Agricultural Drone : ड्रोनद्वारे फवारणीची मार्गदर्शक तत्त्वे

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये राबविल्या जाणाऱ्या ड्रोन प्रशिक्षणविषयक विविध उपक्रमाची माहिती दिली आहे.
 Drone Spraying
Drone SprayingAgrowon

Agricultural Drone : या लेखामध्ये आपण ड्रोनद्वारे प्रत्यक्ष फवारणी (Drone Spraying) करताना घ्यावयाची काळजी व मार्गदर्शक सूचना जाणून घेऊ. त्याच प्रमाणे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये (Mahatma Phule Agricultural University) राबविल्या जाणाऱ्या ड्रोन प्रशिक्षणविषयक विविध उपक्रमाची माहिती दिली आहे.

ड्रोनद्वारे प्रत्यक्ष फवारणी करण्यापूर्वी लक्षात घ्यावयाची सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे पुढील प्रमाणे...

अ) ड्रोनविषयक (Drone)

१) आपण ज्याद्वारे फवारणी करणार आहोत, त्या ड्रोनला डीजीसीए (DGCA) नोंदणीकृत युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक (UIN) असावा.

२) फवारणी ड्रोन उडविणारी व्यक्ती (ड्रोनचालक अथवा पायलट) आरपीटीओ (RPTO) प्रशिक्षित, तसेच मान्यताप्राप्त प्रमाणपत्र/ परवानाधारक असावी.

३) चालकाला ड्रोन उडविण्याच्या प्रशिक्षणासोबतच रसायनाचा सुरक्षित वापर करण्याबाबतचे प्रशिक्षण दिलेले असावे.

४) ड्रोनच्या पायलटने ड्रोन उड्डाणाच्या आठ तास अगोदरपर्यंत कोणतेही मादक द्रव्य घेतलेले नसावे.

५) ड्रोन उडविण्यापूर्वी ड्रोनचे विविध घटक उदा. रोटर, प्रॉपेलर, बॅटरी, टाकी फवारणी प्रणाली, जीपीएस (म्हणजेच दिशादर्शक व स्थान निश्‍चित करणारी प्रणाली) इ. योग्य प्रकारे कार्य करत असल्याची खात्री करावी. या सर्व बाबी एकमेकांना किंवा ड्रोनच्या सांगाड्याला व्यवस्थित जोडल्याची याची खात्री करावी.

६) त्यावरील फवारणी यंत्रणेच्या पंपाचा दाब योग्य असल्याची आणि त्याच्या नोझल्समधून द्रावण योग्य प्रमाणात फवारले जात असल्याची खात्री करावी. तसेच टाकी, नळ्या, नोजल्स किंवा त्यांचे जोड येथून कोणतीही गळती होत नसल्याची खात्री करावी.

७) ड्रोन फवारणी उड्डाणासाठी जास्तीचे सुटे भाग व घटक सोबत असावेत. उदा. बॅटरी, बॅटरी चार्जर, प्रॉपेलर, नोझल इ.

 Drone Spraying
Drone Subsidy : राज्यात अडतीस ड्रोनला अनुदान

ब) प्रक्षेत्र विषयक

१) ज्या शेतावर ड्रोनद्वारे फवारणी करावयाची आहे, ते शेत डीजीसीएने ड्रोनद्वारे फवारणीसाठी परवानगी दिलेल्या क्षेत्रात असावे. उदा. ग्रीन झोन, विशिष्ट उंचीपर्यंतचे यलो झोन इ. कोणत्याही प्रकारे ते प्रतिबंधित नसल्याची डीजीसीएच्या डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या भारतीय एअरस्पेस नकाशाद्वारे खात्री करावी.

२) ड्रोन उड्डाणापूर्वी, उड्डाणाची जागा व कीडनाशकांचे मिश्रण तयार करण्याची जागा निश्‍चित करावी.

३) फवारणी करायचे पिकाचे क्षेत्र अन्य पिकांच्या क्षेत्रापासून सुरक्षित अंतरावर असावे. म्हणजे या फवारणीचा अन्य पिकांवर काही परिणाम होणार नाही.

४) पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणापासून किमान १०० मीटरपर्यंत फवारणी करणे टाळावे. अन्यथा, पाणी दूषित होऊ शकते.

५) सरकारी आस्थापना, लष्करी स्थाने किंवा त्या जवळचा भाग, इतर प्रतिबंधित क्षेत्र, लोकांचा समूह, सार्वजनिक कार्यक्रम तसेच खासगी मालमत्ता या ठिकाणी परवानगीशिवाय ड्रोन चालवू नये.

६) ड्रोनद्वारे फवारणीचे क्षेत्र हे अन्य शेती, वसाहत, डेअरी, पोल्ट्री इ. पासून सुरक्षित अंतरावर असल्याची खात्री करावी.

७) फवारणी क्षेत्रावर उच्च दाब विद्युत तारा, मोबाईल टॉवर्स, उंच झाडे इ. चा अडथळा नसल्याची खात्री करावी.

क) रसायने व खते अशा निविष्ठाचा वापर करताना...

१) ड्रोनद्वारे फवारणीसाठी वापरणार असलेल्या रसायने व खते या संबंधित प्राधिकरणाची (CAB & RC, FCO) फवारणीसाठी परवानगी असल्याची खात्री करावी. प्रचलित पद्धतीने ज्या रसायनांना फवारण्याची परवानगी आहे, अशा सर्व रसायनाला ड्रोनद्वारेही फवारण्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे,

२) ड्रोनद्वारे फवारणी करताना पर्यावरणीय मापदंड विहित मर्यादेत असल्याची खात्री करावी. उदा. तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग इ.

३) ड्रोनसंबंधित मापदंड उदा. ड्रोन पिकावरून उडविण्याची उंची, ड्रोनची गती व स्वाथ इ. संबंधित पिकाच्या अनुषंगाने असल्याची खात्री करावी. नसल्यास योग्य ते बदल करून घ्यावेत.

४) रसायनांच्या मिश्रणासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा.

प्रत्यक्ष फवारणीवेळची सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे

१) ड्रोन स्वयंचलित मोडमध्ये जरी उडविला जात असला तरी वेळोवेळी तो दिलेल्या सूचनांनुसार कार्य करत असल्याची खात्री ड्रोनचालकाने करत राहणे गरजेचे असते.

२) ड्रोन मनुष्यचलित मोडमध्ये (Manual Mode) फवारणीसाठी उडवत असताना पिकाच्या निर्देशित केलेल्या उंचीवरून, योग्य त्या वेगाने आणि स्वाथने उडवावा.

३) ड्रोनद्वारे फवारणीचे काम सुरू असताना फवारणी क्षेत्रांमध्ये मनुष्य किंवा जनावरे जाणार नाही याची खात्री करावी.

४) ड्रोनचालकाने रसायनाच्या फवारणी करताना सुरक्षेच्या आवश्यक त्या प्रावधानांचा अवलंब करावा. उदा. मास्क (मुखपट्टी), सुरक्षा कपडे इ. स्वतःला ड्रोनपासून सुरक्षित अंतरावर राहिले पाहिजे.

५) ड्रोन उडवताना येणारे विविध अडथळे येऊ शकतात. उदा. मोबाईल किंवा जीपीएस सिग्नल जाणे इ. यावर सातत्याने लक्ष ठेवावे.

६) ड्रोन उडत असताना नेहमी चालकाच्या नजरेच्या टप्प्यात असेल, याकडे लक्ष द्यावे.

७) ड्रोनचालकाने स्वतःही फवारणी क्षेत्राच्या आत जाऊ नये.

८) फवारणी करताना धूम्रपान करणे किंवा खाणे वर्ज्य करावे.

फवारणीनंतरची लक्षात ठेवायची तत्त्वे

१) फवारणी यंत्रणा पूर्ण रिकामी करून साफ करणे.

२) रसायनाच्या रिकाम्या बाटल्या, डबे, पुडे आणि वापरलेल्या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी. (कीटकनाशक नियम १९७१ नुसार).

३) फवारणी उड्डाणाबाबतच्या नोंदी ठेवून, ती आवश्यकतेनुसार डीजीसीएला पुरविण्याची जबाबदारी ड्रोनचालकाची असते.

४) ड्रोन उत्पादकांच्या सूचनांनुसार नियमित देखभाल व दुरुस्ती करावी.

५) फवारणी केल्यानंतर फवारणी क्षेत्रात लगेच जाऊ नये.

६) फवारणी पूर्ण झाल्यावर ड्रोनचालकाने स्वतः स्वच्छ अंघोळ करावी. कपडे धुऊन टाकावेत किंवा त्वरित बदलावेत.

 Drone Spraying
Agricultural Drone : परतूर तालुक्यात पिकांवरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर

१) ड्रोनद्वारे रसायनांची (कीटकनाशके, बुरशीनाशके, खते इ.) फवारणी करताना त्या संदर्भात सीआयबी अॅण्ड आरसी व एफसीओ यांनी जारी केलेल्या सूचना माहिती करून घ्याव्यात. उदा. फवारणीसाठी परवानगीप्राप्त किंवा प्रतिबंधित रसायने, साठवणूक, विल्हेवाट, विषबाधा झाल्यानंतर काय करावे इ. माहिती असले पाहिजे.

२) वरील लेखांमध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचना या प्रतिनिधिक आहेत. सखोल व सविस्तर सूचनांसाठी ‘कृषी व शेतकरी कल्याण’ मंत्रालयाच्या ड्रोन वापरासंबंधीच्या स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा संदर्भ घ्यावा.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात राबविले जाणारे ड्रोन प्रशिक्षण उपक्रम

१) एकदिवसीय कार्यशाळा : शेतीसाठी ड्रोनचा वापर

• शेतीसाठी ड्रोनचा वापर

ड्रोनचे प्रकार व कार्यप्रणाली

• फवारणी ड्रोनचा वापर

• फवारणी ड्रोन प्रात्यक्षिक

• चर्चासत्र

२. तीनदिवसीय कृषी ड्रोन प्रशिक्षण

• ड्रोन तंत्रज्ञानाची ओळख व इतिहास

• ड्रोनचे विविध क्षेत्रांतील उपयोग आणि भारतातील ड्रोन उद्योगाची स्थिती

• ड्रोनचे वर्गीकरण, संज्ञा, घटक इ.

• ड्रोनच्या विविध घटकांचे कार्यप्रणाली व उपयोग

• काटेकोर शेतीसाठी तसेच फवारणीसाठी ड्रोनचा उपयोग

• विविध सेन्सर आणि कार्यप्रणाली प्रणाली

३. एक आठवड्याचे ड्रोन तंत्रज्ञानाचे मूलभूत घटक प्रशिक्षण

• ड्रोन तंत्रज्ञानाची ओळख व इतिहास

• ड्रोनचे विविध क्षेत्रांतील उपयोग आणि भारतातील ड्रोन उद्योगाची स्थिती

• ड्रोनचे वर्गीकरण, संज्ञा, घटक इ.

• ड्रोनच्या विविध घटकांचे कार्यप्रणाली व उपयोग

• ड्रोनचे मूलभूत सेन्सर

• फ्लाइट मोड आणि त्यांची कार्ये, मिशनचे नियोजन आणि अंमलबजावणी, आपत्कालीन ऑपरेशनल प्रक्रिया

• ड्रोन ऑपरेशनल व पर्यावरणीय पॅरामीटर्स

• काटेकोर शेतीमधील ड्रोनचा उपयोग, विविध सेन्सर आणि त्यांची कार्यप्रणाली

• भारतातील ड्रोन नियामक मार्गदर्शक तत्त्वे

प्रात्यक्षिके ः

• ड्रोनच्या विविध घटकांची जोडणी आणि मल्टी रोटर सिस्टमचे एकत्रीकरण.

• फवारणी ड्रोनचा ओळख व प्रात्यक्षिक

• फवारणी ड्रोन उड्डाणपूर्व आणि नंतरच्या तपासण्या ड्रोनची देखभाल.

• विविध सेन्सर आणि त्यांची कार्यप्रणाली

३) तीन आठवड्यांचे प्रशिक्षण (काटेकोर शेतीसाठी ड्रोन तंत्रज्ञान – फवारणी व हायपरस्प्रेक्ट्रल इमेजिग)

ड्रोन तंत्रज्ञानाची ओळख, ड्रोन तंत्रज्ञानाचा इतिहास, ड्रोनचे विविध क्षेत्रांतील उपयोग आणि भारतातील ड्रोन उद्योगाची स्थिती

ड्रोनचे वर्गीकरण, संज्ञा, घटक इ., ड्रोनच्या विविध घटकांचे कार्यप्रणाली व उपयोग, ड्रोनचे मूलभूत सेन्सर, फ्लाइट मोड आणि त्यांची कार्ये, मिशनचे नियोजन आणि अंमलबजावणी, आपत्कालीन ऑपरेशनल प्रक्रिया, ड्रोन ऑपरेशनल व पर्यावरणीय पॅरामीटर्स, काटेकोर शेतीमधील ड्रोनचा उपयोग, विविध सेन्सर आणि त्यांची कार्यप्रणाली,

भारतातील ड्रोन नियामक मार्गदर्शक तत्त्वे, फवारणी ड्रोनचा ओळख व प्रात्यक्षिक, फवारणी ड्रोन उड्डाणपूर्व आणि नंतरच्या तपासण्या ड्रोनची देखभाल, भारतातील ड्रोन नियामक मार्गदर्शक तत्त्वे, काटेकोर शेतीमधील ड्रोनचा उपयोग, विविध सेन्सर आणि त्यांची कार्यप्रणाली,

रिमोट सेन्सिंग, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस), फील्ड स्पेक्ट्रोस्कोपी आणि हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग: तत्त्वे, संकल्पना आणि अनुप्रयोग, इन्फ्रा-रेड (आयआर) आणि निअर इन्फ्रा-रेड (एनआयआर) हायपरस्पेक्ट्रल इमॅजिन सेन्सर, ड्रोनसह एकत्रित सेन्सर, मिशन प्लॅनिंगसाठी ऑपरेटिंग प्रक्रिया, डेटा संपादन, डेटा पुनर्प्राप्ती आणि आयआर सेन्सरसाठी विश्‍लेषण प्रक्रिया

 Drone Spraying
Agricultural Drone : किसान ड्रोन योजनेबाबत मोठी माहिती

प्रात्यक्षिके ः

-ड्रोनच्या विविध घटकांची जोडणी आणि मल्टी रोटर सिस्टिमचे एकत्रीकरण.

-फवारणी ड्रोनचा ओळख व प्रात्यक्षिक

-फवारणी ड्रोन उड्डाणपूर्व आणि नंतरच्या तपासण्या ड्रोनची देखभाल.

-विविध सेन्सर आणि त्यांची कार्यप्रणाली

-फील्ड स्पेक्ट्रोस्कोपी आणि हायपरस्पेक्ट्रल इमॅजिन सेन्सर्सचे प्रात्यक्षिक

-स्पेक्ट्रोरेडिओमीटरसह प्राप्त केलेल्या स्पेक्ट्रल डेटाचे विश्‍लेषण करणे

-आयआर आणि एनआयआर सेन्सरसह हायपरस्पेक्ट्रल डेटाचे संकलन करणे

-हायपरस्पेक्ट्रल डेटा डाउनलोड करणे, भू-सुधारणा, प्रतिमा स्टिचिंग, वनस्पती निर्देशांकांची गणना करणे

आयआर आणि एनआयआर डेटावरून नकाशे तयार करणे.

४) DGCA मान्यताप्राप्त पाचदिवसीय रिमोट पायलट प्रमाणप्रत्र प्रशिक्षण कार्यक्रम + दोनदिवसीय कृषी ड्रोन प्रशिक्षण

तासिका वर्ग - २ दिवस

सिम्युलेटर (आभासी) वर्ग - १ दिवस

ड्रोन प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षण - २ दिवस

कृषी ड्रोन फवारणी प्रशिक्षण - २ दिवस

पात्रता :

१० वी उत्तीर्ण किंवा त्या समकक्ष

वय - १८ वर्षे ते ६५ वर्षांपर्यंत

भारतीय पारपत्र (पासपोर्ट)

वैद्यकीय प्रमाणपत्र

सर्व प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी संपर्क ः caast.csawm२०१८@gmail. com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com