Sweet Potato Crop : अनेक ठिकाणी बटाट्याच्या (Potato) खालोखाल रताळ्याचे पीक घेतले जाते. रताळ्याचे पीक घेण्यास साधारणपणे ४-५ महिन्यांचा कालावधी लागतो.
भारतात रताळ्याची लागवड सर्व राज्यांत कमी-अधिक प्रमाणात होते. महाराष्ट्रात सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, धुळे व अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये हे पीक घेतले जाते. भारतात मुख्यत: पांढऱ्या अथवा लाल सालींची रताळी लागवडीखाली आहेत.
त्यातील मगज पांढरा असतो. लाल सालीची रताळी पांढऱ्या सालीच्या रताळ्यांपेक्षा जास्त गोड असतात. पांढऱ्या सालीची रताळी बहुधा एकसारख्या आकाराची असून ती जास्त दिवस टिकतात. उत्तर भारतात लाल तर दक्षिण भारतात पांढरी रताळी जास्त पसंत करतात. भारतात सेंट्रल ट्यूबर क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट येथे रताळ्यासंबंधी संशोधन केले जाते.
रताळ्यात पाणी ६८%, प्रथिने १%, मेद ०·३%, कर्बोदके (स्टार्च) २८%, तंतुमय पदार्थ व खनिज पदार्थ १% असून अ, क आणि ब-समूह जीवनसत्त्वे असतात. त्याचे साठवण करताना स्टार्चच्या काही भागाचे शर्करांमध्ये रूपांतर होते.
पूरक अन्न म्हणून रताळी कच्ची किंवा शिजवून खातात. ती उकडल्यामुळे त्यांची गोडी वाढते. रताळे पौष्टिक तसेच सारक आहे.
रताळ्यात व वेलीमध्ये कवकनाशक व सूक्ष्मजीवनाशक घटक आढळून येतात. जपानमध्ये रताळ्याच्या गराचे किण्वन करून शोशू नावाचे मद्य बनवितात. रताळ्याची सर्वाधिक लागवड चीनमध्ये केली जाते.
रताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम निचऱ्याची जमीन या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी. टेकडीच्या उतारावरील वरकस जमिनीत हे पीक घेता येईल. लागवडीकरिता जमीन १५ ते २५ सें.मी. खोलीपर्यंत नांगरून किंवा खोदून घ्यावी. ६० सें.मी. अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत.
लागवड करण्यासाठी कोकण अश्विनी, वर्षा किंवा श्रीवर्धनी या जातींचा वापर करावा. लागवड जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण करावी. लागवडीसाठी वेलांच्या शेंड्याकडील व मधल्या भागातील बेणे निवडावे. बेण्याची लांबी २० ते ३० सें.मी. असावी, त्यावर तीन ते चार डोळे असावेत. एका गुंठा क्षेत्रासाठी वेलाचे ८०० तुकडे लागतात.
लागवड करताना बेणे वरंब्यावर २५ सें.मी. अंतरावर लावावे. प्रत्येक ठिकाणी एक फाटा (बेणे) लावावे. बेण्याचा मधला भाग जमिनीत पुरावा व दोन्ही टोके उघडी ठेवावीत. बेण्याच्या मधल्या भागावरील दोन डोळे मातीत पुरले जातील, अशी काळजी घ्यावी.
सऱ्या करण्यापूर्वी पुरेसे शेणखत मिसळावे, तसेच लागवडीच्या वेळी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ७५ किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. लागवडीनंतर ४० दिवसांनी ४० किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे.
लागवड केल्यानंतर १५ दिवसांनी पहिली बेणणी करावी. दुसरी बेणणी लागवड केल्यापासून ३० दिवसांनी करावी. त्याच वेळी वेलांना रासायनिक खतांचा दुसरा हप्ता देऊन भर द्यावी. जमिनीत टेकलेल्या वेलांच्या डोळ्यातून मुळे फुटतात.
अशा वेळी लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांच्या दरम्यान शेंड्याकडील भागाचा गुंडाळा करून ठेवल्यास मुळे फुटत नाहीत. लागवडीनंतर सुमारे साडेतीन ते चार महिन्यांनी पाने पिवळी पडू लागल्यानंतर रताळ्याची काढणी करावी.
------------
संशोधन व माहिती - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
------------
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.