
इंद्रजित भालेराव
Indian Agriculture : प्रसिद्ध लेखक बाबाराव मुसळे यांनी वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश केला. वाशीमला त्यानिमित्त एक कार्यक्रम झाला. त्याला मी उपस्थित होतो. मी अगदी अकरावी-बारावीला असल्यापासून म्हणजे १९८० पासून त्यांचं लेखन वाचत आलेलो आहे.
‘तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा’ हा प्रतिनिधिक कथासंग्रह प्रकाशित झाला होता; त्यात बाबाराव मुसळे यांची कथा वाचनात आली. तेव्हापासून ते नाव कायमचं मनावर ठसलं.
पुढं त्यांची ‘हाल्या हाल्या दुधू दे’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि बाबाराव मुसळे हे नाव सर्वतोमुखी झालं. तिसऱ्या पिढीची ग्रामीण कादंबरी म्हणून त्या एकमेव कादंबरीची निवड झाली होती. ‘मोहरलेला चंद्र’ हा त्यानंतर प्रकाशित झालेला सरांचा कथासंग्रह मला प्रचंड आवडून गेलेला होता. पुढं सरांचा ‘झिंगु लुखूलुखू’ हा दुसरा कथासंग्रह आणि त्यानंतर ‘पखाल’ ही कादंबरीही मेहता प्रकाशनाने काढली.
पखाल कादंबरी वाचून तर मी पार वेडा झालो होतो. मी प्राध्यापक होतो. कुठल्याही वर्गावर गेलं, की आधी मी पखालची गोष्ट सांगायचो. तेव्हा एक उत्कट वाचक असलेला आणि पुढं मोठा कादंबरीकार झालेला भारत काळे माझ्या महाविद्यालयात मला भेटायला यायचा. तेव्हा मी त्याच्या हातात पखाल सोपवली.
पखाल वाचून तोही माझ्यासारखाच पार वेडा झाला. त्या कादंबरीनं भारतला कादंबरी लिहायचं बळ दिलं. त्यानं मग ‘ऐसे कुणबी भूपाळ’ ही कादंबरी लिहायला सुरुवात केली. या कादंबरीनं पुढं जाणकार वाचकांना चांगलीच भुरळ घातली.
त्यानंतर मुसळे सरांची ‘वारूळ’ ही महाकादंबरी आली, ‘पाटीलकी’ आली. सायन प्रकाशनानं प्रकाशित केलेली ‘झराळ' कादंबरीही मी आवर्जून घेतली. पण माझ्या आधी माझ्या बायकोनं ती वाचली आणि सरांना फोन करून ती बोलली देखील. ‘एक पाऊल पुढे’ आणि ‘झुंड’ या अलीकडं आलेल्या सरांच्या कादंबऱ्या मात्र माझ्या अजून वाचायच्या राहिलेल्या आहेत.
गेली पन्नास वर्षे सातत्यानं सर लेखन करत आहेत. त्यांच्यासोबतचे कितीतरी जण लिहायचं थांबलेले आहेत. काही जण आता हयात नाहीत. तर काही जण लेखक म्हणून काळाच्या उदरात गडप झालेले आहेत. बाबाराव मात्र अजूनही नव्या जोमानं आणि सातत्यानं कथा लिहीत आहेत.
बाबारावांनी चाळीस वर्षांत बारा कादंबऱ्या लिहिल्या. पण एकाही कादंबरीत आधीचा विषय पुन्हा येऊ दिला नाही. ‘हाल्या हाल्या दुधू दे’ या कादंबरीत कोरडवाहू शेतकऱ्यांचं जीवन त्यांनी जगासमोर आणलं. ‘पखाल’सारख्या कादंबरीत बलुतेदारीची शोकांतिका मांडली. ‘वारूळ’मध्ये मातंग या अस्पृश्य जातीचं समग्र दर्शन घडवलं.
‘झळाळ’सारख्या कादंबरीत स्त्रियांच्या पराक्रमाची गाथा मांडली. ‘एक पाऊल पुढे’मध्ये एक प्रयोगशील शेतकरी उभा केला. तर ‘झुंड’मध्ये राजकारण हा विषय त्यांनी घेतला. मधली त्यांची एक कादंबरी तर बंगालच्या पार्श्वभूमीवर आहे.
प्रत्येक कादंबरीत वेगळा विषय घेऊन, त्याचा समग्र अभ्यास करूनच बाबाराव कादंबरी लिहितात. इतकी विविधता त्यांच्या समकालीन लेखकांमध्ये पाहायला मिळत नाही.
बाबाराव सतत लिहिते राहिले, त्याचं कारण त्यांच्या मनातली दुर्दम्य इच्छाशक्ती. आणि दुसरं कारण बाबाराव हा जुन्या भांडवलावर लिहिता राहिलेला लेखक नाही. त्यांचा गावाशी, रानाशी अजून संबंध आहे. ते स्वतः शेती करतात. त्यामुळं दैनंदिन शेतीत असतात. त्या शेतीचे प्रश्न, तिथली परिस्थिती, तिथलं जीवन त्यांना रोज नवे नवे विषय पुरवत असते.
शेतीशी असा जैव संबंध ठेवून लिहिणारे मराठीत खूप कमी लेखक आहेत. र. वा. दिघे आणि बाबू बिरादार अशी दोनच नावं आपणाला सांगता येतात. महानोर शेतीत राहून लिहीत होते, पण ग्रामीण साहित्याचे ते विरोधकच होते.
‘गिरामीण बोलीचं टेक्निक आलं’ अशी पहिल्याच संग्रहात कविता लिहून त्यांनी ग्रामीण साहित्याची चेष्टा केली. हिंदीत मात्र फणिश्वरनाथ रेणू, राजस्थानीत विजयदान देथा, कानडीमध्ये शिवराम कारंथ अशी शेतीत राहून जबरदस्त लेखन करणारी माणसं आपणाला पाहायला मिळतात.
बाबाराव एवढे मोठे लेखक आहेत, त्यांची इतकी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, अनेक संमेलनाचे ते अध्यक्ष झालेले आहेत, शालेय आणि विद्यापीठ पातळीवरीच्या अभ्यासक्रमात त्यांचं साहित्य नेहमीच असतं; तरीही त्यांच्या अंगात कुठलाही मोठेपणा आलेला नाही. अजूनही ते सामान्य माणसासारखं जीवन जगतात. सुरुवातीपासून एसटीनेच प्रवास करतात.
त्यांनी काळाबरोबर राहण्यासाठी समाज माध्यमाचाही नियमित उपयोग सुरू केला आहे. पण ते प्रामुख्यानं शेती, साहित्य आणि सामाजिक विषयावरच लिहितात. ‘सारं काही बाबाराव मुसळे’ या नावाचं यू-ट्यूब चॅनेलही त्यांनी सुरू केलेलं आहे. प्रत्येक आठवड्याला त्यावर एक कथाकथन ते करतात. प्रत्येक वेळी नवी कथा ते लिहितात.
शेतीमध्ये जे जे नवं घडतं ते त्यांच्या नव्या कथांमधून अगदी जिवंतपणे येतं. प्रेमचंदांसारखंच समग्र कृषिदर्शन, ग्रामदर्शन बाबारावांच्या कथेतून पाहायला मिळतं. खरंतर आता पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या समग्र कथांचे खंड प्रकाशित करायला हरकत नाही.
प्रसिध्द अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक बाबाराव मुसळे यांच्या ‘हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीवर चित्रपट तयार करण्याच्या विचारात आहेत. मला या गोष्टीचा खूप आनंद झाला. खरं तर बाबारावांच्या कथांवर, कादंबऱ्यांवर या आधीच चित्रपट आणि दूरदर्शन मालिका निघायला पाहिजे होत्या.
पण सामाजिक जाणिवेचे निर्माते आणि दिग्दर्शक आता फारसे नसल्यामुळं बाबारावांच्या जिवंत साहित्याकडं या माध्यमातल्या कुणाचं फारसं लक्ष गेलेलं नाही.
बाबाराव सुरुवातीपासूनच नव्या पिढीच्या पाठीमागं कायम उभे राहिलेले आहेत. मला आठवतं, तीस वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘आम्ही काबाडाचे धनी’ या माझ्या दीर्घ कवितेवर त्यांनी दीर्घ पत्र लिहिलं होतं. तेव्हापासून ते मागच्या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘भूमिनिष्ठांची मांदियाळी’पर्यंत ते असं कायम माझ्या पाठीशी उभे राहिले.
खेड्यापाड्यातून लिहिणारे नवे लेखक आवर्जून त्यांना पुस्तकं पाठवतात. बाबाराव त्यांना त्यांच्या गुणदोषासह सविस्तर अभिप्राय कळवतात. त्यातून नव्या लेखकांना प्रेरणा मिळते, आपल्या उणिवाही उमजतात.
एकेकाळी पु. ल. देशपांडे यांच्या पत्रांसाठी बाबारावांची पिढी आसुसलेली असायची. तशी बाबारावांना पहिल्याच कादंबरीला पुलंची मनःपूर्वक दादही मिळालेली होती. आता नव्याने लिहिणाऱ्या ग्रामीण भागातल्या मुलांना बाबाराव हेच पुलंच्या जागी आहेत.
बाबारावांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे साहित्यातल्या सगळ्या गटातटांपासून ते अलिप्त असतात. ते कुठल्याच गटात वावरताना दिसत नाहीत. त्यामुळं अनेक सन्मानापासून ते वंचित राहतात. पण त्याची त्यांना खंत नाही. वाटेल तसं जगावं. वाटेल ते लिहावं. वाटेल त्याला दाद द्यावी. अमुकच एक रस्ता पकडून इतरांना त्यावर येऊ द्यायचं नाही हा अलीकडच्या गटातटांचा नियम ते अजिबात पाळत नाहीत.
काळानं आपला भोवताल लिहून ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे या कर्तव्याची व कठोर युगभानाची जाणिव बाबाराव यांनी सतत ठेवलेली आहे. त्यामुळं कुठल्याही प्रलोभनासाठी ते लेखन करत नाहीत. एक जबाबदारी म्हणूनच ते लेखन करतात. म्हणून बाबारावांसारखा लेखक मराठी भाषेत आहे, ही मराठी माणसांची श्रीमंती आहे.
कुठलीही गोष्ट गांभीर्यानं करणं हे बाबारावांच्या स्वभावाचं आणखी एक वैशिष्ट्य. वंजारी समाज संमेलनाचं त्यांचं अध्यक्षीय भाषण वाचलं की आपल्या लक्षात येतं की ते कुठलीही गोष्ट किती तयारी करून, किती अभ्यास करून करतात. अशी प्रत्येक गोष्टीची काळजी करणाऱ्या माणसाला मधुमेहानं नाही गाठलं तरच नवल.
गेल्या पंचवीस वर्षांपासून बाबाराव मधुमेही आहेत. पण त्यांनी त्या मधुमेहाला आता जीवनसखा म्हणून सोबत घेतलेलं आहे. त्यावर मात करून ते छान पैकी जगत आहेत. लिहीत आहेत, फिरत आहेत, श्रमत आहेत, शेती करत आहेत. आणि मधुमेहाला हे दाखवून देत आहेत की तू नाही तर मी तुझ्यावर विजय मिळवलेला आहे.
सहा महिन्यांपूर्वी मी उत्स्फूर्तपणे बाबारावांवर कविता लिहिली.
हा लिहितो आणिक जगतो लिहितो ते ते
हा खरेच करतो शब्द लिहिले जे जे
हा खोल खोदतो माती जिथवर ओली
हा मोजत जातो तसाच अनुभव खोली
हे चिवट रोपटे उजाड माळावरचे
दुर्दम्य तयाला आशिष देवाघरचे
हा दोहन करतो भाकड जागेवरती
दूध हाल्याही देतो अशीच याची ख्याती
हा उत्सुक पाहण्या मोहरलेला चंद्र
त्यासाठीच जळते निवांत याची रात्र
हा शब्द पेरतो जसे स्वातीचे मोती
मग मोहरून येते त्यातून वऱ्हाड माती
(लेखक प्रसिद्ध कवी आहेत.) ९८३४३३९२११
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.