी असलेल्या बागेत अधिक समस्या येऊ शकतात. अशा बागेत फळछाटणीनंतर मणी सेटिंग एकसारखे होत नाही, पुढील काळात एकाच घडात कमी अधिक आकाराचे मणी दिसून येतात. फुटींची वाढ व्यवस्थित होत नसल्यामुळे पेऱ्यातील अंतर कमी राहील. पानांचे आकारही कमी राहतील. यामुळे प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक तितके पानांचे क्षेत्रफळ नसल्यामुळे अन्नद्रव्यांचा साठा निर्माण करता येत नाही. बऱ्याच परिस्थितीत पानांच्या वाट्या झालेल्या दिसून येतील. ही परिस्थिती पालाशच्या कमतरतेमुळे असू शकेल. त्यावर मात करण्यासाठी चुनखडी असलेल्या जमिनीमध्ये योग्य प्रमाणात सल्फर मिसळून घेणे गरजेचे असेल. या बागेत पालाश व मॅग्नेशिअम यांच्या प्रत्येकी ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे चार दिवसाच्या अंतराने दोन वेगवेगळ्या फवारण्या करून घ्याव्यात.

Soil Health
Soil Management : चुनखडीयुक्त जमीन कशी सुधाराल?

काडीची परिपक्वता ः

ज्या बागेत पाऊस बऱ्यापैकी झाला, आणि आता काडी परिपक्वतेचा कालावधी आहे अशा ठिकाणी जमिनीनुसार काडीच्या परिपक्वतेची परिस्थिती बदलेल. भारी जमिनीत पाणी जास्त धरून राहत असल्यामुळे ओलावा जास्त काळ टिकून राहतो. परिणामी, आर्द्रता जास्त वाढून, वेलीच्या वाढीचा जोमही तितकाच वाढतो. यामुळे काडीची परिपक्वता लांबणीवर जाते. अशा प्रकारच्या बागेत फळछाटणी घेतल्यास गोळीघडाचे प्रमाण जास्त राहू शकते. काडी जितकी तपकिरी झाली असेल व त्यामधील पिथही तपकिरी रंगाचा असेल, तितकाच चांगला घड निघण्याची शाश्‍वती असते. यासाठी पाऊस किंवा ढगाळी वातावरणात वेलीच्या वाढीचा जोम नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी शेंडा पिंचिंग करणे, डबलफुटी काढणे, ठिबकच्या पाण्यावर नियंत्रण ठेवणे, पालाशची उपलब्धता फवारणी तसेच जमिनीतून करणे या उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील. ०-०-५० हे खत ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे तीन ते चार फवारण्या तीन दिवसांतून एक या प्रमाणे फवारण्या करून घ्याव्यात. यामुळे वेलीची वाढ नियंत्रणात राहण्यास मदत होते. वेलीतील सायटोकायनीनचे प्रमाण वाढेल.

फळछाटणीपूर्वी माती व पाणी परीक्षण महत्त्वाचे
बऱ्याचशा बागेत चुनखडी कमी अधिक प्रमाणात आढळून येते. चुनखडीचे प्रमाण ३ टक्क्यांपासून २२ टक्क्यांपर्यंत आढळते. काही बागेमध्ये पाण्यामध्ये क्षारही तितक्याच मात्रेत दिसून येतात. यामुळे वेलीच्या वाढीवर फळछाटणीनंतर उत्पादनावर परिणाम होताना दिसून येतात. फळछाटणीपूर्वी जर पाणी आणि माती परिक्षण केल्यास मात्र या अडचणीवर मात करणे शक्य आहे. माती परीक्षणासाठी नमुना घेतेवेळी ड्रीपरपासून १० सेंमी पुढे जवळपास एक फूट खोल खड्डा घेऊन त्यामधून माती घ्यावी. अशा प्रकारे एका एकरातून पाच ते सहा खड्ड्यांतील माती व्यवस्थित एकत्र करावी. चांगल्या मिसळून एकत्र केलेल्या मातीपैकी अर्धा किलो माती प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावी. पाण्याचा नमुना घेतेवेळी मात्र सुरुवातीला १५ ते २० मिनिटे पंपाचे पाणी बाहेर जाऊ द्यावे, त्यानंतर पाणी एका बाटलीमध्ये जमा करावे. असे केल्यामुळे बागेतील पाणी व माती यांची सध्याची परिस्थिती कशी आहे, याचा अंदाज मिळू शकेल. त्यानुसार पुढील उपाययोजना करणे सोपे होईल.

फळछाटणीपूर्वी काडी तपासणी केल्यास छाटणीतील त्रुटी टाळता येतील. यासाठी एक एकर बागेतून साधारणतः ५ ते ६ ठिकाणांवरून काड्या गोळा कराव्यात. प्रत्येक जाडीच्या (६ ते ८, ८ ते १० आणि १० ते १२ मि.मी.) सात, आठ काड्या तळातून एक डोळा सोडून कापून काढाव्यात. या काड्या ओल्या गोणपाटात गुंडाळून प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाखाली तपासणीसाठी पाठवाव्यात. काडी जितकी ओली असेल, तितका डोळा तपासणे सोपे होते.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com