Rural Development : जल-मृदा संधारणाच्या माध्यमातून बोडका डोंगर हिरवा करण्याचा गोळेगावकरांचा संकल्प

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोळेगाव या गावाने मावालाही हिरवाई, झाडे नसलेल्या 'काळा छापा' डोंगर परिसराचे रूपांतर हिरवा छापा' म्हणून करण्यास सुरवात केली आहे. ग्रामस्थांच्या श्रमदानाला स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत, कृषी विभागाचे सहकार्य लाभले आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात खुलताबाद तालुक्‍यातील गोळेगाव हे पाचशे उंबरे व तीन हजार लोकसंख्येच्या आसपास असलेलं गाव आहे. एकेकाळच्या या ऊस उत्पादक गावात मध्यंतरीच्या दुष्काळात पाणीप्रश्‍न बिकट झाला.

गावच्या एकूण १०१९ हेक्‍टर क्षेत्रापैकी वनाखाली २९१ हेक्‍टर तर पेरणीलायक क्षेत्र ७३९ हेक्‍टर आहे. कपाशी (Cotton), मका (maize), सोयाबीन (Soybean), तूर (Tur), गहू (Wheat), मका (maize), हरभरा आदी पिकांना गावकरी प्राधान्य देतात.

गाव शिवाराला सर्व बाजूंनी वृक्ष नसलेल्या डोंगरांचा वेढा आहे. यापैकी वृक्षच काय पण तण, गवत, हिरवाईचा लवलेशही नसलेला डोंगर परिसर 'काळा छापा' म्हणून प्रसिद्ध होता.

बदलाला सुरवात

गोळेगावचे सुपुत्र, टीव्ही चॅनेल मालिका आणि चित्रपटांत दिग्दर्शकपदाची जबाबदारी सांभाळलेले संतोष जोशी २००३-०४ च्या दरम्यान गावाच्या ओढीने मुंबईहून परतले. ग्रामविकासाचे ध्येय त्यांच्या डोक्यात होतं.

काळा छापा परिसराचा भाग पायाखाली घालून त्यांनी विविध समस्यांचा अभ्यास केला. त्यांचे विचार आणि कामाप्रति प्रामाणिक तळमळ पाहून २००५ च्या सुमारास गावकऱ्यांनी त्यांच्या खांद्यावर ग्रामविकासाची धुरा टाकली.

सध्याच्या घडीला जोशी गावचे उपसरपंच असून सरपंचपदाची धुरा ताराबाई कारभारी औटे यांच्या खांद्यावर आहे.

Rural Development
Cashew Crop Management : शेतकरी पीक नियोजन : काजू

हिरवा छापा करण्याचा संकल्प

सन २०१६ मध्ये ‘पाणी फाउंडेशन’ च्या कार्यशाळेत उपसरपंच जोशी व सहकारी सहभागी झाले. यात माथा ते पायथा जलसंधारणाच्या कामांबाबत मार्गदर्शन झाले. त्यानंतर गावात काढलेल्या सामुहिक शिवार फेरीत एक वास्तव समोर आले.

पावसाच्या पाण्याने डोंगरावरून मोठ्या प्रमाणात मातीची धूप होत आहे. त्यामुळे मोठाले खडक उघडे पडत असून डोंगरावर ना झाडं वाढत आहेत ना गवत. त्याचवेळी काळ्या छापाला हिरवा छापा करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला.

‘पाणी फाउंडेशन’ चं प्रशिक्षण गावच्या १४ वस्त्यांवरही झाले. वन विभागाशी समन्वय झाला. काळा छापा डोंगरावर वृक्ष लागवड सुरू झाली. श्रमदानातून साडेपाच हजारांच्या आसपास वृक्षलागवड झाली. वाढदिवस असेल त्याने त्या दिवशी एक वृक्ष लावण्याची संकल्पना सुरू झाली.

शालेय मुलांनीही पुढाकार घेतला. आजच्या घडीला शेकडो वृक्षांची लागवड झाली असून त्याचे फलकही लावले आहेत. झाडांना राखी बांधून वाढदिवसही साजरा होतो. चराई बंदी, कुऱ्हाड बंदी करण्यात आली आहे.

पाणी मुरायला लागले

सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून २०१७ मध्ये सुरू झालेली जल- मृद्संधारणाची कामे आजही सुरू आहेत. ‘सीसीटी’, ‘डीप सीसीटी, ७० ते ८० मातीनाला बांध, जुन्या कामांचे पुनरुज्जीवन, साचलेला गाळ काढणे आदी कामे झाली.

डोंगरातून येणारे व वाहून जाणारे पाणी आता चालायला, थांबायला आणि मुरायला शिकल्याचा अनुभव गावकऱ्यांना आला. माती वाहून जाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यात यश आले.

कृषी विभागाचा हातभार

कृषी विभागाच्या योजनेतून शिवारातील शेतांची बांधबंदिस्ती झाली. २५ शेततळी, दोन सिमेंट बांध, अवजारे बॅंक, कांदाचाळ, ठिबक सिंचन आदींचा लाभ देवून ग्रामस्थांच्या प्रयत्नाला बळ देण्यात आल्याचे कृषी सहाय्यक सौरभ पाटील यांनी सांगितले. सुमारे ५८ शेतकऱ्यांना ‘सेवक ट्रस्ट’ च्या माध्यमातून गांडूळ खत युनिट्स देण्यात आली.

पाण्याचा ताळेबंद, शेती पद्धती

आता शिवारातील विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाळ्यात विहिरींना ४५ फुटांपर्यंत पाणी आहे. गावशिवारात पडणाऱ्या पावसाचा ताळेबंद मांडून त्यानुसार पीक पद्धती, व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

प्लॅस्टिक, जैविक मल्चिंगचे महत्त्व शेतकऱ्यांना पटले आहे. अलीकडील काळात भाजीपाला क्षेत्रही वाढले आहे. टोमॅटो हे मुख्य पीक असून मिरची, फ्लॉवर, कोबी, दोडका, वांगी, भेंडी आदी विविधता दिसून येते.

औरंगाबाद, मुंबई, वाशी, पुणे आदी बाजारपेठांमध्ये शेतकरी माल पाठवितात. सुमारे ७० टक्‍के शेतकरी एकपासून ते १० च्या संख्येपर्यंत गायी- म्हशीचे संगोपन करतात. एक सहकारी व चार खासगी दूध संकलन केंद्रे आहेत. त्या माध्यमातून दररोज सुमारे २५०० लिटरपर्यंत दूध संकलन होते.

चित्रा नक्षत्र गट राज्यात दुसरा

गावातील चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गटाने पाणी फाउंडेशनच्या ‘फार्मर कप’ स्पर्धेत सहभाग नोंदविला. मागील खरिपात गटाच्या २६ महिलांनी २६ एकरांत रसायन अवशेषमुक्त मुक्‍त कापूस उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून एकरी उत्पादनासह गुणवत्तेतही वाढ झाली.

या कार्याची दखल घेत पाणी फाउंडेशनतर्फे १५ लाखांचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देऊन महिलांचा गौरव झाला. या गटात विद्यमान सरपंच ताराबाई औटे यांचाही सहभाग आहे.

याच गटाच्या सदस्या सुनीता आढाव मुंबा संस्थेच्या माध्यमातून ‘सोलर ड्रायर युनिट’ द्वारे टोमॅटो प्रक्रिया करतात. अशी चार युनिट्स गावात कार्यरत आहेत.

Rural Development
Abdul Sattar: सत्तारांनी केली अंधारात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी; शेतकरी रागावले

गावातील ठळक विकासकामे

-शाळेची उत्कृष्ट रचना.

-निर्मल ग्रामसह अनेक छोटे- मोठे पुरस्कार

-पावसाच्या नक्षत्रावरून गावातील शेतकरी गटांची नावे. उदा. भरणी नक्षत्र पुरुष शेतकरी गट मका पिकात काम करतो.

-पुरुषांसह महिलांना संगणक चालविण्याचे प्रशिक्षण.

-ग्रामपंचायतीकडून सौर ऊर्जेवर आधारित पाणी पुरवठा योजना व पथदिवे.

-गर्भवती महिलांसाठी तपासणीसाठी माहेरघर

चित्रा नक्षत्र महिला गटाची सदस्य असल्याचा मला अभिमान आहे. महिलांची एकी कायम ठेवून ग्राम शिवाराचा विकास करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. आवड- सावड पध्दतीच्या शेतीतून उत्पादन खर्च कमी करून आर्थिक बचतही साधली आहे.
ताराबाई औटे, सरपंच, गोळेगाव
गावकऱ्यांचा विश्‍वास आणि साथ महत्त्वाची ठरली आहे. गावच्या ओढीने शहरातील स्थिरस्थावर काम सोडून गावी परतलो. आता झालेली विकासकामे पाहून समाधान व बळ मिळते आहे.
संतोष जोशी, उपसरपंच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com