Rural Development : ग्रामसमृद्धीचा पाया रचणारे ग्रामसेवा मंडळ

वर्धा परिसरात १९३४ मध्ये विनोबा भावे यांच्या प्रयत्नातून ग्रामसेवा मंडळ या स्वयंसेवी संस्थेची उभारणी झाली. आजही देशभरात ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्याचे काम ग्रामसेवा मंडळाच्या माध्यमातून होत आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

साधारणपणे १९३४ ते १९४० या काळात भारतामध्ये स्वातंत्र्याची (Independence Movement) चळवळ गतिमान झाली होती. त्या वेळी ग्रामीण भागातील लोक आर्थिकदृष्ट्या परावलंबी राहू नयेत यासाठी स्वावलंबनातून आर्थिक समृद्धी रुजणे गरजेचे होते. यातूनच वर्धा परिसरात १९३४ मध्ये विनोबा भावे (Vinoba Bhave) यांच्या प्रयत्नातून ग्रामसेवा मंडळ या स्वयंसेवी संस्थेची (Gramseva Mandal voluntary organization) उभारणी झाली. आजही देशभरात ग्रामोद्योगाला (Village Industry) प्रोत्साहन देण्याचे काम ग्रामसेवा मंडळाच्या माध्यमातून होत आहे.

वर्धा येथील समाजसेवी जमनालाल बजाज हे गांधी विचाराने प्रेरित झाले होते. त्यातूनच अहमदाबादमधील साबरमती आश्रमाची शाखा वर्धा येथे सुरु व्हावी अशी मागणी त्यांनी महात्मा गांधी यांच्याकडे केली. दरम्यानच्या काळात स्वतंत्रता आंदोलनाने वेग घेतला, परिणामी महात्मा गांधी यांना वर्धा परिसरात येणे शक्‍य झाले नाही. त्यांनी विनोबा भावे यांना त्यांच्या विद्यार्थी मित्रांसोबत वर्धा येथे पाठविले. १९३४ मध्ये विनोबाजी वर्धा परिसरात दाखल झाले. त्यांच्या प्रेरणेतून नालवाडी परिसरात ग्रामसेवा मंडळाचे कामकाज सुरू झाले. विनोबा भावे गावातील जनतेला देव मानत. त्यामुळेच त्यांनी आश्रमातील पदाधिकाऱ्यांसाठी १४ दिवसांच्या गावभेटीचा कार्यक्रम तयार केला.

Rural Development
Fruit Crop Insurance : रावेरात फळ पीकविमा परताव्यापासून शेतकरी वंचित

‘भगवान प्रदक्षिणा’ असे त्याला नाव देण्यात आले. एका कार्यकर्त्याने या भ्रमंतीच्या माध्यमातून बारा गावांना भेट देणे अपेक्षित होते. हे कार्यकर्ते लोकांना सूत कताई आणि कापड विणण्याचे काम शिकवीत होते. ग्रामसेवा मंडळाचा खादी यात्रा हा एक विशेष कार्यक्रम होता. दरवर्षी विनोबा या कार्यक्रमांना उपस्थित राहून मार्गदर्शन करीत. भाषण, चर्चांसोबतच खादी यात्रेत सूतकताई आणि विणकामाविषयी स्पर्धांचे आयोजन केले जात होते. यातील विजेत्यांना चरखा भेट स्वरूपात दिला जात असे.

Rural Development
Crop Damage : शेतात साचलेल्या पाण्यातून पिके काढण्याचे प्रयत्न सुरू

कापूस ते कापड निर्मिती ः

लोकसहभागातून कापूस ते कापड या संकल्पनेवर काम होत असताना त्याकरिता लागणारे संयंत्रदेखील स्वदेशी असावे अशी ग्रामसेवा मंडळाची भूमिका होती. कापूस ते कापड संकल्पनेत चरखा आणि विणकामासाठी हातमागाची गरज होती. हे लक्षात घेता ग्रामसेवा मंडळाने ही साधने तयार करण्यावर भर दिला. उत्पादनासोबत संशोधनासाठी देखील संस्था प्रयत्नशील राहिली. त्यामुळे चरख्याचे विविध प्रकार विकसित करण्यात संस्थेला यश आले. यामध्ये पाच प्रकारच्या मानवचलित चरख्यांचा समावेश आहे. एकाचवेळी आठ ते दहा धागे निघतील किंवा सूतकताई होईल असे हे चरखे आहेत. नजीकच्या काळात कमी श्रमात अधिक काम व्हावे यासाठी सौरऊर्जाचलित चरखादेखील तयार करण्यात आला. त्याकरिता लागणारे साहित्य इतर ठिकाणावरून खरेदी केले जाते.

Rural Development
Rural Development : ग्रामपंचायत सक्षमीकरणामुळे गावांचा सर्वांगीण विकास

चरख्यावर सूतकताईचे काम संस्थेच्या परिसरात होते. काही महिलांना सूतकताईसाठी घरी चरखे वापरण्यास देण्यात आले आहेत. त्याकरिता थोडीफार रक्‍कम अनामत स्वरूपात स्वीकारली जाते. या माध्यमातून एका महिलेला १५० ते २०० रुपयांचे उत्पन्न होते. सूतकताईच्या प्रमाणात मेहताना देण्याची पद्धत या ठिकाणी प्रचलित आहे. सध्या १०० महिलांना चरखे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संस्थेच्या परिसरात वीस हातमाग आहेत. ग्रामसेवा मंडळामध्ये विणकर असून, त्यांना हे सूत दिल्यानंतर त्यापासून कापड तयार करून घेतले जाते.

आत्मिक समाधान देणारा पेटी चरखा ः

ग्रामसेवा मंडळाकडून खास पेटी चरखा तयार करण्यात आला आहे. आत्मिक समाधानासाठी या चरख्याचा वापर होतो. मोठ्या आकाराचा चरखा १,९५० रुपये आणि प्रवासी श्रेणीतील पेटी चरखा १,७०० रुपयांना उपलब्ध आहे. ग्रामसेवा मंडळाद्वारे हातमाग तयार करून त्याची विक्री होते. देशभरात मागणीनुसार याचा पुरवठा करण्यावर मंडळाचा भर आहे. संस्थेद्वारे अनेक प्रकारची ग्राम उपयोगी संयंत्र विकसित केली जातात. हा परिसर सरंजाम म्हणून प्रसिद्ध आहे.

रेशीम धागानिर्मिती यंत्र ः

रेशीम कोषाला कापून त्यातून पतंग निघून गेल्यानंतर अशा कोशाला बाजारपेठ मिळत नाही. परंतु संस्थेने अशा कोषांपासून देखील रेशीम धागा तयार करण्यासाठी यंत्रणा विकसित केली आहे. रेशीम उद्योगातील वाया जाणाऱ्या घटकांपासूनही धागा मिळविण्यात संस्थेला यश आले आहे.

पीक लागवड प्रक्षेत्र ः

ग्रामसेवा मंडळाची चाळीस एकर शेती आहे. त्या परिसरात विविध प्रकारच्या पिकांची हंगामनिहाय लागवड असते. या प्रक्षेत्रावर ज्वारी, मूग, उडीद, भुईमूग, भात तसेच देशी कापसाची लागवड केली जाते. शेतीमाल प्रक्रियेतही मंडळाने सातत्य राखले आहे. येत्या काळात स्वयंसाह्यता समूह, शेतकरी कंपन्या आणि बचत गटांना गावस्तरावर उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देण्याचा मंडळाचा मानस असल्याचे मंडळाच्या अध्यक्षा करुणाताई फुटाणे यांनी सांगितले.

उत्पादनांची विक्री ः

मंडळाद्वारे हातमागावरील कापड, लाकडी घाण्यावरील तेल तसेच इतरही अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. त्याच्या विक्रीसाठी संस्थेने वर्धा शहरात दोन, मंडळाचा परिसर असलेल्या भागात एक आणि सेवाग्राम आश्रम परिसरात एक विक्री केंद्र उभारले आहे. तसेच विनोबांचे साहित्य प्रकाशनावर मंडळाचा भर आहे. त्याकरिता परमधाम प्रकाशन आहे.

देशी गोवंश संवर्धन ः

वर्धा जिल्हा हा गवळाऊ गोवंशासाठी प्रसिद्ध आहे. या जातीचे बैल काटक असतात तसेच गायींची दूध उत्पादन क्षमतादेखील चांगली आहे. त्यामुळे १९४० मध्ये संस्थेच्या प्रक्षेत्रावर गवळाऊ गोवंश संवर्धनासाठी गोशाळा सुरू करण्यात आली. जातिवंत वळू आणि दुधाळ गाई तयार करण्यावर या ठिकाणी भर देण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी विविध जातींचे देशी गोवंशाचे संवर्धन केले जाते.

तेलासाठी लाकडी घाणा ः

पूर्वी गावोगावी बैलचलित लाकडी तेलघाण्या होत्या. त्या माध्यमातून गावात रोजगार निर्मितीसोबतच शेतीमालावर प्रक्रियेचा उद्देश साधला जात असे. संस्थेने लाकडी तेलघाणीची संकल्पना तशीच कायम ठेवत बैलाऐवजी मोटारीचा वापर सुरू केला आहे. मंडळाद्वारे तेलाचे उत्पादन करून विविध ठिकाणी विक्री केली जाते. शेतकऱ्यांकडूनच बाजार दरानुसार तेलनिर्मितीसाठी कच्चा माल खरेदी केला जातो.

लाकडी तेलघाणा उद्योग गावस्तरावर उभारण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांना तेलघाणा तयार करून देण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते. तेलघाणा तयार करण्यासाठी बाभूळ आणि भेराच्या लाकडाचा वापर होतो. ग्रामसेवा मंडळाने विकसित केलेल्या लाकडी तेलघाण्याला लघू उद्योजकांच्याकडून चांगली मागणी आहे.

संपर्क ः करुणाताई फुटाणे, ९४२२६३३७७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com