
God Jowar : ज्वारी हे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामातील प्रमुख पीक आहे. धान्य आणि चाऱ्याची गरज भागविण्यासाठी ज्वारीची लागवड होते. गोड ज्वारी देखिल नेहमीच्या खरीप ज्वारीसारखीच असते.
मात्र, जास्त कायीक वाढ आणि तिच्या ताटाच्या रसामध्ये अधिक साखरेचे प्रमाण (ब्रिक्स) असल्याने त्यास गोड ज्वारी म्हणतात.
या ज्वारीच्या ताटामध्ये उसासारखी गोडी असते. त्याच्या रसापासून काकवी किंवा गूळ आणि इथेनॉल बनविता येते. खरीप ज्वारीला पर्यायी पीक म्हणून गोड ज्वारीची लागवड करता येते.
गोड ज्वारी लागवडीचे तंत्र
खरीप किंवा रब्बी ज्वारी प्रमाणेच गोड ज्वारीची लागवड करता येते. गोड ज्वारी खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात घेता येते.
खरीप हंगामात ज्वारीची पेरणी योग्य पाऊस झाल्याबरोबर १५ दिवसाच्या आत करावी. उन्हाळी हंगामात गोड ज्वारीची पेरणी डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत करावी.
पेरणीच्या वेळी रात्रीचे तापमान १० ते १२ सेल्सिअस पेक्षा जास्त असावे. सरी वरंबा पद्धतीने लागवड केल्यास जमिनीत ओलावा कायम टिकून राहतो.
दोन ओळींतील अंतर ६० सें.मी. व दोन झाडामधील अंतर १५ सें.मी. ठेवणे गरजेचे आहे, त्यामुळे झाडाची संख्या एक लाख दहा हजार प्रतिहेक्टरी राहील. पेरणी पूर्वी १२ ते १५ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत वापरावे.
१०० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रति हेक्टरी या रासायनिक खताची शिफारस आहे.
पेरणीसाठी एसएसव्ही-८४ फुले अमृता (आर एस एस व्ही-९), शुगरग्रे, ऊर्जा, सीएसएच-२२, आयसीएसव्ही- ९३०४६, आयसीएसव्ही- २५२७४ हे सुधारित वाण उपलब्ध आहेत.
उत्पादन
काटेकोर व्यवस्थापन केल्यास गोड ज्वारीचा एकरी १२ ते १५ टन हिरवा चारा मिळू शकतो आणि रसापासून हेक्टरी २००० ते २५०० लिटर इथेनॉल मिळू शकते.
रस काढल्यानंतर शिल्लक राहणारा लगदा ज्वलनासाठी तसेच जनावरांचे पौष्टिक खाद्य म्हणून वापरता येतो.
गोड ज्वारी अधिक फायदेशिर का आहे?
गोड ज्वारीचे पीक हे ४ महिन्यांत येते. दर वर्षी दोन पीक घेता येतात.
गोड ज्वारी हे जिरायत पीक आहे. हे पीक जमिनीतील पाण्याचा कार्यक्षमपणे वापर करणारे पीक म्हणून ओळखले जाते.
गोड ज्वारीचा लागवडीचा खर्च कमी येतो.
गोड ज्वारीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून, हा रस इथेनॉलसाठी योग्य आहे.
गोड ज्वारीच्या चोथा पशुखाद्यासाठी उपयुक्त आहे.
काही प्रमाणात धान्याचेही उत्पादन मिळते.
------------
स्त्रोत - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.