Poultry Manuers : कोंबडी खताचा वापर कसा करायचा?
सध्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे (Organic Carbon) प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे.
बऱ्याच प्रकारची सेंद्रिय खते उपलब्ध आहेत. त्यामध्ये कोंबडी खत (Poultry Manure) हा उत्तम पर्याय आहे. कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते.
कोंबडी खताचे गुणधर्म आणि कोंबडी खताचा वापर कसा करायचा? याविषयी मृद्शास्त्र व कृषी रसायनशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
कोंबडी खताचा शेतीत वापर करताना...
मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडीखत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी; मात्र ताजे कोंबडीखत उभ्या पिकांत जमिनीत मिसळू नये.
उभ्या पिकांत कोंबडीखत जमिनीत मिसळण्यापूर्वी प्रथम त्यावर एक महिना पाणी मारून रापून किंवा थंड होऊ द्यावे म्हणजे कोंबडीखताचे कर्ब : नत्र गुणोत्तर कमी होऊन त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
कोंबड्यांच्या शेडमध्ये कोंबड्यांची विष्ठा, मूत्र, गव्हांडा किंवा भाताच्या तुसावर पडून खत तयार होते, त्यामुळे ताज्या कोंबडीखताचे कर्ब : नत्र गुणोत्तर जास्त असते. असे खत उभ्या पिकांत जमिनीत मिसळताना ओलावा असला पाहिजे.
जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर पीक पिवळे पडते, त्यामुळे ताजे कोंबडीखत थेट पिकांसाठी वापरू नये. उभ्या पिकांत पूर्ण कुजलेले कोंबडीखत वापरावे.
हलक्या, जास्त निचऱ्याच्या, लालसर तांबड्या जमिनीत कोंबडीखतातील नत्र, स्फुरद, पालाश अन्नद्रव्यांव्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व सोडिअमचे प्रमाण जमिनीत मिसळले जाऊन पिकांना उपलब्ध होतात. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. शेणखतासारखा तणांचा प्रादुर्भाव कोंबडीखतातून होत नाही.
कोंबडी खत कसे असावे?
खताचा रंग भुरकट, तपकिरी, काळपट असावा. वास मातकट असावा
खताचा सामू ६.५- ७.५ दरम्यान असावा.
कणांचा आकार ५ ते १० मिमी असावा.
कर्ब नत्र गुणोत्तर १:१० ते १:२० दरम्यान असावे.
जलधारणाशक्ती ३० टक्क्यांपेक्षा जास्त असावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.