मयूरी देशमुख
Soil Management : मागील भागामध्ये आपण चुनखडीयुक्त जमिनीचे (Lomy Soil) गुणधर्म आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांची माहिती घेतली. त्याच प्रमाणे अशा जमिनीमध्ये नत्राचे व्यवस्थापन (Nitogen) जाणून घेतले. या भागामध्ये स्फुरद, पालाश (Potassium), मॅग्नेशिअम (Magnesium), गंधक ( आणि लोह अशा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन पाहू.
स्फुरदाचे व्यवस्थापन ः
स्फुरदाची उपलब्धता जमिनीचा सामू ६ ते ७.५ च्या दरम्यान असताना अधिक असते. चुनखडीयुक्त जमिनीचा सामू ७.५ पेक्षा जास्त असल्याने पिकांना पुरेसा स्फुरद उपलब्ध होत नाही.
त्याचे रूपांतर अत्यंत कमी विद्राव्य अशा फॉस्फेट, मॅग्नेशिअम फॉस्फेट या संयुगामध्ये होते. यालाच स्फुरदाचे स्थिरीकरण म्हणतात. फॉस्फेट संयुग पोयट्याच्या किंवा चुन्याच्या कणांवर बसते. त्यातून डाय कॅल्शिअम फॉस्फेट, ऑक्टा कॅल्शिअम फॉस्फेट तयार होते.
ज्या प्रमाणात जमिनीचा सामू वाढत जातो, त्या प्रमाणात संयुगे होण्याची क्रिया वाढते. स्फुरद पिकांना उपलब्ध होत नाही. त्यासाठी स्फुरद खतांची मात्रा वाढविणे आणि जमिनीस स्फुरद विद्राव्य जिवाणूंचा पुरवठा करणे हा पर्याय ठरतो.
उपाययोजना
-सतत चुनखडी जमिनीत सुपर फॉस्फेट, डाय अमोनिअम फॉस्फेटसारख्या खतातून स्फुरद देऊ नये. कारण त्याची विद्राव्य क्षमता अत्यंत कमी असल्यामुळे स्थिरीकरण होते.
-स्फुरदयुक्त खते, दाणेदार तसेच सेंद्रिय खतांसोबत द्यावीत. त्यामुळे खतांचा जमिनीतील कणांशी कमी संपर्क व संयोग होतो आणि अविद्राव्यता कमी होते.
-मुळांची वाढ वेगाने होत असताना स्फुरदयुक्त खतांचा पुरवठा आवश्यक आहे. चुनखडीयुक्त जमिनीत घेतलेल्या संत्रा, मोसंबीसारख्या पिकांना दरवर्षी नियमितपणे स्फुरदयुक्त खत देणे आवश्यक आहे.
पालाश आणि मॅग्नेशिअमचे व्यवस्थापन
मातीतील जास्त कॅल्शिअममुळे मॅग्नेशिअम व पालाशची कमतरता पिकांमध्ये दिसून येऊ शकते. याचे प्रमुख कारण जमिनीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण, पालाश व मॅग्नेशिअमपेक्षा जवळपास ८० टक्के जास्त असते. त्यातच मॅग्नेशिअमचे प्रमाण अंदाजे फक्त ४ टक्केच असल्याने मॅग्नेशिअम व पालाशचे शोषण कॅल्शिअमच्या तुलनेत कमी होते.
पिकांमध्ये या मूलद्रव्यांची कमतरता दिसून येते. चुनखडीयुक्त मातीत थेट खते टाकून पानांचे मॅग्नेशिअम आणि पालाश पातळी वाढवणे अनेकदा कठीण असते. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये उपलब्ध पालाश आणि मॅग्नेशिअम पुरेशा प्रमाणात दिसून येतात.
कारण या जमिनी तयार होत असतानाच खनिजांची झीज होऊन विनिमयक्षम पालाश आणि मॅग्नेशिअमची भर पडते. कमी पावसामुळे पाण्याद्वारे ही अन्नद्रव्ये वाहून जात नाहीत.
या मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि पालाश या अन्नद्रव्यामध्ये असमतोल निर्माण होतो. द्राक्ष पिकामध्ये पालाश आणि कॅल्शिअम एकमेकांच्या विरुद्ध कार्य करतात. यामध्ये पालाशचे शोषण कमी होते व द्राक्ष मण्यांना पालाशचा पुरवठा कमी झाल्याने द्राक्ष मणी जास्त आम्लधर्मी होतात.
उपाययोजना
-जमिनीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असेल, तर अशा जमिनींना मॅग्नेशिअम आणि पालाशच्या शिफारशीत मात्रेपेक्षा जास्त मात्रा द्यावी.
-इतर मॅग्नेशिअमयुक्त खते देऊन पानातील मॅग्नेशिअमचे प्रमाण चुनखडीयुक्त जमिनीमध्ये वाढवता येत नाही. त्यामुळे पालाश, मॅग्नेशिअम सल्फेटसारखी विद्राव्य खते फवारणीद्वारे वापरणे जास्त योग्य आहे.
-पालाशची उपलब्धता सुधारण्यासाठी विद्राव्य पालाशयुक्त खतांचा (उदा. सल्फेट ऑफ पोटॅश, पोटॅशिअम नायट्रेट इ.) वापर ठिबकद्वारे अनेक वेळा विभागून करावा. पालाशयुक्त खतांच्या तीन ते चार फवारणीची शिफारस केली जाते.
-विद्राव्य मॅग्नेशिअम खते (उदा. मॅग्नेशिअम सल्फेट, मॅग्नेशिअम नायट्रेट इ.) एकापेक्षा अधिक वेळा विभागून ठिबकद्वारे द्यावीत. मॅग्नेशिअमची उपलब्धता सुधारण्यासाठी ३ ते ४ फवारणी करण्याची शिफारस केली जाते.
गंधक (सल्फर) व्यवस्थापन
मातीतील कॅल्शिअम कार्बोनेटचे उदासीकरण आणि मातीचा सामू कमी करण्यासाठी सर्वात किफायतशीर घटक म्हणजे सल्फर गंधक (सल्फर). सल्फरची मातीच्या ओलाव्याशी प्रक्रिया होऊन सल्फ्युरिक ॲसिड तयार होते त्यामुळे कॅल्शिअम कार्बोनेट उदासीन होतो.
मातीचा सामू कमी होतो. जमिनीमध्ये कॅल्शिअम कार्बोनेटचे प्रमाण ८ ते १० टक्के असल्यास सल्फर ७५ ते १०० किलो प्रति एकर याप्रमाणे २ ते ३ वर्षे नियमित वापरावे.
बागेमध्ये बांधावर सल्फर टाकू नये. सल्फरचे ॲसिडमध्ये रूपांतर हे सूक्ष्म जैविक पद्धतीने होते. ते अधिक कार्यक्षमपणे होण्यासाठी सल्फर हे शेणखत किंवा कंपोस्ट खतांमध्ये व्यवस्थित मिसळून घेतल्यानंतर पिकाच्या मुळांच्या कक्षेमध्ये टाकावे.
लोह व्यवस्थापन
सामू अधिक असणे, चुन्याचे अधिक प्रमाण आणि सक्रिय चुन्यामुळे जमिनीत लोहाची कमतरता जाणवते. ज्या ठिकाणी लोह क्लोरोसिसची समस्या आहे, तिथे फेरस सल्फेट २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे ३ ते ४ फवारण्या घ्याव्यात.
त्यानंतर फेरस सल्फेट २५ ते ३० किलो प्रति एकर एकापेक्षा अधिक वेळा विभागून द्यावे. दुसऱ्या पर्याय म्हणजे लोह चिलेटेड स्वरूपात जमिनीत वापरावे. चिलेट कार्बोनेट लोहाची प्रक्रिया होऊ देत नसल्यामुळे त्याची उपलब्धता वाढवते.
जस्त (झिंक) व्यवस्थापन
मातीचा सामू अधिक असल्यामुळे चुनखडीयुक्त जमिनीत जस्ताची उपलब्धता कमी होते. जस्तापासून उपलब्ध न होणाऱ्या झिंक हायड्रॉक्साइड आणि झिंक कार्बोनेट या सारखे अवक्षेपण बनतात.
चिलेटेड झिंक हे झिंक सल्फेट सारख्या अजैविक स्वरूपापेक्षा सावकाश विरघळते आणि तितका काळ वनस्पतीसाठी उपलब्ध राहते. झिंक सल्फेट ठिबकद्वारे एकापेक्षा अधिक वेळा विभागून द्यावे. झिंक सल्फेट प्रति एकर १५ ते २० किलो द्यावे.
बोरॉन व्यवस्थापन
सामान्यतः ५.५ ते ७.५ सामू असलेल्या जमिनीमध्ये बोरॉनची उपलब्धता सर्वात अधिक होते. मात्र कॅल्शिअमची पातळी वाढलेली असताना सामूही वाढतो. अशा स्थितीमध्ये बोरॉनचे पिकाकडून शोषण कमी होते.
चुनखडीयुक्त जमिनीत करावयाच्या उपाययोजना ः
-अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनासाठी मातीचा योग्य नमुना घेऊन माती परीक्षण करून घेणे. त्यानुसार पिकांच्या शिफारशीनुसार आवश्यक त्या खतांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
-अमोनियमयुक्त व युरिया खते ताबडतोब मुळाशी गेली पाहिजेत. त्यासाठी जमिनीमध्ये ओलावा नसेल तर खते दिल्यानंतर पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे.
-स्फुरदाची योग्य मात्रा नियमितपणे पिकांना देणे गरजेचे आहे. त्यासाठी स्फुरद विद्राव्य जिवाणूंचा वापर फायदेशीर ठरतो.
-चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पिकांना मॅग्नेशिअम व पालाशची गरज भासते. त्यासाठी मॅग्नेशिअम सल्फेट आणि पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी फायद्याची ठरते.
-जस्त आणि मँगेनीजची कमतरता कमी करण्यासाठी या अन्नद्रव्यांची खताद्वारे (०.५ टक्का) दोन ते तीन वेळा फवारणी करावी.
-चुनखडीयुक्त जमिनीत लोहाच्या कमतरतेचा अनिष्ट परिणाम होतो. तो कमी करण्यासाठी लोहाची (१ ते २ टक्के) फवारणी फायदेशीर आहे.
-गंधक आणि गंधकयुक्त पदार्थाचा सेंद्रिय खतांसोबत वापर करावा. त्यातून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
- सेंद्रिय पदार्थांचा (उदा. कंपोस्ट, शेणखत इ.) वापर केल्याने चुन्याची दाहकता कमी होऊन अन्नद्रव्य उपलब्धतेमध्ये वाढ होते.
मयूरी देशमुख, ९२८४५२२२८४, (सहायक प्राध्यापक, मृद् विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.