
शेतकरी नियोजन ः शेळीपालन
शेतकरी ः प्रतीक प्रकाश पाचपुते
गाव ः काष्टी ता. श्रीगोंदा, जि. नगर
एकूण शेळ्या ः ८०
Goat Farming : नगर जिल्ह्यातील काष्टी हे शेळी, मेंढीसह अन्य पशुधनाच्या बाजारपेठेसाठी अग्रेसर असलेले गाव. येथील प्रतीक प्रकाश पाचपुते या तरुण शेतकऱ्याने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर घरच्या शेतीमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली. शेतीला पूरक व्यवसाय (Agriculture Based Business) म्हणून शेळीपालन (Goat Rearing) करण्याचा निर्णय घेतला. आणि कुटुंबाच्या साथीने तो यशस्वी केला.
प्रतीक यांचे अकरा लोकांचे एकत्रित कुटुंब आहे. घरची वडिलोपार्जित २० एकर शेती. शेतामध्ये उसासह गहू, कांदा या सारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. प्रतीक यांना सुरवातीपासूनच शेतीची ओढ होती. त्यामुळे शिक्षणानंतर शेतीसह पूरक म्हणून शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला.
साधारणपणे ७ वर्षांपूर्वी शेळीपालनाचा श्रीगणेशा केला. काष्टी गावामध्येच शेळ्या-मेंढ्यांचा नावाजलेला बाजार आहे. तेथून सुरवातीला उस्मानाबादी जातीच्या पाच शेळ्यांची आणि १ बोकड खरेदी केले. त्यानंतर २ बीटल आणि १ सोजत जातीचे नर खरेदी केले.
पाच शेळ्यांपासून सुरु केलेला शेळीपालनाचा व्यवसाय आज लहान-मोठ्या मिळून ८० शेळ्यांपर्यत पोचला आहे. त्यात ५० मोठ्या व ३० लहान शेळ्या आहेत. शेळ्या आणि बोकडांच्या विक्रीसाठी स्थानिक बाजारासह सोशल मीडियाचा वापर केला जातो. बहुतांश पशुपालक बोकडांची संकरासाठी खरेदी करतात.
शेडची उभारणी ः
१) व्यवसायाच्या सुरुवातीला घराजवळील शेडमध्ये शेळ्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केली. शेळ्यांसाठी अर्धा एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे.
२) त्यामधील १० गुंठे क्षेत्रावर मागील तीन वर्षांपूर्वी सुमारे ८ लाख रुपये खर्च करून शेळ्यांसाठी पूर्ण बंदिस्त प्रकारच्या शेडची उभारणी केली. त्यात ४८ बाय ७० फूट आकाराचे शेड बांधले आहे. आणि उर्वरित जागेत फिरण्यासाठी मोकळी जागा असून बाजूने कुंपण केले आहे. संरक्षणासाठी जाळी बसवली आहे.
३) शेडमध्येच एकाच ठिकाणी शेळ्यांची अधिक गर्दी होऊ नये, यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. शेडमध्ये प्रत्येक जातीच्या व वयानुसार शेळ्यांची वेगवेगळी व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे आठ कप्पे केले आहेत. त्यामुळे शेळ्या, पिल्ले आणि बोकड यांना वावरण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे.
खाद्य व्यवस्थापन ः
१) दररोज सकाळी साडेसात वाजता प्रत्येक शेळीला हरभऱ्याचा व मक्याचा भरडा एकत्रित करून अर्धा किलो प्रमाणे दिला जातो. त्यात खनिज मिश्रण १० ग्रॅम प्रमाणे वापरले जाते.
२) त्यानंतर सकाळी १० वाजता वाळलेला चारा साधारण २ किलो प्रमाणे दिला जातो. त्यात हरभऱ्याचा भुस्सा व वैरण (कडब्याचा) समावेश असतो.
३) शेळ्यांमध्ये नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी तसेच पिल्लांची चांगली वाढ होण्यासाठी दररोज कडुनिंबाचा पाला दिला जातो.
४) सायंकाळी ४ वाजता हिरवा चारा ३ किलो प्रमाणे प्रति शेळीला दिला जातो. त्यात मेथीघास व सुबाभूळ पाल्याचा समावेश असतो. हिरव्या चाऱ्यासाठी दीड एकरावर सुबाभूळ आणि १ गुंठे क्षेत्रावर लसूणघास लागवड केली आहे.
५) सुक्या चाऱ्यासाठी हरभऱ्याचा भुस्सा वर्षाला साधारण १२ टन इतका लागतो. त्याची आधीच खरेदी करून ठेवली जाते.
६) खाद्य देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यामुळे चारा वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
आरोग्य व्यवस्थापन ः
१) शेळीपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापन विशेष भर दिला जातो.
२) वेळापत्रकानुसार शेळ्यांना नियमितपणे लसीकरण केले जाते.
३) मे महिन्यात ईटीटीटी ही लस दिली जाते. जून महिन्यात पीपीआर चे लसीकरण केले जाते.
४) एफएमडी (लाळ्या खुरकूत) चे लसीकरण नोव्हेंबर महिन्यात केले जाते.
५) दर तीन महिन्यांनी लहान आणि मोठ्या शेळ्यांना जंतनाशकाची मात्रा दिली जाते.
६) शेळ्या आणि पिल्लांच्या सर्व आरोग्यविषयक आणि गाभण काळातील नोंदी ठेवल्या जातात.
पिल्लांसाठी वेगळी व्यवस्था ः
१) शेळ्यांच्या लहान पिल्लांसाठी वेगळे कप्पे केले आहे.
२) जन्माच्या पहिल्या दिवसापासून पिल्लांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते.
३) लहान पिल्लांसाठी वेगळा खुराक दिला जातो.
४) दररोज सकाळी साडेसात वाजता शेळीचे अर्धा लिटर दूध प्रत्येक पिल्लाला बाटलीद्वारे पाजले जाते. सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा दूध पाजले जाते. ही प्रक्रिया पिल्ले तीन महिने वयाची होईपर्यंत केली जाते. तीन महिन्यांनंतर दूध देणे बंद केले जाते.
५) पिल्लांना खाद्य खाण्याची सवय लागण्यासाठी हरभरा भरडा दररोज १०० ग्रॅम प्रमाणे दिला जातो.
प्रतीक पाचपुते, ७०५८१००८२१ (शब्दांकन ः सूर्यकांत नेटके)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.