Sugarcane Production : प्रयोगशीलतेतून उंचावला ऊस उत्पादनाचा आलेख

सांगली जिल्ह्यातील साखराळे (ता. वाळवा) येथील धैर्यशील पाटील या अभियंता तरुण शेतकऱ्याने अभ्यास व शिकण्याच्या धडपडीतून उसाची प्रयोगशील शेती सुरू केली आहे.
Sugarcane Production
Sugarcane ProductionAgrowon
Published on
Updated on

Sangli District : सांगली जिल्ह्यात इस्लामपूर या प्रमुख शहराच्या पूर्वेला साखराळे गावचे शिवार लागते. याच ठिकाणी राजारामबापू सहकारी साखर कारखाना (Rajarambapu Cooperative Sugar Factory) आहे. गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील धैर्यशील पाटील यांच्या घरची चार एकर शेती आहे.

सन २०१६ मध्ये ‘बीई मेकॅनिकल’ची पदवी घेतलेल्या धैर्यशील यांनी पूर्णवेळ शेतीचीच जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ऊस हे त्यांचे प्रमुख पीक असून, दरवर्षी दोन ते तीन क्षेत्र या पिकाखाली असते.

शेतीतील प्रगती

शेती प्रयोगशील करण्यासाठी धडपड करणाऱ्या गावातील तरुणांनी एकत्र येत शिवार फाउंडेशनची स्थापना केली. त्याअंतर्गत माती परीक्षण करणे, ऊस पिकातील विविध अडचणींवर चर्चा करणे, त्यासाठी अनुभवी शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देणे, चर्चासत्रे आयोजित करणे असे उपक्रम सुरू केले आहेत.

याच फौंडेशनचा भाग असलेल्या धैर्यशील यांनी आपल्या शेतीतही नवे प्रयोग व सुधारणा सुरू केल्या. माझी शेती- माझा विकास ही ‘टॅगलाइन’ घेऊन २०१८ पासून एकात्मिक शाश्‍वत शेतीला सुरुवात केली. आपली शेती प्रगत झाली, पिकली, तरच आर्थिक सुबत्ता येऊ शकते हे लक्षात घेतले.

Sugarcane Production
Sugarcane Fire : वीजवाहक तारा पडून चार एकर ऊस जळून खाक

सरी पद्धतीचा वापर

धैर्यशील को ८६०३२ या वाणाची आडसाली पद्धतीने लागवड करतात. ऊस घेण्यापूर्वी त्या क्षेत्रात सोयाबीन, हरभरा अशी द्विदलवर्गीय पिके घेतली जातात. जमिनीची मशागत करताना साखर कारखान्याकडील कंपोस्ट खत एकरी वीस टन व चार टन मळीची राख यांचा वापर होतो.

पूर्वी साडेचार फूट सरी पद्धतीचा वापर व्हायचा. मागील वर्षी पाच बाय दीड फूट व सहा बाय दीड फूट अशा पद्धतीचा वापर केला. एक डोळा कांडीची लावण होते. दर चार सऱ्यांनंतर पाचवी सरी दाट लावण्यात येते.

जेणेकरून तुटाळी भरून येण्यासाठी त्याचा उपयोग होतो. उत्पादन वाढीसाठी शुद्ध बेणे महत्त्वाचे आहे हे ओळखून कोइमतूर येथील संस्थेतून रोपे आणून आपल्या शेतात वाढवली आहेत.

खत व्यवस्थापन

दरवर्षी माती परीक्षण केले जाते. त्यानुसारच अन्नद्रव्यांचा वापर होतो. प्रातिनिधिक नियोजन सांगायचे, तर लागवडीनंतर तीस दिवसांनी २०-२०- ०- १३ दोन बॅग्ज, युरिया एक बॅग, एसओपी वीस किलो ही खते चर काढून मातीआड केली जातात.

साठाव्या दिवशी १४- ३५- ३५ दोन बॅग्ज, अमोनिअम सल्फेट एक बॅग, पॉलिसल्फेट २५ किलो मातीआड केले जाते. ८० व्या दिवशी २४-२४- ० दोन बॅग्ज, अमोनिअम सल्फेट एक बॅग, पोटॅशिअम सोनाईट २५ किलो देऊन बाळभरणी होते.

११० दिवसांनी मुख्य भरणी होते. त्या वेळी ९-२४- २४ दोन बॅग्ज, युरिया एक बॅग, एसओपी २५ किलो अशी मात्रा देण्यात येते. प्रत्येक वेळी दोनशे किलोच्या आसपास कंपोस्ट खत देण्यात येते.

रासायनिक खतांच्या जोडीला ई एम सोल्यूशन, ॲसिटोबॅक्टर, वेस्ट डी कंपोजर यांचाही गरजेनुसार वापर होतो. ठिबकद्वारे खते देण्यासाठी धैर्यशील यांनी कमी खर्चात म्हणजे १७०० ते १८०० रुपयांत इंजेक्टर तयार केला आहे.

जमिनीच्या सुपीकतेवर भर

धैर्यशील यांनी एकरी उत्पादनाकडे लक्ष देण्याबरोबरच जमिनीच्या सुपीकतेवरही तेवढाच भर दिला आहे. ते म्हणतात, की एकरी १०० टन ऊस उत्पादन व तीन लाख रुपये एकूण उत्पन्न मिळवले, तर त्यातील १० टक्क्यांच्या आसपास रक्कम जमीन सुपीक करण्यावर खर्च करतो.

यात जिवाणू खतांचा वापर असतोच. शिवाय खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी गांडूळ खताचाही वापर होतो. आठ वर्षांपासून एकदाही पाचट पेटविलेले नाही.

फेरपालट म्हणून दरवर्षी एका एकरात सोयाबीन व त्यानंतर हरभरा ही पिके घेतली जातात. जमिनीतील सेंद्रिय कर्ब १.८ टक्का असल्याचे धैर्यशील सांगतात.

उत्पादनाचा उंचावता आलेख

उसाची एकरी संख्या ४०ते ४२ हजारांच्या आसपास ठेवण्यात येते. मोठी भरणी करण्याआधी विरळणी केली जाते. प्रत्येक बेटात सुमारे ८ ते ९ ऊस असतात. मागील वर्षी पोक्का बोइंग रोग व अवकाळी पावसाची समस्या यामुळे काही उसाचे नुकसान झाले. त्याचा उत्पादनावर परिणाम झाला. एकरी उत्पादन खर्च ८० हजार रुपयांपर्यंत येतो.

मिळालेले उत्पादन (एकरी)

२०१८ - ८५ टन

२०१९ - ९८ टन

२०२० - १०२ टन

२०२१ - १०० टन

२०२२ - ११३ टन

Sugarcane Production
Sugarcane Production : एकरी ११० टन ऊस उत्पादनात जपले सातत्य

निरीक्षण नोंदवही

धैर्यशील यांनी उसाच्या शरीरशास्त्राचा सविस्तर अभ्यास केला आहे. लागवडीपासून ते ऊस तोडणीपर्यंत प्रत्येक आठवड्यातील पिकाची निरीक्षणे गेली पाच ते सहा वर्षे ते सातत्याने नोंदवत आहेत.

त्यासाठी नोंदवही ठेवली आहे. हीच बाब उत्पादनवाढीसाठी हातभार लावणारी ठरली आहे. येत्या काळात ऊस नोंदवही गटातील प्रत्येक शेतकऱ्याला देण्याचा त्यांचा मानस आहे.

धैर्यशील पाटील, ९५७९००११७७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com