Team Agrowon
युरियाचा अवाजवी वापर टाळण्यासाठी खते देण्यापूर्वी माती परीक्षण करावे आणि मिळालेल्या अहवालानुसार खते द्यावीत.
नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करावा. याशिवाय हिरवळीच्या खतांचाही वापर करावा.
पिकाला एक किलो नत्र देण्यासाठी २.१७ किलो युरिया विभागून द्यावा
युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना ॲझोटोबॅक्टर किंवा ॲसिटोबॅक्टर जिवाणू संवर्धक आणि द्विदल पिकांना रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी. जिवाणू खताच्या वापरामुळे तृणधान्य, द्विदल पिके व भाजीपाला पिकांमध्ये १५ ते २० टक्के नत्राची बचत होते. उसामध्ये ५० टक्क्यांपर्यंत बचत होते.
पाणथळ जमिनीत प्रामुख्याने अमोनियाधारक नत्रयुक्त खतांचा वापर करावा. कोरडवाहू शेतीमध्ये नत्रयुक्त खते पेरणीच्या वेळेस पेरून द्यावीत.
नायट्रेटयुक्त खते वाहून जाऊ नयेत म्हणून नियंत्रित आणि हलकी ओलिताची पाळी द्यावी. चोपणयुक्त जमिनीत युरिया हे शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताबरोबरच द्याव. युरिया खताची मात्रा २५ टक्क्यांनी वाढवून द्यावी.
राज्यातील ५२ टक्के जमिनीत गंधकाचे प्रमाण कमी आहे.अशा जमिनीत युरियाला पर्यायी अमोनिअम सल्फेटचा वापर केल्यावर पिकांना नत्राबरोबर गंधक हे अतिरिक्त अन्नद्रव्य मिळून त्याचे चांगले परिणाम दिसतात.