कुजणे: शेतीतील सर्वांत महत्त्वाची प्रक्रिया

सेंद्रिय पदार्थ कुजतात आणि त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर होते.
Decomposition
Decomposition Agrowon
Published on
Updated on

सहज कुजणाऱ्या पदार्थांपासून अस्थिर कणरचना तयार होते, तर कुजण्यास(rot) जड असणारे पदार्थ कुजविल्यास पाण्यात स्थिर कणरचना तयार होते. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची पाण्यात स्थिर कणरचना करणे सर्वांत फायद्याचे आहे.

सेंद्रिय पदार्थ (Organic matter) कुजतात आणि त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर होते. उकिरड्यावर चार-पाच महिने शेण, गदाळ्याचा ढीग पडला की त्याचे तपकिरीसारखे खत तयार होते. मग चांगले कुजलेले खत जमिनीत मिसळण्यासाठी तयार झाले आहे, इतकेच आजवर शेतकरी मानत आला आहे. खत नेमके कसे होते, कोण करते हे काम याबाबतची जादा माहिती फारशी कोणाला घ्यावी असे वाटले नाही. माझीही २५-३० वर्षे वाटचाल अशीच झाली. सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासास सुरुवात झाल्यानंतर या प्रक्रियेचे शेतीतील महत्त्व लक्षात येत गेले. आज मी म्हणतो, की सेंद्रिय पदार्थांचे कुजणे ही एक शेतीतील सर्वांत महत्त्वाची प्रक्रिया आहे. याचा अभ्यास प्रत्येक शेतकऱ्याने करणे गरजेचे आहे.

Decomposition
आरोग्याचा मूलमंत्र जपत सेंद्रिय शेतीचा घेतला वसा

कुजण्याच्या प्रक्रियेतून शेतीला सेंद्रिय खत (Organic fertilizer for agriculture) मिळते, हे जसे जमिनीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाचे आहे तसेच कुजण्याच्या क्रियेतून वनस्पती व प्राण्यांनी निर्माण केलेला जैवभार संपून जाऊन त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर होऊन त्यातून पुढील वनस्पतीची वाढ होते. एका विचारवंताने याबाबत मत मांडले आहे, की कुजण्याच्या क्रियेतून जैवभार संपविण्याचे काम ठप्प झाले तर ही पृथ्वी थोड्याच काळात या जैवभाराने इतकी भरून जाईल, की मानवाला पृथ्वीवर पाऊल ठेवायला जागा शिल्लक राहणार नाही. जुना काडीकचरा संपून जाणे आणि त्यातून नवनिर्मिती होणे, हा कर्ब चक्रातील महत्त्वाचा भाग या क्रियेतून होतो. तसे या क्रियेचे आणखी भरपूर फायदे आहेत.

सेंद्रिय पदार्थ कुजताना
सह्याद्री घाटाकडेला पाऊस भरपूर पडतो. तेथे धरणे बांधून ते पाणी अवर्षणप्रवण भागाकडे वळविल्याने महाराष्ट्रात हजारो एकर जमीन बागायत झाली आहे. गेली अनेक वर्षे या भागात शेती केल्यानंतर जमिनीचा सामू अल्कतेकडे गेल्याचे बहुतेक सर्वत्र दिसून येते. अशी अल्कता ७.५ च्या पुढे जाऊ लागली, की त्यामुळे अन्नपोषणात अनेक अडथळे उत्पन्न होतात. ही अल्कता नेमकी येते कोठून, हा प्रश्‍न अनेक वर्षे मला सतावत होता. अनेक कृषी रसायनशास्त्रज्ञांना या प्रश्‍नाबाबत सविस्तर माहिती विचारली; परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नाही. सेंद्रिय शेतीवाले याचे खापर अतिरिक्त रासायनिक खत वापराला देऊन रिकामे होतात. सर्व रासायनिक खतांचे शेष भाग आम्लधर्मी आहेत. रासायनिक खतांमुळे(Chemical fertilizer जमिनी खराब झाल्या असत्या तर आम्लधर्मी होणे गरजेचे होते.

Decomposition
केंद्र, राज्याच्या मदतीने सेंद्रिय शेतीला गती देणार 

सूक्ष्मजीवशास्त्राच्या पुस्तकात संदर्भ मिळतात, की सेंद्रिय पदार्थ कुजत असता अनेक सेंद्रिय आम्लांची निर्मिती होते, कुजणे याउलट वाढणे. यातून असे लक्षात येते, की वनस्पती वाढण्याच्या क्रियेतून अल्कता निर्माण होत असावी. निसर्गनियमाप्रमाणे अशी अल्कता कुजण्याच्या क्रियेतून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय आम्लाकडून उदासिनीकरण होऊन संपून जायला हवी; परंतु आपल्या पारंपरिक पद्धतीत अल्क निर्माण करणारी क्रिया म्हणजे पीक वाढणे जमिनीत होते, तर आम्ल निर्माण करणारी क्रिया जमिनीच्या बाहेर खड्ड्यात किंवा ढिगात होते. पुस्तकात संदर्भ असे आहेत, की ही आम्ले अतिशय अस्थिर असतात. त्यांना तेथे काम नसेल तर ती कर्बवायू + पाणी अशी संपून जातात. चांगले कुजलेले खत वापरत असता त्यात आम्ले संपून गेलेली असतात. मग सालोसाल जमिनीत अल्कता साठत जाते. काही दिवसांनी धोक्‍याची पातळी ओलांडली, की जमिनीच्या सुपीकतेचे प्रश्‍न निर्माण होतात.
१) संवर्धित शेतीत थेट शेतातच कुजण्याची क्रिया झाली पाहिजे हा नियम ही तयार होणारी अल्कता मारणेशी संबंधित असली पाहिजे. काही सल्लागार ही अल्कता मारणेसाठी गंधकाम्ल अगर स्फुरदाम्ल वापरण्याची शिफारस करतात. हा उपाय खर्चिक व तात्पुरत्या
परिणामाचा आहे. जागेला कुजविणे हा फुकटातला नैसर्गिक उपाय आहे.
२) सेंद्रिय आम्लाप्रमाणे आणखी एक उपपदार्थाची निर्मिती या कुजण्याच्या क्रियेतून होत असते. एक डिंकासारखा पदार्थ (ज्याला वैज्ञानिक भाषेत पॉलीसॅकराइड असे म्हणतात) निर्माण होतो. हा डिंकासारखा पदार्थ अनेक मातीचे लहान कण एकत्र आणून त्याची दाणेदार रचना तयार करतो. शास्त्रीय भाषेत त्याला मातीची कणरचना म्हणतात. या कण रचनेचा जमिनीच्या निचराशक्तीशी संबंध आहे. ही कणरचना दोन प्रकारची असते. पाण्यात स्थिर व अस्थिर. याचा अर्थ अस्थिर कणरचनेचे कण पाण्यात टाकल्यानंतर एकमेकांपासून विलग होतात, तर स्थिर रचनेचे कण पाण्यात टाकल्यानंतर आपला आकार थोडा वाढवितात; परंतु कण एकमेकांपासून दूर जात नाहीत. आता शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पाण्यात स्थिर कणरचना आहे. ३) कुजणाऱ्या पदार्थांचे वर्गीकरण १) सहज, २) मध्यम आणि ३) दीर्घ मुदतीने कुजणारा पदार्थ या तीन प्रकारात केले जाते. सहज कुजणाऱ्या पदार्थांपासून अस्थिर कणरचना तयार होते, तर कुजण्यास जड असणारे पदार्थ कुजविल्यास पाण्यात स्थिर कणरचना तयार होते. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची पाण्यात स्थिर कणरचना करणे सर्वांत फायद्याचे आहे. केवळ शेणखताच्या (manure) वापराने हे कधीच शक्‍य नाही.
४) संवर्धित शेती पद्धतीत मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष कोणताही धक्का न लागता कुजविल्यास आपोआप अशी कणरचना जमिनीला प्राप्त होते. कृष्णाकाठच्या जमिनी जड असून, निचऱ्याचे प्रश्‍न गंभीर आहेत. तेथे संवर्धित शेतीचा वापर केल्यास निचराशक्तीत खूप चांगली सुधारणा झाल्याचे गेले सात-आठ वर्षे अशी शेती करीत असलेल्या शेतकऱ्याने कळविले आहे. रात्रभर पाऊस झाल्यास शेजारच्या शेतकऱ्यांच्या (Farmer) सऱ्या भरलेल्या असतात, तर संवर्धित शेतीतील पाणी पूर्ण जिरून गेलेले असते.


इन्फो:
स्थिर सेंद्रिय कर्ब
१) कुजण्यास हलका पदार्थ कुजविल्यास जे खत तयार होते ते हलक्‍या दर्जाचे असते. याचा अर्थ एक तीन-चार महिन्यांच्या हंगामी पिकाअखेर त्याचा परिणाम संपून जातो.
२) कुजण्यास जड असणारे पदार्थ कुजविल्यास स्थिर सेंद्रिय कर्ब तयार होतो, ज्याची उपलब्धता जमिनीत काही वर्षांपासून शेकडो वर्षांपर्यंत असू शकते.
३) पारंपरिक पद्धतीत आपण केवळ लवकर संपून जाणारे खतच वापर करीत आलो आहोत. स्थिर सेंद्रिय कर्बाची जमिनीला ओळखच नाही. शास्त्रीय भाषेत स्थिर सेंद्रिय कर्बाला ह्युमस असे नाव आहे. कोणतेही सेंद्रिय खत म्हणजे ह्युमस नव्हे. कुजण्यास जड असणारे वनस्पतीचे भाग चुलीत चांगली धग देतात. यामुळे समाजाची जळणाची गरज या पदार्थांनी भागविली. आता गॅस इंधन तळागाळापर्यंत पोचल्याने असे पदार्थ जमिनीच्या वाट्याला उपलब्ध होणे शक्‍य आहे.
४) कुजण्यास हलके पदार्थ बॅक्‍टेरियाकडून, तर मध्यम दर्जाचे ॲक्‍टिनोमायसेटस व कुजण्यास जड पदार्थ बुरशीकडून कुजविले जातात. एका शास्त्रज्ञाने आपल्या पुस्तकात लिहिले आहे, की तुम्हाला जमिनीची सुपीकता वाढवायची असेल तर जमिनीत बुरशीची संख्या वाढली पाहिजे. याचा सरळ अर्थ जमिनीत कुजायला जड असणारे पदार्थ कुजविले पाहिजेत. सूक्ष्मजीवशास्त्राचे हे नियम शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

इन्फो:
जमिनीतील सूक्ष्मजीवांचे गट:
१) सेंद्रिय पदार्थ कुजविणारा गट
२) पिकाला अन्नपुरवठा करणारा गट
यातील पहिला गट जमिनीला सुपीकता देत असतो, तर दुसरा पिकाला पोषण. दुसऱ्या गटाचा सुपीकतेशी संबंध नाही. आजपर्यंत आपण चांगले कुजलेले खतच (Fertilizer) वापरत आलो आहोत. याचा अर्थ जमिनीत कुजविणारी जिवाणूसृष्टी वाढण्यास वावच शिल्लक ठेवलेला नाही. इथे फक्त दुसऱ्या गटातील जिवाणूच वाढू शकतात. परिणाम पिकाचे उत्पादन मिळते, तर सुपीकता कमी होत जाते. कालांतराने सुपीकताही नाही आणि उत्पादनही नाही. आज सर्वत्र अशीच परिस्थिती आहे.
१) कुजविणाऱ्या तसेच अन्नपोषणात बॅक्‍टेरिया, ॲक्‍टीनोमायसेटस व बुरशीच्या अनेक जाती-प्रजाती कार्यरत असतात. आपण जमिनीत सहजपासून कुजण्यास जड असणाऱ्या पदार्थांचे मिश्रण उपलब्ध करून द्यावयाचे. परिस्थितीकी कोणाला अनुकूल असेल तो पुढील काम करेल हे निसर्गाचे काम आहे. ते मी शोधलेल्या जिवाणूकडून झाले पाहिजे हा अट्टहास योग्य नाही.
२) कुजण्याच्या क्रियेतून अनेक सेंद्रिय आम्ले, संजीवके व वाढ वृद्धिंगत पदार्थ तयार होत असतात जे आज प्रयोगशाळेत कृत्रिमपणे बनवून विक्रीस बाजारात उपलब्ध आहेत. शेतकऱ्याने हे पदार्थ थेट जमिनीत तयार करायला शिकले पाहिजे. हे सर्व काम सूक्ष्मजीवाकडून पार पाडले जात असल्याने फक्त या शास्त्रशाखेच्या अभ्यासातच ज्ञात होतात. ही सर्व माहिती आज अंधारात आहे. त्याबाबत आपण पुढे स्वतंत्र लेखात चर्चा करणार आहोत.

संपर्क:
प्र. र. चिपळूणकर: ८२७५४५००८८
(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com