
डॉ. सुनील गोरंटीवार
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये (Mahatma Phule Agriculture University) सिंचनाच्या व्यवस्थापनामध्ये (Irrigation Management) म्हणजेच पिकास पाणी किती व केव्हा द्यावे यावर प्रभाव टाकणारे अनेक घटक असतात.
त्यातील वेळ आणि स्थान या नुसार बदलत राहणाऱ्या जमीन, हवामान, पीक, सिंचन प्रणाली (irrigation system) इ. घटकांशी निगडित आवश्यक त्या बाबी मिळविण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) हे तंत्रज्ञान उपयोगी पडते.
आपल्या पिकाला कधी आणि किती पाणी कोणत्या वेळी द्यायचे, याचे व्यवस्थापन करण्यासाठी हवामान आधारित ‘ऑटो फुले इरिगेशन शेड्यूलर’ (AutoPIS) ही प्रणाली विकसित केली आहे.
या प्रणालीचे पुढील प्रमाणे चार घटक आहेत.
१. संवेदके : ज्या शेतामध्ये सिंचन द्यावयाचे आहे, तेथील प्रत्यक्ष वेळेप्रमाणे सिंचन प्रभावित करणारे हवामानाचे घटक. उदा. तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, पाऊस, वारा, इ. मोजण्यासाठी किंवा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील पर्याय असू शकतात.
• स्वयंचलित हवामान केंद्र (Automatic Weather Station- AWS) : स्वयंचलित हवामान केंद्र शेतामध्ये किंवा शेताच्या जवळपास बसवावे लागते. त्यानुसार आवश्यक ती माहिती उपलब्ध होत राहते.
• हवामानाची सेवा देणाऱ्या विविध संस्था (Weather Service Providers) : काही संस्था प्रत्यक्ष वेळेप्रमाणे आपल्या ठिकाणच्या हवामानातील सर्व घटकांची माहिती पुरविण्याची सेवा देतात. या सेवेसाठी अनेक वेळा काही सेवा दर आकारला जातो. उदा. ओपन वेदर.
-काही शासकीय यंत्रणा मोफत किंवा स्वस्तामध्येही ही माहिती उपलब्ध करत असतात.
२. संगणकीय प्रारूप :
हवामान, जमीन पीक व पिकाच्या वाढीची अवस्था, सिंचन प्रणालीची वैशिष्ट्ये अशा सर्व बाबी गृहीत धरून त्या सिंचन प्रणालीद्वारे पिकास पाणी किती व केव्हा द्यावे हे निश्चित करणारे एखादे संगणकीय प्रारूप तयार केले जाते.
गेल्या भागापासून आपण ‘फुले इरिगेशन शेड्यूलर’ या विद्यापीठाने विकसित केलेल्या संगणकीय प्रारूपाची माहिती घेत आहोत. हे संगणकीय प्रारूप मोबाईलवर स्थापित करता येते.
३. वापरकर्ता हस्तक्षेप साधन : इंग्रजीमध्ये याला ‘यूजर इंटरफेस’ असेही म्हटले जाते.
आपण मोबाईलमध्ये भरलेल्या संगणकीय प्रारूपाला आपण काही माहिती द्यावी लागते. तर काही माहिती ते स्वतःहून मिळवते. आपण द्यावयाच्या माहितीमध्ये पुढील बाबींचा समावेश असू शकतो.
- ज्या पिकास सिंचन द्यावयाचे आहे, त्या पिकाची माहिती.
-ज्या जमिनीमध्ये पीक घेणार आहे, त्या जमिनीविषयीची माहिती.
-ज्या सिंचन प्रणालीद्वारे सिंचन दिले जात आहे, त्या प्रणालीची माहिती.
ही माहिती त्या संगणकीय प्रारूपास उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांना सोपे व्हावे, म्हणून सोपा व सर्वांना वापरता येईल, असा ‘इंटरफेस’ (म्हणजे मोबाइलच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या व भरावयाच्या बाबी, खुणा किंवा चिन्हे) तयार केलेला आहे.
आपण दिलेल्या माहितीमध्ये काही बदल करावयाचे असतील, ते करणेही वापरकर्त्यास सुलभ व्हावे हे पाहिलेले असते. विशेषतः मोबाइलसारख्या लहान स्क्रीन असलेल्या साधनांवर आपण संगणकीय प्रारूप उपलब्ध केले आहे.
त्याद्वारे शेतकऱ्यांना ऐनवेळी काही बदल करावयाचे असतील, तर करता येतात. उदा. आपल्या संगणकीय प्रारूपामध्ये ठिबक यंत्रणा ३० मिनिटे चालवावी असे सुचविले आहे. पण त्या शेतकऱ्याला काही कारणामुळे पाणी आणखी कमी करावयाचे आहे. अशा वेळी तो ॲपमध्ये आवश्यक ते बदल करून त्याला अपेक्षित २५ किंवा २० मिनिटे करू शकतो.
४. नियंत्रक : ‘फुले इरिगेशन शेड्यूलर’ या संगणकीय प्रारूपाने निश्चित केलेल्या कालावधीकरिता सिंचन संच चालवण्यासाठी योग्य त्या सूचना नियंत्रकाद्वारे दिल्या जातात. उदा. सिंचन पंप चालू किंवा बंद करण्यासंदर्भात पंपास सूचना दिली जाते.
वर नमूद केलेले सर्व घटक हे इंटरनेटद्वारे एकमेकास जोडलेले असतात. त्यामुळे या घटकांनी मोजलेल्या किंवा निश्चित केलेल्या माहितीची एकमेकांमध्ये देवाण-घेवाण केली जाते. ही सर्व प्रक्रिया स्वयंचलितपणे घडते.
‘ऑटो फुले इरिगेशन शेड्यूलर’ प्रणालीची वैशिष्ट्ये
• ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ सक्षम ‘ऑटो फुले इरिगेशन शेड्युलर’ ही स्वयंचलित प्रणाली एकावेळी एका पिकाचे प्रत्यक्ष वेळेनुसार सिंचन व्यवस्थापन करण्यासाठी वापरता येते.
• याद्वारे आपण ठरविलेल्या पिकासाठी प्रत्यक्ष वेळेप्रमाणे विविध सिंचन पद्धतीद्वारे किती व केव्हा पाणी द्यावे आणि त्यासाठी पंप किती कालावधीसाठी चालवावा, हे ठरविले जाते.
• याद्वारे वापरकर्ता किंवा शेतकरी सिंचनासाठी पंप कुठूनही सुरू करू शकतात. निर्दिष्ट वेळ किंवा सिंचन मात्रा संपल्यानंतर पंप आपोआप बंद होतो.
• याद्वारे वापरकर्ता किंवा शेतकरी त्याच्या/तिच्या अनुभवानुसार संगणकीय प्रारूपाने निश्चित केलेला सिंचन वेळ (सिंचन केव्हा द्यावयाचे) किंवा/व सिंचन कालावधी बदलू शकतात. त्यानुसार पंप कुठूनही चालू किंवा बंद करू शकतात.
•पंपाच्या वापर सुरू असताना कोणत्याही कारणाने तो बंद झाला. तर ज्या वेळी पुन्हा ते अडथळ्याचे कारण दूर होईल, त्या क्षणी पंप आपोआप सुरू होईल. उदा. (उदा. अचानक वीज जाणे किंवा विहीर/ बोअरवेलमधील पाणी संपणे इ. या कारणामुळे पंप बंद झाला तर वीज किंवा पाणी (पंप बंद होण्याचे जे काही कारण असेल, ते) उपलब्ध झाल्यावर पंप आपोआप सुरू होतो. आधी नोंदवलेली वेळ किंवा निर्धारित वेळ पूर्ण करतो. ती पूर्ण झाल्यावर आपोआप बंद होतो.
• विविध प्रकारच्या पिकांच्या प्रत्यक्ष वेळेनुसार सिंचन व्यवस्थापनासाठी उपयुक्त.
• स्थान किंवा वेळेनुसार बदलत जाणाऱ्या व सिंचनावर प्रभाव करणाऱ्या घटकांची माहिती यात मिळवली जाते. त्यानुसार सिंचनाचे व्यवस्थापन केले जात असल्यामुळे अंदाजे केलेल्या व्यवस्थापनाच्या तुलनेमध्ये पाणी वापर कार्यक्षमता सुधारते.
म्हणजेच पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य तो वापर उत्पादनवाढीसाठी होतो. त्यातून पाणी, वीज आणि वेळेची सुद्धा बचत होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.