
शेतकरी : महेश परशुराम रावराणे
गाव : नावळे ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग
एकूण क्षेत्र : २० एकर
काजू लागवड : ४ एकर (५०० झाडे)
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावळे (ता. वैभववाडी ) येथे महेश रावराणे यांची २० एकर जमीन आहे. त्यातील ४ एकरांमध्ये काजू लागवड केलेली आहे.
त्यात वेंगुर्ला ४ आणि वेंगुर्ला ७ या काजू जातींची ५०० झाडांची लागवड आहे. काही झाडे गावठी झाडे देखील आहेत. संपूर्ण काजू लागवड डोंगर भागात आहे. पावसाच्या पाण्यावर बागेचे संपूर्ण व्यवस्थापन केले जाते.
व्यवस्थापनातील बाबी :
- जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी असताना झाडा भोवती चर खोदून फॉस्फेट, पोटॅश आणि नत्र खताची मात्रा दिल्या. याशिवाय प्रत्येक झाडाला ५ ते ६ किलो शेणखत दिले.
- यावर्षी परतीचा पाऊस लांबला. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यानंतर झाडांना पालवी फुटण्यास सुरवात झाली. पालवी येत असताना देखील पाऊस झाला.
त्यामुळे टी मॉस्कीटो बग (ढेकण्या) चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी घेतली.
- ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस संपूर्ण बागेची स्वच्छता करून घेण्यात आली. झाडा भोवती वाढलेले गवत काढणे, पालापाचोळा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. बागेभोवतीचा परिसराची साफसफाई केली.
- नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बागेतील काही झाडांना मोहोर येण्यास सुरवात झाली. या कालावधीत थंडीचे प्रमाण थोड्याफार प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे मोहोर चांगला आला. मोहोर टिकून राहण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांची दुसरी फवारणी घेतली.
- डिसेंबर महिन्यात फळधारणा झाल्यानंतर पुन्हा तिसरी प्रतिबंधात्मक फवारणी घेतली. प्रत्येक फवारणी करण्यापूर्वी संपूर्ण बागेतील झाडांची पाहणी केली जाते.
झाडांची पाने, मोहोर, फळांचे निरीक्षण केल्यानंतर कीड-रोगांचा प्रादुर्भाव ओळखून कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार फवारणीचे नियोजन केले जाते.
आगामी नियोजन :
- फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून काजू बी परिपक्व होण्यास सुरवात झाली आहे. सध्या झाडांवर परिपक्व झालेली काजू बी गोळा करण्याचे काम सुरु आहे. काजू बोंडापासून बी वेगळे करून स्वच्छ पाण्याने धुवून साठविले जाते.
- यावर्षी दोन टप्प्यात मोहोर आल्यामुळे उशिरा आलेल्या मोहोराचे काजू बी परिपक्व होण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे एप्रिलअखेरपर्यंत काजू हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे.
- काजू हंगाम संपल्यानंतर बागेत स्वच्छतेच्या कामांवर भर दिला जातो. मे महिन्यात बागेत पडलेला पालापाचोळा गोळा करून झाडांच्या बुंध्यावर रचून ठेवला जातो. जेणेकरून पाऊस पडल्यानंतर पालापाचोळा कुजण्याची प्रकिया सुरू होईल.
- हंगाम संपल्यानंतर प्रत्येक झाडाला मुबलक सूर्यप्रकाश मिळण्याकरिता अतिरिक्त फांद्याची छाटणी केली जाईल.
महेश रावराणे, ९४२११४४७९५, (शब्दांकन : एकनाथ पवार)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.