Rural Business : ग्रामीण उद्योगामध्ये वाढत्या संधी ...

Food Business : आगामी दहा वर्षांत शेती आणि ग्रामीण उद्योगात आमूलाग्र क्रांती होत आहे. शेती उद्योगाची संपूर्ण दिशा बदलणार आहे. ग्रामीण भागातील युवक, युवतींनी शेतीमधील सुधारित तंत्र याचबरोबरीने बायो, नॅनो आणि डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे
Food Business Registration
Food Business RegistrationAgrowon

कांचन परुळेकर
Rural Business Ideas : आगामी दहा वर्षांत शेती आणि ग्रामीण उद्योगात आमूलाग्र क्रांती होत आहे. शेती उद्योगाची संपूर्ण दिशा बदलणार आहे. ग्रामीण भागातील युवक, युवतींनी शेतीमधील सुधारित तंत्र याचबरोबरीने बायो, नॅनो आणि डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे.

गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता तुकड्या, तुकड्यांची मर्यादित शेती फायद्याची ठरत नाही. त्यासाठी आता शेतकरी तसेच महिला बचत गटांनी सामूहिक शेती केली पाहिजे. शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी उद्योग क्षेत्रातील कंपन्यादेखील सामूहिक शेतीकडे वळत आहेत. म्हणूनच युवक आणि बचत गट महिलांनी त्वरित समूह शेतीकडे वळावे. २००८मध्ये राधानगरीतील १६ गावांतील ५० महिला बचत गटांना डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनने सामुदायिक शेतीचा मंत्र दिला. गावात ज्यांची शेती कसली जात नाही त्यांच्याकडून निम्मे उत्पन्न देण्याच्या अटीवर शेती घ्यायची. आपल्या शेतीवर कामाला जाण्यापूर्वी अर्धा तास गटातील सर्व महिलांनी समूह शेतीसाठी द्यायचा, नवे तंत्र वापरायचे. ज्या शेतात ७ पोती भात मिळायचा, तेथे चार सूत्री भातशेती तंत्राने संघटित प्रयत्नांतून १४ पोती भात उत्पादन झाले. जमीन मालक, गटातील महिला दोघांचाही फायदा झाला.

आज ढेबेवाडी (जि. सातारा) येथील प्रयोगशील महिला शेतकरी करपेवाहिनी या ५० महिलांना एकत्र घेऊन समूह शेती करत आहेत. अनेक ठिकाणी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीद्वारे शेतकऱ्यांची उत्पादने बाजारपेठेत उपलब्ध झाली आहेत. नाशिक जिल्ह्यातील विलास शिंदे यांच्या सह्याद्री फार्मने परदेशात शेती उत्पादने पाठविली आहेत.

माहिती तंत्रज्ञान, नवीन व्यवसाय संधी ः
१) ‘यंत्र युगाचे आले रे, अवघड सोपे झाले रे’, यामुळे पारंपरिक शेती पद्धती बदलून आधुनिक स्मार्ट शेती सुरू झाली आहे. सेन्सर्स, ड्रोन, रोबोट यांचा वापर करून उद्योग उभे राहात आहेत. बदलता काळ लक्षात घेऊन ग्रामीण भागातील शिक्षितांनी आता ही नवी तंत्रे शिकून घ्यावीत. श्रमाच्या शेतीला आता ज्ञानाची जोड, म्हणजे शिक्षित युवक युवतींची जोड लागणार आहे. हस्तक आणि मस्तक यांच्या मिलाफातून ग्रामीण उद्योगात प्रचंड क्रांती होईल.
२) शेतातील पाला पाचोळा, ओला कचरा यापासून कंपोस्ट खत, गांडूळ खत, नाडेप खतनिर्मिती करण्यासाठी चांगली संधी आहे. पाचट, भात तूस, पिंजार यांपासून बायोडिझेल निर्मिती होत आहे. सेंद्रिय भाजीपाला, फळे, पिके यांची मागणी वाढत आहे. फळे, भाजीपाला वाळविणे, खारविणे, शिजवणे, दळणे, गोठविणे, रस काढणे या क्रियांतून विविध टिकाऊ पदार्थ बाजारात येत आहेत. शीतगृहांची आवश्यकता वाढत आहे.

Food Business Registration
Rural Tourism Business : ग्रामीण पर्यटन उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाणार

३) शेती साधने भाड्याने देण्याबरोबरच शेतीसाठी कुशल मजूर पुरवठा उद्योग वाढेल. ऊस तोडणी मजुरांची कमतरता लक्षात आल्यानंतर कोट्यावधी रुपयांचे ऊस तोडणी यंत्र खरेदी करून भाडेतत्त्वावर कारखान्यांना दिले जाते. त्यासाठी सरकारी अनुदान, बँकांचे कर्ज उपलब्ध असूनही ग्रामीण युवक संघटितपणे एकत्र येऊन हा लाभ घेत नाहीत. शिवडाव, भुदरगड येथील महिलांनी ऊस तोडणी गट तयार केला असून, फोनवरून कंत्राट घेणे, वाहनातून प्रवास करून कामाच्या जागी पोहोचणे, कामाची उत्तम पूर्तता करून मिळालेल्या पैशाचे सफाईदारपणे वाटप करून घेत आहेत.
४) आयुर्वेदाला जगभर मान्यता मिळत असल्याने आयुर्वेदिक वनस्पतींची रोपवाटिका, लागवड आणि प्रक्रियेवर भर द्यावा लागणार आहे.. बांबू, अळंबी शेतीला चांगली मागणी आहे. फुलशेती, ड्रायफ्लॉवर्स, फूल चूर्ण, अत्तर, सूर्यफूल/ भोपळा/ काकडी/ कलिंगड यांच्या बिया, बटाटा, रताळे, आले, लसूण, कांदा पावडर या उत्पादनाकडे लक्ष द्यावे.

Food Business Registration
Rural Development : ग्रामीण आर्थिक विकासात ग्रामसंघ महत्वाचा...

५) पॉलिहाउस, हायड्रोपोनिक्स, टिश्यू कल्चर, बीजोत्पादन, माती परीक्षण, लँडस्केप, वैरण उत्पादन, अझोला, मत्स्यशेती, मोतीशेती हे उद्योग महत्त्वाचे आहेत. शेतीसाधने, इलेक्ट्रिक उपकरणे दुरुस्ती गरजेची आहे. बागकाम अवजारे विक्रीत वृद्धी होत आहे. शॉपिंग पोर्टल, कृषी सल्ला केंद्र, ऑनलाइन सर्व्हिस सेंटर, कृषी/पर्यटन ब्लॉगिंग ची गरज वाढली आहे.
६) कृषी पर्यटनात, ग्रामीण पर्यटनात नवे आयाम येत आहेत. भात
लावणी करणे, म्हशीवर बसणे, गायीचे दूध काढणे, नारळ झाडावर चढणे, मासे पकडणे, खेकडे पकडणे यासाठी पर्यटक पैसे द्यायला तयार आहेत.

उद्योगाच्या प्रारंभाची तयारी ः
उद्योगाची सक्षमता तपासणी अन् भांडवल जुळणी होताच उद्योगाचा प्रारंभ करणे गरजेचे असते. उत्पादन /सेवा/ व्यापाराचे तंत्रज्ञान प्राप्त झाले, परवाने हाती आले, मुदत कर्ज/चालू भांडवल कर्ज उभे राहिले, जागा इमारत विकसन झाले, यंत्रणा उभारली, कायदेशीर बाबींची पूर्तता झाली, की प्रायोगिक उत्पादनांना सुरुवात करणे आवश्यक असते. कामगारांना यंत्र वापर, व्यवसाय आणि वर्तणुकीबाबत प्रशिक्षित द्यावे. चाचणी उत्पादन घेऊन तज्ज्ञ, ग्राहक, कर्मचारी यांची मते, सूचना प्राप्त करून पूर्णपणे व्यावसायिक उत्पादनाला प्रारंभ करून बाजारपेठेत उतरावे.

उदाहरण ः
उत्तम दर्जेदार उत्पादन व उत्पादनाच्या प्रत्येक पायरीवर गुणवत्ता तपासायची तर उत्पादन निर्मिती तक्ता तयार करावा. उदाहरणादाखल कपडे बनविणे या उद्योगाचा ओघ तक्त्याचा अभ्यास करूयात. यामध्ये प्रत्येक पायरीवर तपासणी करून दर्जा योग्य आहे का पाहणे आवश्यक आहे.

ओघ तक्ता ः

कपडे बनविणे


तपासणी व दर्जा नियंत्रण
बाजारपेठेत पाठवणे
इस्त्री करणे
स्वच्छता
किमत/लेबल लावणे
घडी घालणे पॅकिंग
कपडा विकत घेणे
बटण लावणे, काजे करणे
जुळणी करणे व शिवणे
मागील पुढील भाग शिवणे
बाह्या शिवणे
कॉलर, कप शिवणे
साठवण
बेतणे

विक्री----- वसुली ---नफा ---यावरही सातत्याने लक्ष हवे

घर खर्च
कर्ज फेड
नफा विभागणी
पुनश्च व्यवसायात गुंतवणूक
बचत

या गोष्टी ही लक्षपूर्वक करायला हव्यात.

ग्रामीण उद्योग सूची ः

१) जमिनी संबंधी ः धान्यशेती, भाजीपाला, फलोत्पादन, बीजोत्पादन, विविध पिके, औषधी/सुगंधी वनस्पती, रोपवाटिका, फुलशेती, चारानिर्मिती.
२) पूरक उद्योग ः डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, शेळीपालन, वराहपालन, बदकपालन, परोपजीवी किडे, खेकडेपालन, पशू खरेदी-विक्री, अळिंबी उत्पादन, गांडूळ खत, कंपोस्ट खत, नाडेप खत उत्पादन.
३) सेवा उद्योग ः भात गिरणी, कडबा कुट्टी यंत्र, मळणी यंत्र, डाळ मशिन, तेल मशिन, कांडप मशिन, पाणी फवारणी पंप, ड्रोन, नांगरणी, बेबी रोलर, ट्रॅक्टर, बुलडोझर इ. वाहन भाड्याने देणे, शेती सुविधा केंद्र, इस्त्री, कल्हई, झेरॉक्स, शेतीचा दवाखाना, रसवंतिगृह, गोदाम, कांदा चाळ, ठिबक/ तुषार सिंचन, सायकल दुकान.
४) उत्पादने ः लिंबोणी, दशपर्णी, जिवामृत, कडूलिंब, करंज, वेखंड, लसूण अर्क निर्मिती. खाद्यरंग, वाख, द्रोण, पत्रावळ्या, सेंद्रिय कीटकनाशके, कपडे, स्वेटर, लाकडी वस्तू, मातीच्या वस्तू, नजीकचा कारखाना, कार्यालय, दुकानाला आवश्यक वस्तू, युरिया ब्रिकेट, टिश्यू कल्चर रोपवाटिका, पोहे, डाळ, चुरमुरे, बायो डिझेल, बेकरी, मोती निर्मिती, अगरबत्ती, साबण, कापूर, फिनाईल गोळ्या, पेपर कप/प्लेट्स, वाती.
५) प्रक्रिया उद्योग ः दुधाचे पदार्थ, नाचणी पदार्थ, मिलेट पदार्थ, जाम, जेली, सरबते, गोळ्या, भाजीपाला पावडर बनविणे, इन्स्टट पिठे, बेसन इ.
६) हस्तकला ः गवत, वाख, पाने यांपासून वस्तू. गोधडी, सुकी फुले वस्तू, बाटीक, डेकोरेटिव्ह प्लांट्स, बांधणी, मातीच्या वस्तू.
७) कृषी पर्यटन ः रानमेवा विक्री, बैलगाडी सफर, शालेय मुलांना नेणे- आणणे, रिक्षा/चारचाकी करार पद्धती शेती, सामुदायिक शेती.
८) एजन्सी खते, बियाणे, शेती उत्पादने, एलआयसी, वाहन/आरोग्य/जनावरे विमा, पोस्ट.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com