रब्बी तेलबिया (Rabi Oilseed) पिकांमध्ये मोहरी एक महत्त्वाचे कमी खर्चाचे व जास्त फायद्याचे पीक आहे. महाराष्ट्रातील रब्बी हंगामात असलेले १० ते ३० अंश सेल्सिअस तापमान या पिकाला पोषक आहे आणि सध्या बदलत्या वातावरणामध्ये या पिकाला भरपूर वाव आहे. मोहरी हे गहू, हरभरा आणि जवस या पिकामध्ये आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते. मोहरी पिकाचे अधिक उत्पन्न मिळण्याकरिता अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (जवस आणि मोहरी), कृषी महाविद्यालय, नागपूर येथील तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहुया.
जमिनीची निवड
मोहरी पिकाच्या दमदार वाढीच्या दृष्टीने मध्यम ते भारी प्रकारची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. खरीप पिकाची काढणी झाल्यानंतर जमीन खोलवर नांगरून आडवी, उभी वखरणी करून जमीन चांगली भुसभुशीत करावी. ओलीताखाली पीक घ्यायचे असल्यास व वखराच्या किंवा सारा यंत्राच्या सहाय्याने सारे पाडावेत. जेणेकरून पाणी चांगले समप्रमाणात देता येते.
वाणाची निवड व पेरणी
पेरणी करिता टी ए एम - १०८ - १, शताब्दी या वाणांची निवड करावी. साधारणतः पाच ते सहा किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला ३ ग्रॅम थायरम लावावे. बियाण्याची चांगली उगवण होण्याच्या दृष्टीने पेरणीच्या आधी रात्री बियाणे ओलसर पोत्यात ठेवावे. पेरणी ऑक्टोबरचा शेवटचा पंधरवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी. ठेवावे. दोन झाडातील अंतर १० ते १५ सेंमी. राहील अशी पेरणी करावी. मोहरीचे बियाणे आकारने लहान असल्यामुळे बियाण्याच्या आकाराची वाळू समप्रमाणात मिसळून नंतर पेरणी करावी. त्यामुळे बियाणे सर्व क्षेत्रात समप्रमाणात पडेल. बियाण्याची चांगली उगवण होण्याच्या दृष्टीने पेरणी साधारणतः तीन ते चार सेंमी. खोलीवर करावी. पेरणीनंतर दहा ते बारा दिवसांनी विरळणी करावी. साधारणतः दोन झाडातील अंतर १० ते १५ सेंमी राहील या दृष्टीने विरळणी करावी किंवा खाडे भरणी करावी. म्हणजे शेतात हेक्टरी १.५ ते २.२ लाख रोपांची संख्या राहील. गव्हाबरोबर आंतरपीक ९:१ किंवा ६:१ या प्रमाणात ओळीमध्ये पेरणी केल्यास फायदेशीर ठरते.
खत व्यवस्थापन
मोहरी हे पीक कोरडवाहू तसेच ओलिताची सोय उपलब्ध असल्यास ओलिताखाली सुद्धा घेता येते. ओलीताखाली हेक्टरी ५० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद या रासायनिक खताची मात्रा द्यावी. हेक्टरी २५ किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद पेरणीच्या वेळेस आणि उरलेले २५ किलो नत्र २५ ते ३० दिवसांनी म्हणजेच पहिल्या पाण्याच्या पाळीच्या वेळेस द्यावे. उत्पादन वाढीसाठी प्रती हेक्टरी २० किलो गंधक आणि १ किलो बोरॉन पेरणीच्या वेळेस द्यावे. कोरडवाहू परिस्थितीत प्रती हेक्टरी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद द्यावे. कोरडवाहू लागवडीमध्ये अधिक आर्थिक मिळकती करिता शिफारसित खत मात्रेसह ५० टक्के फुलोरा अवस्थेत १ टक्का युरियाची पिकावर फवारणी करावी.
आंतरमशागत
उगवणीनंतर ५० दिवसांच्या काळात पीक तणविरहित ठेवावे. पेरणी पासून २० ते ४० दिवसांनी दोन निंदण व दोन डवरणी करावी किंवा पाणी व्यवस्थापन निश्चित ओलिताची सोय असल्यास उगवणीनंतर २५ ते ३० दिवसाच्या अंतराने ओलिताच्या तीन पाळ्या दाव्यात. दोनच ओलीताच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पेरणीनंतर एक महिना आणि पिक फुलोऱ्यावर असताना दुसरे ओलित करावे. एकच ओलीत करणे शक्य असल्यास पीक फुलोऱ्यावर असताना ओलीत करावे.
काढणी
झाडावरील शेंगा ७५ टक्के पिवळ्या पडल्यानंतर व शेंगातील दाणे टणक झाल्यावर पीक काढणीस आले आहे असे समजावे. काढणी योग्य वेळी करावी. जमिनीलगत कापणी करून लहान ढीग करून सात ते आठ दिवस शेतातच वाळू द्यावे नंतर लगेच बैलाच्या पायाखाली तुडवून किंवा काठीने बडवून मळणी करावी. मोहरीच्या पिकापासून हेक्टरी आठ ते बारा क्विंटल उत्पादन मिळते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.