सूक्ष्मजीव, जैविक अर्काचे महत्त्व

भारतीय शेतीतील महत्त्वाच्या किडी : अळी वर्गीय (नाग अळी, घाटे अळी, लष्करी अळी, हुमणी), मिली बग, पिन होल किंवा स्टेम बोरर, थ्रिप्स, जॅसीड, पांढरी माशी इ.
Microorganisms, Biological
Microorganisms, BiologicalAgrowon

महत्त्वाची सूक्ष्मजीवयुक्त कीटकनाशके :
मेटारायझिम ॲनिसोपली, बिव्हेरिया बॅसियाना, व्हर्टिसीलिअम लेकॅनी, हिर्सुटेला थॉम्पसनी.

वरील कीटकनाशके बुरशीपासून (Pesticides from fungi) मिळवलेल्या घटकांद्वारे तयार केली जातात. ते विविध किडींचे नियंत्रण करण्यास मदत करतात.
मेटारायझिम ॲनिसोपली ही बुरशी २८ प्रकारचे डिस्ट्रक्सिन (कीटकनाशक घटक) तयार करते.
बिव्हेरिया बॅसियाना ही बुरशी बॅसियानीन व बिव्हेरिसिन ही कीटकनाशके तयार करते.

व्हर्टिसीलिअम लेकॅनी ही बुरशी डिपोकोलॉनिक ॲसिड, सायक्लोस्पोरीन ही कीटकनाशक अर्क तयार करते.
हिर्सुटेला थॉम्पसनी ही बुरशी हिर्सुटलीन ए व हिर्सुटलीन बी हे कोळीनाशक अर्क तयार करते.

Microorganisms, Biological
कुजणे: शेतीतील सर्वांत महत्त्वाची प्रक्रिया

मेटारायझिम मेटारायझिम या बुरशीचे वैशिष्ट्ये
-बऱ्याच किडींसाठी उत्कृष्ट कीटकनाशक.
-सेंद्रिय किंवा नैसर्गिक घटक कुजवून खत करण्यात मदत करते.
-वनस्पतीची वाढ करणे, रोग प्रतिकारक्षमता वाढणे यात मदत.
-वनस्पतीच्या (Tree) आत राहूनही कार्य करते.
-ब्राझील या देशामध्ये मेटारायझिम या बुरशीचा वापर ऊस पिकात ५० लाख एकर क्षेत्रावर करण्यात येतो.
-ही बुरशी मृत किडींमधील नत्र वनस्पतीला देतात. वनस्पतीतील कार्बन स्वतःच्या वाढीसाठी वापरतात.

मेटारायझिम बुरशीमुळे किडीचा मृत्यू कसा होतो?
मेटारायझिम बुरशीच्या कोनिडीया जेव्हा किडींच्या संपर्कात येते, तेव्हा किडींच्या शरीरावर सर्वप्रथम चिटकून राहतात. मेटारायझिम बुरशीच्या कोनिडीयाचे अंकुरण होऊन मायसिलियमचे जाळे किडीच्या शरीरावर होते. अंकुरणानंतर अप्रेजोरीयम तयार होते. त्याच्या साह्याने बुरशी किडीच्या शरीरात शिरते. किडीच्या शरीरातील संपूर्ण अन्नद्रव्य संपवते. त्यामुळे कीड मृत होते. मृत किडीच्या शरीरात व बाहेरून मेटारायझिमची बुरशी वाढते.
मेटारायझिम किंवा बिव्हेरिया या सोबत वनस्पतींचे अर्कांचा वापर केल्यास चांगले परिणाम दिसतात. उदा. निमतेल अर्क व करंजतेल अर्क.
निमयुक्त निविष्ठांच्या वापरातून हेलिकोव्हर्पा व स्पोडोप्टेराचे नियंत्रण करता येते.
एकात्मिक नियंत्रणामध्ये वापर केल्यास टोमॅटोमधील नाग अळी (ट्युटा ॲबसोल्युटा), लाल कोळी व फ्रूटबोररचे नियंत्रण करणे शक्य होते.
नीम व करंज अर्काचा लष्करी अळी, हेलिकोव्हर्पा अळीचे नियंत्रण शक्य.

जैविक व रासायनिक कीडनाशकांतील फरक :
जैविक कीडनाशकाची वैशिष्‍ट्ये
१) सूक्ष्मजीवांच्या कोनिडिया, मायसिलियम, ब्लास्टोस्पोर, एन्झाइम्स आणि जैविक अर्क (मेटॅबोलाइट) अशा वेगवेगळ्या कार्यरत घटकांमुळे कीड अथवा रोगकारक सूक्ष्मजीवांमध्ये प्रतिकारकता विकसित होत नाहीत.

रासायनिक कीडनाशकांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या
- सातत्याने वापर केल्यास किडी व रोगकारक घटकांमध्ये प्रतिकारकता विकसित होते. पुढे त्या रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाला दाद देत नाहीत. उदा. ढोबळी मिरचीमधील फूलकिडे ३०, मक्यातील लष्करी अळी ४० विविध प्रकारच्या
रासायनिक कीटकनाशकाला दाद देत नाही. उसामध्ये आढळणारी हुमणीही अनेक रासायनिक कीटकनाशकांना दाद देत नाही. म्हणजेच कोणतेही रासायनिक कीडनाशक हे कायमस्वरूपी प्रभावी राहू शकत नाही. त्या तुलनेमध्ये ट्रायकोडर्मा किंवा मेटारायझिमसारख्या मित्र बुरशा मागील १०० वर्षांपासून प्रभावी आहेत.
विविध समस्या आणि विषारी अंश पिकात शिल्लक राहण्याच्या समस्येमुळे अनेक रसायनांवर निर्बंध किंवा बंदी घालण्यात येत आहे. युरोपियन महासंघाच्या कीडनाशकांच्या यादीतून दर वर्षी मान्यताप्राप्त रसायनांची संख्याही कमी होत आहे.
२०२० मध्ये भारत सरकारही २७ रसायनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे.
म्हणजेच हळूहळू शेती नियोजनातून आपल्याला रासायनिक घटकांचा वापर कमी करत न्यावा लागणार आहे.
रासायनिक शेती - एकात्मिक शेती - रेसिड्यू फ्री शेती - जैविक किंवा सेंद्रिय शेती - नैसर्गिक शेती.

शेतबांधावरील प्रयोगशाळेतून उपलब्ध घटकांचा वापर करून जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष देणे गरजेचे राहील. यापूर्वीच्या भागामध्ये आपण ग्रामीण भागात उपलब्ध घटकांद्वारे जमिनीची सुपीकता वाढण्याची माहिती घेतली. काही सेंद्रिय पदार्थ शहरी भागातूनही उपलब्ध होऊ शकतात.
शाश्‍वत शेतीसाठी वापरले जाणारे जैविक अर्क, घटक ः
सागरी शेवाळ (सी वीड), पोटॅशिअम हुमेट, निमअर्क, दालचिनी अर्क, करंजतेल अर्क, सिलिकॉन, फंगल मायसेलिया, कायटोझन, कायटिन, ग्लुकॅन इ.

सागरी शेवाळाचे शेतीतील महत्त्व
१) वनस्पती आधारित वाढ प्रवर्तके म्हणून कार्य,
२) तपकिरी सागरी शेवाळ (ब्राऊन सी वीड) हे पिकांमध्ये अजैविक ताणाविरुद्ध सहनशीलता वाढवते.
३) सी वीडच्या वापराने अल्टरनेरिया, फ्युजारिअम, बोट्रायटिस, कोलेटोट्रीकम, फायटोप्थोरा यांसारख्या रोगकारक सूक्ष्मजीवांच्या नियंत्रण उपयुक्त असल्याचे दाखले उपलब्ध आहेत.
४) सी वीड अर्क अधिक कायटोझेन वापरल्याने पावडरी मिल्डू (भुरी) रोगाचे नियंत्रणास मदत होते.
५) सूत्रकृमीचे नियंत्रणास मदत.
६) द्राक्ष फळांची गुणवत्ता वाढवते.
७) विविध पिकांमध्ये पोषक तत्त्वांची उपलब्धता होते.
८) एस्कोफिलम प्रजातीतील अल्जिनिक ॲसिड जड धातूंचे शोषण करून सांडपाणी प्रक्रिया करण्यास मदत करते
९) सी वीड वापरामुळे टोमॅटो पिकात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होते. पालक पिकात उष्णतेचा ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होते. उपयुक्त अन्नद्रव्याची मात्रा वाढते.

सूत्रकृमीचे नियंत्रण
परजीवी सूत्रकृमीचा प्रादुर्भाव मातीतून होत असल्याने लक्षात येईतो खूप उशीर झालेला असतो. सूत्रकृमींच्या सुमारे ४३०० प्रजाती ओळखल्या गेल्या असून, त्या विविध पिकांवर हल्ला करतात. त्यामुळे झाडे कोमेजणे आणि पिवळे होणे अशी सामान्य लक्षणे दिसतात. जागतिक सोयाबीन उत्पादनातील ९.३ टक्के नुकसान हे सिस्ट निमॅटोड आणि रूट नॉट निमॅटोडमुळे होते. सूत्रकृमीतील मेल्डोगायिन आणि सिस्ट हे प्रकार सर्वाधिक नुकसान करतात.
व्यावसायिकरीत्या उपलब्ध सागरी शेवाळ अर्कापैकी तपकिरी शेवाळ (विशेषतः एस्कोफिलम नोडोसम) हे मोठ्या प्रमणात वापरले जाते. ती जैविक आणि अजैविक ताणांपासून पिकांचे संरक्षण करतात. काही सागरी शेवाळाचे अर्क सूत्रकृमी नियंत्रित करत असल्याचे दाखले आहेत. मात्र नियंत्रण नेमके कशा प्रकारे होते, हे ज्ञात नाही. त्यामुळे सागरी शेवाळातील फ्यूसिओडॅन्स आणि अल्जिनेट सारखे घटक उपयुक्त असल्याचा दावा केला जात असला तरी त्यावर अधिक अभ्यास होण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com