
खानदेशातील बऱ्याच केळी बागांमध्ये कुकुंबर मोझॅक (Kukumber Mosaic disease) या विषाणूजन्य रोगाचा (Viral Disease) प्रादुर्भाव झाला आहे. स्थानिक भाषेत या रोगाला ‘हरण्या’ असे म्हणतात. या रोगामुळे बऱ्याच शेतकऱ्यावर संपूर्ण बागंच काढून टाकण्याची वेळ आली आहे. ज्या ठिकाणी केळीची लागवड शिफारस केलेल्या वेळेत म्हणजेच मे, जून महिन्यात झाली आहे त्याठिकाणच्या बागेमध्ये रोगाचा संसर्ग झालेला नाही तर ज्याठिकाणी केळीची लागवड उशीरा म्हणजेच जूलै - ऑगस्ट महिन्यात झालेली आहे त्या बागेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
रोगाचा प्रसार मावा या रसशोषक किडीमार्फत होतो. ऑगस्ट - सप्टेंबर काळात बदलते वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे खरिपातील बऱ्याच पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात आणि जलद होतो. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मावा किडीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. जळगाव येथील केळी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी रोगाची लक्षणे, कारणे आणि उपाययोजनांची पुढील माहिती दिली आहे.
रोगाची लक्षणे कोणती आहेत ?
- सुरुवातीला कोवळ्या पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे दिसतात. हे पट्टे तुटक किंवा संपूर्ण पानावर आढळून येतात. कालांतराने पानाचा पृष्ठभाग आकसला जाऊन कडा वाकड्या होतात. पानांचा आकार लहान होतो.
- नविन येणारी पाने आकाराने लहान होतात. पानाच्या देठाची लांबी कमी होऊन पाने जवळ येतात.
- पानांच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते. पान हाताने दाबल्यास कडकड आवाज होतो.
- प्रादुर्भाव जास्त झाल्यास, पान पिवळे पडून पोंगा सडतो. झाडाची वाढ खुंटते.
- फळे विकृत आकाराची होऊन त्यावर पिवळ्या किंवा काळ्या रंगाच्या रेषा दिसतात. अशी विक्रीसाठी योग्य नसतात.
उपाययोजना काय कराल?
विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करता येत नाहीत. मात्र गाव पातळीवर नियंत्रणासाठी एकत्रितरीत्या मोहीम राबविल्यास रोगप्रसार रोखणे शक्य होते.
- पिकांची फेरपालट करावी.
- रोगमुक्त उतिसंवर्धित रोपांची निवड करावी किंवा रोगमुक्त बागेतून चांगली मातृवृक्ष निवडून त्यांचे कंद लागवडीसाठी वापरावेत.
- प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावीत.
- लागवडीपूर्वी कंद किंवा रोपांवर शिफारशीत कीडनाशकांची फवारणी आणि कंदावर प्रक्रिया अवश्य करावी.
- बागेभोवतीच्या बांधावरिल रान कारली, शेंदणी, करटुले, गुळवेल यांसारख्या रानटी झाडाचे वेल नष्ट करावेत.
- बागेत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, मका या पिकाची लागवड करू नये.
मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० ई.सी) २ मिलि किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्लूजी) ०.२ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एस.एल) ०.५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
किंवा फ्लोनिकॅमीड ७ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
-----------
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.