Silk Farming : रेशीम कीटकावरील उझी माशीचे एकात्मिक नियंत्रण

Silk Worm Pest : रेशीम कीटकांवर उपजीविका करणारी परोपजीवी कीड उझी माशी ही रेशीम उद्योगात नुकसानकारक ठरते.
Silk Worm Pest
Silk Worm PestAgrowon
Published on
Updated on

डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. संजोग बोकन, धनंजय मोहोड  

Silk Worm Uzi fly : रेशीम कीटकांवर उपजीविका करणारी परोपजीवी कीड उझी माशी ही रेशीम उद्योगात नुकसानकारक ठरते. या किडींचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून असून, उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे कोषाचे १५ ते २० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे उझी माशीच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता असते.

उझी माशीचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे :
 रेशीम कीटक संगोपनामध्ये वाढ होत असून, उझी माशीस सातत्याने अन्नाची उपलब्धता होत आहे. अनेक रेशीम उत्पादक दोन बॅचेसमध्ये १५ ते २० दिवसांचा खंडही ठेवत नाहीत. प्रौढ माशीचा जीवन कालावधी १२ ते १८   दिवसांचा असून, त्या ४०० ते ५०० अंडी देतात. निसर्गातील उझी माशींच्या शत्रूकीटकांची संख्या विविध कारणांमुळे कमी होत आहेत. उझी माशीवरील परोपजीवी निसोलीनक्स थायमस या मित्रकीटकांचे संवर्धन करण्याची आवश्यकता   आहे.

नुकसान कालावधी :
  उझी माशीचा प्रादुर्भाव वर्षभर आढळत असला, तरी ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान जास्त प्रादुर्भाव राहतो. बदलता पाऊस, तापमान आणि आर्द्रतेनुसार उझी माशीची अंडी देण्याची क्षमता बदलते. पावसाळा आणि हिवाळ्यात उझी माशीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळतो. उन्हाळ्यात ३२ ते ४२ अंश सेल्सिअस तापमानामुळे मार्च ते जून महिन्यात उझी माशीचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो.

Silk Worm Pest
Silk Worm Pest : रेशीम कीटकावरील उझी माशीचे नियंत्रण

जीवनक्रम :
चार अवस्था ः
अंडी, छोटी अळी (मॅगट), कोष, प्रौढ माशी.
उझी माशी एका वेळी ४०० ते ५०० पांढऱ्या दुधाळ रंगाची अंडी देते. उझी माशीची मादी १ ते २ अंडी वाढीच्या चौथ्या किंवा पाचव्या अवस्थेत असलेल्या रेशीम अळीच्या त्वचेत टाकते. अंड्यातून ४८ ते ६२ तासांत (२ ते ३ दिवस) मॅगट बाहेर येते.

आपल्या छातीजवळ असलेल्या हूकच्या साह्याने छिद्र करून रेशीम अळीच्या शरीरात शिरतात. त्या ठिकाणी काळा डाग पडतो. फिक्कट पिवळसर अळी अवस्था ६ ते ८ दिवसांची राहते. अळीचे लालसर तपकिरी कोषात रूपांतर होते. कोषावस्था १० ते १२ दिवसांची असते. अशा प्रकारे उझी माशीचा जीवनक्रम १८ ते २२ दिवसात पूर्ण होतो.

प्रादुर्भावाची लक्षणे :
रेशीम अळ्यांच्या शरीरावर काळे डाग दिसतात.कोषाच्या टोकाला गोलाकार छिद्र दिसते.
रेशीम कोष तयार झाल्यास संगोपन ट्रेमध्ये उझी माशीचे तपकिरी रंगाचे कोष दिसतात.

उझी माशी नियंत्रण :
उझी माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे.  
अ) मशागतीय पद्धत :
राज्यात जवळपास ९८ टक्के कच्चे शेडनेट संगोपनगृह आहेत. शक्यतो पक्के सिमेंट कॉँक्रीटमध्ये बांधकाम करून शिफारशीप्रमाणे दरवाजे खिडक्या आणि हवा खेळती राहण्यासाठी व्यवस्था करावी.

तुती पाने साठवण करण्यासाठी वेगळी अंधारी खोली असावी. फांदी खाद्य देण्याअगोदर उझी माशी फांद्या किंवा पानांद्वारे सरळ संगोपनगृहात प्रवेश करते. रेशीम कीटकांच्या दोन बॅचेसमध्ये कमीत कमी १५ दिवसांचे अंतर ठेवावे.

कोष विक्री केलेल्या बाजारातून पोते घरी आणू नये. कारण या सोबत उझी माशीच्या अळ्या, कोष आपल्या संगोपनगृहात येण्याची शक्यता असते.
  रेशीम कीटकांची विष्ठा शेतात उघड्यावर न फेकता खताच्या (कंपोस्ट) खड्ड्यात गाडून टाकावी. कारण विष्ठेत उझी माशीच्या सुप्त अवस्था (कोष) असतात.
  प्रादुर्भावग्रस्त गावात एप्रिल ते मे महिना कोषाचे पीक बंद ठेवावे.

ब) यांत्रिक पद्धत :
  संगोपन गृह, कोष खरेदी केंद्र, धागानिर्मिती केंद्र अशा सर्व ठिकाणी अळ्या, कोष गोळा करून जाळून नष्ट करावेत. या सर्व ठिकाणच्या जमिनीच्या भेगा बुजवून घ्याव्यात.
  प्रौढ रेशीम कीटक संगोपनगृह ८२ × २३ × उंची १५ फूट आकाराच्या संगोपनगृहासाठी (२५० अंडी पुंजांसाठी) ७-८ कामगंध सापळे लावावे.

संगोपनगृहाच्या बाहेरून २० फूट अंतरावर लावलेल्या या कामगंध सापळ्यातील गंधगोळीकडे (ल्यूअर) नर माश्या आकर्षित होन अडकतात. परिणामी, नर मादीच्या गुणोत्तर बिघडून प्रजनन प्रक्रियेत अडथळा येतो.
  सर्व खिडक्या व दरवाजांना नायलॉन वायर मेश जाळी लावून घ्यावी. म्हणजे उझी माशी कीटक संगोपनगृहात सरळ प्रवेश करणार नाही.  
  गोळा केलेल्या अळ्या, कोष डिटर्जंटच्या द्रावणात टाकून नष्ट करावेत.
  रेशीम कीटकाच्या तिसऱ्या अवस्थेपासून पुढे उझी माशीचे सापळे कोष विणन काळापर्यंत रॅकवर लावावेत.

क) जैविक पद्धत :
  उझी माशीच्या कोषावरील परोपजीवी निसोलायनक्स थायमस हे परोपजीवी कीटक संगोपनगृहात रेशीम कीटकांनी चौथी कात टाकल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी सोडावेत. १०० अंडीपुंजांसाठी परोपजीवी कीटकांचे दोन पाऊच लागतात.
  रेशीम कीटक कोषावर गेल्यानंतर निसोलायनक्स थायमस परोपजीवी कीटकांचे पाऊच चंद्रिकेजवळ ठेवावेत. कोष काढणीनंतर खताच्या खड्ड्याजवळ ठेवावेत.  


  हे पाऊच रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आधी पैसे भरून मागणी केल्यास कुरियरनेही पाठवले जातात.

अशा प्रकारे एकात्मिक पद्धतीचा वापर केल्यास रेशीम कोषाचे होणारे नुकसान टाळता येईल.

डॉ. चंद्रकांत लटपटे,  ७५८८६१२६२२, डॉ. संजोग बोकन,  ९९२१७५२०००      (रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com