Turmeric Pest Management : हळद पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

Turmeric Pest Management : हळद पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक बनले आहे. त्यातील विविध औषधी गुणधर्मामुळे व सौंदर्य प्रसाधनातील वाढत्या वापरामुळे जागतिक बाजारपेठेतही मागणी वाढत आहे.

डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, राहुल साळवे

हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक (Turmeric Spice Crop) बनले आहे. त्यातील विविध औषधी गुणधर्मामुळे (Medicinal Proprieties In Turmeric) व सौंदर्य प्रसाधनातील वाढत्या वापरामुळे जागतिक बाजारपेठेतही मागणी (Turmeric Demand In Global Market) वाढत आहे. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस (Turmeric Cultivation) अतिशय अनुकूल असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हळद क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे.

Turmeric Pest Management : हळद पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन
Turmeric Future Market : हळद ‘एनसीडीईएक्स’च्या वायदे बाजारातून बाहेर काढा

राज्यातील सर्वाधिक हळद लागवड क्षेत्र हे हिंगोली, सातारा, परभणी व नांदेड या जिल्ह्यांत आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत देशात हळद लागवडीमध्ये ३३ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. मात्र त्यातील किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

कंदमाशी :

हळद पिकावरील प्रमुख नुकसानकारक कीड. साधारणतः जुलै-ऑगस्ट महिन्यापासून प्रादुर्भावाला सुरुवात. पुढे ही कीड काढणीपर्यंत नुकसान करते.

-किडीची प्रौढ माशी दिसायला डासासारखी, मात्र आकाराने मुंगळ्याप्रमाणे मोठी व काळसर रंगाची. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब, पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची. पातळ व पारदर्शक अशा दोन्ही पंखांवर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात.

-जिथे हळदीचे कंद उघडे पडलेले असतात, तिथे जमिनीलगत प्रौढ माशी अंडी देते. अंडी पांढरट रंगाची असतात.

-त्यातून बाहेर पडलेली अळी पिवळसर बिनपायाची असते. अंड्यातून अळ्या बाहेर पडून उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्यांच्यावर उपजीविका करतात.

-त्यामुळे इजा झालेल्या गड्ड्यामध्ये नंतर बुरशीजन्य रोग आणि सूत्रकृमींचा शिरकाव होतो. त्यामुळे खोड व गड्डे मऊ होतात. नंतर पाणी सुटून कुजू लागतात.

Turmeric Pest Management : हळद पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन
Turmeric : हळदीवरील करपा, कंदकुज रोगांचे नियंत्रण

-जास्त दिवस लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक अनुकूल असतो. वेळीच लक्ष न दिल्यास या किडीमुळे हळद पिकाचे सुमारे ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

नियंत्रण :

-वेळेवर हळदीची भरणी करावी. हळदीचे कंद उघडे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.

- कंदमाशीसाठी सापळा तयार करावा. सापळा तयार करण्याची पद्धत भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम प्रति १.५ लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण माती अथवा प्लॅस्टिकच्या पसरट भांड्यामध्ये भरून ठेवावे. साधारणतः ८ ते १० दिवसांनी त्या मिश्रणातून एक विशिष्ट वास येतो. त्याकडे कंदमाश्या आकर्षित होतात. आकर्षित झालेल्या माश्या द्रावणात पडून मरतात.

-जुलै ते ऑक्टोबर या काळात दर १५ दिवसांच्या अंतराने फवारणीचे योग्य नियोजन करावे. (फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी)

क्विनालफॉस (२५% टक्के) १ मिलि किंवा डायमिथोएट (३० टक्के) १ मिलि

किंवा थायामेथोक्झाम (१२.६ %) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५%) (संयुक्त कीटकनाशक) प्रमाण - १.५ मिलि.

- कंदमाशीमुळे कंद कुजू लागल्याचे दिसल्यानंतर जमिनीतून क्लोरपायरिफॉस (५० टक्के) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे ड्रेंचिंग करावी.

(ॲग्रेस्को शिफारस)

Turmeric Pest Management : हळद पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन
Turmeric Crop Management : हळदीची पाने पिवळी पडण्याची समस्या अन् उपाय

पाने गुंडाळणारी अळी :

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

-प्रौढ पतंग मध्यम आकाराचा असतो. काळसर तपकिरी रंगाच्या पंखांवर पांढऱ्या रंगाचा मोठा ठिपका असतो.

-अंड्यातून बाहेर पडलेली अळी हिरवट रंगाची असून, ती स्वत:च्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते. आत राहून पाने खाते.

नियंत्रण :

- किडीचा प्रादुर्भाव दिसताच गुंडाळलेली पाने, अळी व कोष वेचून नष्ट करावेत.

फवारणी प्रति लिटर पाणी

क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि किंवा इमामेक्टिन बेन्झोएट (५ टक्के) १ ग्रॅम किंवा डायमेथोएट १ मिलि.

खोडकिडा :

-खोडकिडीचा पतंग आकाराने लहान व नारंगी रंगाचा असतो. त्याच्या दोन्ही पंखांवर काळ्या रंगाचे ठिपके असतात.

-अळी लालसर रंगाची असून, अंगभर काळे ठिपके असतात. अळी खोड व हळदीचे कंद पोखरते. खोडाला छिद्र करून आत शिरते. आतील भाग खाऊन टाकते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या मध्यभागातील पान पिवळे पडलेले दिसते. कालांतराने खोड वाळायला सुरुवात होते.

नियंत्रण :

- प्रादुर्भावित झाडे नष्ट करावीत.

-निंबोळी तेल ५ मि.लि. किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) ३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. गरजेनुसार १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

-प्रकाश सापळ्याचा एकरी एक या प्रमाणात वापर करावा. प्रकाश सापळ्याकडे आकर्षित होऊन जमा झालेले या किडीचे प्रौढ नष्ट करावे.

हुमणी :

ही बहुभक्षी कीड असून, या किडीची अळी जमिनीत राहून पिकांना नुकसान पोचवते. सुरुवातीचे काही दिवस सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करून पुढे पिकांची मुळे कुरतडू लागतात. अधिक प्रादुर्भाव असलेल्या भागात कंदही कुरतडल्याचे दिसून येते. मुळे कुरतडल्यामुळे हळदीचे पीक पिवळे पडून वाळू लागते. हे पीक उपटल्यास सहज उपटून येते. या अळीचा प्रादुर्भाव सामान्यतः एका रेषेत दिसून येतो. प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण शेतात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीक वाळलेले दिसून येते.

नियंत्रण :

-पिकासाठी पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.

-हळद लागवडीनंतर हुमणीचा प्रादुर्भाव आढळल्यास, आळवणी प्रति लिटर पाणी

फिप्रोनील (४० टक्के) + इमिडाक्लोप्रीड (४० टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ०.४ ग्रॅम किंवा

क्लोरपायरिफॉस ४ मिलि.

-जैविक नियंत्रणासाठी मेटाऱ्हायझीम ॲनासोप्ली ही परोपजीवी बुरशी प्रति हेक्टरी ५ किलो या प्रमाणात शेणखतात मिसळून वापरावी. किंवा हुमणीच्या अळीला रोगग्रस्त करणाऱ्या सूत्रकृमीचा वापर करावा.

(टीप ः ॲग्रेस्को शिफारस आहे.)

- डॉ. पुरुषोत्तम नेहरकर (विभाग प्रमुख), ०२४५२-२२८२३५, ९८२२९३६९८६

- राहुल साळवे, (आचार्य पदवी विद्यार्थी), ९१६८४९७८८३

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com