Custerd Apple : सीताफळातील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक नियंत्रण

सद्यःस्थितीत सीताफळ या फळपिकावर पिठ्या ढेकूण (मिलीबग) या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणाच्या दृष्टीने ही कीड सीताफळातील अत्यंत कठीण मानली जाते.
सीताफळावरील पिठ्या ढेकूण, फळसड नियंत्रण
सीताफळावरील पिठ्या ढेकूण, फळसड नियंत्रणAgrowon


सद्यःस्थितीत सीताफळ (Custerd Apple) या फळपिकावर पिठ्या ढेकूण (मिलीबग) (Mealy Bug) या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणाच्या दृष्टीने ही कीड सीताफळातील अत्यंत कठीण मानली जाते. झाडाच्या सालीच्या खाली फांद्यांच्या फटीत पिठ्या ढेकूण लपून राहते. चिवट कापसासारख्या पांढऱ्या पदार्थाच्या आवरणामध्ये अंडी घालते. पूर्ण वाढलेल्या किडीच्या शरीरावरही मेणकट पांढुरक्‍या रंगाचे आवरण असते. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी अंड्यापर्यंत किंवा किडीच्या शरीरापर्यंत पोहोचू शकत नाही. किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.

सीताफळावरील पिठ्या ढेकूण, फळसड नियंत्रण
‘स्टिंक बग’मुळे वाढतेय कापसातील बोंडसड

ओळख व जीवनक्रम ः
- मादीचे शरीर अंडाकृती, सपाट आणि मऊ असते. शरीराचा रंग लालसर. डोके, वक्षस्थळ आणि पोट स्पष्टपणे वेगळे नसतात. मादी सैलसर कापसासारख्या पुंजक्‍यांत अंडी घालते, त्यालाचा ‘अंड्याच्या थैल्या’ असे म्हटले जाते.
- वाढत्या शेंड्यावर, फळांवर, सालीखाली, जमिनीलगत खोडाभोवती अंड्याच्या थैल्या दिसून येतात. अंडी अंडाकृती, नारंगी रंगाची आणि उघड्या डोळ्यांनी दिसणारी असतात.
- अंड्यातून संथपणे सरपटणारी नारंगी व विटकरी लाल रंगाची पिले बाहेर पडून झाडावर पसरतात. फळे व कोवळ्या फांद्यांवर ती थांबतात. या अवस्थेतील किडीवर पांढऱ्या रंगाचा मेणकट पदार्थ नसतो. त्यामुळे कीटकनाशकांचा योग्य परिणाम होतो.

नुकसान ः
- जून ते ऑगस्ट आणि नोव्हेंबर ते मार्च या काळात ही कीड जास्त कार्यक्षम असते.
- ही कीड पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळांमधून रस शोषण करते. परिणामी पानांचा, फळांचा आकार वेडावाकडा होतो. झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.
- नवीन फुटींची व पानांची वाढ खुंटते. फळांची वाढ अयोग्य होऊन आकार वेडावाकडा होतो.
- ही कीड शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ स्रवते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. परिणामी पाने, फळे काळी पडतात. अशा फळांना चांगला बाजारभाव मिळत नाही.

सीताफळावरील पिठ्या ढेकूण, फळसड नियंत्रण
Custard Apple Processing : सीताफळ गर कसा टिकवाल?

एकात्मिक व्यवस्थापन ः
१) बहर धरण्यापूर्वी ः
- बागेची स्वच्छता- पानगळ झाल्यानंतर बागेत पडलेली पाने, रोगट फळे तसेच छाटणी करताना झाडावरील लटकणारी फळे व वाळलेल्या फांद्या काढून जाळून नष्ट करावीत. त्यामुळे किडीच्या सुप्तावस्थेतील अवस्थांचा नाश होईल.
- जमिनीची खोलवर नांगरट आणि खणणी करावी. जमीन उन्हात चांगली तापू द्यावी. जमिनीत असणाऱ्या किडींच्या अवस्था नष्ट होतात.
- बहराचे पाणी देण्यापूर्वी किंवा पावसाळ्यापूर्वी पाणी देण्यासाठी योग्य आकाराचे वाफे तयार करून शिफारशीप्रमाणे सेंद्रिय आणि रासायनिक खते द्यावीत. प्रमाणबद्ध खत वापरामुळे झाडांमध्ये रोग व कीड यांच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढते.
- पावसाळ्यात रोग किडींचे प्रमाण जास्त असते. हे टाळण्यासाठी सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास मार्च-एप्रिल महिन्यांत पाणी देऊन बहर लवकर धरावा.
- किडीची पिले खोडावरून झाडावर चढतात. त्यासाठी खोडावर १५ ते २० सेंमी रुंदीची प्लॅस्टिक पट्टी बांधून त्यास ग्रीस लावावे. त्यामुळे पिले ग्रीसला चिकटून मरून जातात.

२) बहर धरल्यानंतर ः
- बाग व बागेभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. बागेतील तण, बांधावरील गवत आणि लहान झुडपे यांचे नियंत्रण करावे. सीताफळ बागेजवळ भेंडी, कपाशी या पिकांची लागवड करणे टाळावे. कारण या पिकांवर पिठ्या ढेकूण कीड मोठ्या प्रमाणावर वाढते.
- बागेत पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. साठलेले पाणी त्वरित बागेबाहेर काढावे.
- क्रिटोलिमस मॉन्ट्रोझायरी हे परभक्षी मित्रकीटक एकरी ६०० या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा झाडावर सायंकाळच्या वेळी सोडावेत. भुंगेरे सोडल्यानंतर झाडांवर कोणत्याही कीटकनाशकांची फवारणी करू नये.
- लेकॅनोसिलीयम लेकानी (व्हर्टिसिलीयम लेकॅनी) ४ ग्रॅम अधिक फिश ऑइल रोझीन सोप ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. आर्द्रतायुक्त हवामान असल्यास ही फवारणी करावी.
- किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी, प्रथम बुप्रोफिजीन १.५ मिलि त्यानंतर बिव्हेरिया बॅसियाना ६ ग्रॅम नंतर ॲझाडिरेक्टीन (१०,००० पीपीएम) ३ मिलि आणि शेवटी लेकॅनीसिलीयम लेकॅनी (व्हर्टिसिलीयम लेकॅनी) ६ ग्रॅम अधिक गाईचे दूध* ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून चार फवारण्या प्रादुर्भाव दिसल्यानंतर १० दिवसांच्या अंतराने कराव्यात.
(टीप ः अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन योजनेच्या वार्षिक गट बैठकीतील शिफारशीनुसार)*
-----------------
- नितीश घोडके, ९९६०९८१५४८
(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीके (अंजीर व सीताफळ) संशोधन प्रकल्प जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com