Zero tillege : नांगरणीविना शेतीमधील तणनाशक वापराचे अनुभव

संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक चुकीचे उत्तर तेथे जवळच असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ग्लायफोसेट तणनाशक वापरताना त्यामागील शास्त्रीय कारणे आणि शेतीमधील वापराचा काटेकोर अभ्यास करावा.
Weedicide
WeedicideAgrowon
Published on
Updated on

नुकतीच केंद्र सरकारने ग्लायफोसेट (Glyphosate Ban) या तणनाशकाच्या (Weedicide Ban) वापरावर बंदी आणणारे राजपत्र प्रसिद्ध केले. यावर अनेकांनी उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. केरळ सरकारने या तणनाशकावर बंदी घालावी असे पत्र दिल्याची चर्चा आहे. जमीन (Soil) आणि मानवी आरोग्याला हानिकारक असल्याने बंदी घालण्यामागे कारण नमूद केले आहे. यासाठीचे कोणतेच पुरावे सादर केलेले नाहीत, असे मला वाटते. ग्लायफोसेट हे तणनाशक १९७३ मध्ये अमेरिकेच्या बाजारपेठेत मोन्सॅन्टो या कंपनीने उपलब्ध केले.

Weedicide
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; शेतकऱ्यांस ३ लाखांचा फटका 

१९४६ मध्ये २-४ डी हे पहिले तणनाशक बाजारात आले. रासायनिक तण नियंत्रण असे नवे पर्व शेतीत जन्माला आले. १९७० मध्ये मी कृषी पदवीधर होऊन शेतीस प्रारंभ केला. त्या काळात २-४ डी हे तणनाशक नुकतेच बाजारात आले असावे. आम्हा कृषी पदवीधरांना एखादे रसायन बाजारातून विकत आणून तणांवर फवारले तर तण मरते ही गोष्ट माहिती नव्हती. बहुतेक शेतकऱ्याकडे तणनाशक फवारणीची पुरेशी साधने नव्हती.

पुढे काही वर्षे या तणनाशकांच्या वापरासंबधी शेतकरी उदासीन होते. तिकडे अमेरिकेत नवनवीन तणनाशके शोधण्याच्या कामाला वेग आला होता. भारतात अत्यंत तुरळक वापर सुरू असता तिकडे अमेरिकेत २५० तणनाशकांची बाजारात नोंद झाली होती. पुढे ७५ ते ८० च्या दरम्यान साखर कारखान्यांनी ५० टक्के सवलतीवर सभासदांना तणनाशके उपलब्ध करून दिली आणि तणनाशकाच्या वापराबाबत आमच्या ऊस पट्ट्यात वेग घेतला.

Weedicide
क्रिस्टल’चे उसामधील तणनाशक ‘होला’ बाजारात दाखल

तणनाशकांचा शास्त्रीय अभ्यास महत्त्वाचा ः

१९८५ दरम्यान मला कोल्हापुरातील एका पुस्तकाच्या दुकानात “प्रिंसिपल्स ऑफ वीड सायन्स” हे डॉ. व्ही. एस. राव यांचे पुस्तक निदर्शनाला आले. ५४० पानांचे हे तण विज्ञानाचे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्टने अनुदानाची सवलत देऊन फक्त ३६.५० रुपयांत सर्वांनी अभ्यास करावा म्हणून उपलब्ध करून दिले होते. या विषयात अभ्यास करणारे शास्त्रज्ञ पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तक अगर संदर्भ ग्रंथ अशी या पुस्तकाच्या उपयुक्ततेविषयी नोंद या पुस्तकात आहे, शेतकऱ्यासाठी असा उल्लेख नाही. मी तत्काळ पुस्तक खरेदी केले.

Weedicide
Glyphosate : ग्लायफोसेट जगभरात चर्चेत राहिलेले तणनाशक

हा सर्व इतिहास देण्यामागे काही खास कारण आहे. याच दरम्यान कोल्हापुरात कृषी कीडनाशक विक्री करणाऱ्या एका दुकानात एक नवीन तणनाशकाचा डबा (कॅन) नजरेस आला. त्याचे नाव ग्लायफोसेट असे होते. किंमत २,३५० रुपये होती. त्या काळात कोणतेही कीडनाशक ५० ते ६० रुपयांत घेण्याची सवय असता तणनाशकाच्या डब्याची किंमत २,३५० रुपये, म्हणजे नेमके काय तणनाशक आहे हे जाणून घेण्याची इच्छा झाली.

घरात येऊन वरील ग्रंथ हाताळला असता लव्हाळा, हराळीसारखी बहुवार्षिक तणे मारणारे एकमेव तणनाशक अशी पुस्तकात माहिती मिळाली. या तणांचा प्रश्‍न माझे पुढे होताच. तणनाशक घेण्याची इच्छा झाली, परंतु २,३५० रुपये कोठून उभे करावयाचे हा प्रश्‍न होता. माझे ५०००+५००० असे पीककर्जाचे खाते होते. त्यातून ३५ टक्के खाते हे एकाच तणनाशकावर खर्च होऊन इतर खर्चासाठी तरतूद कमी पडणार.

हे कळत असूनही ५ लिटरचा कॅन खरेदी केला. या गोष्टीला आता ३० ते ३५ वर्षांचा काळ लोटला आहे. प्रत्यक्ष वापराची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर पुढे याचा वापर वाढत गेला. हे सर्व वरील पुस्तकाचा अभ्यास व प्रत्यक्ष शेतातील अनुभव यातून घडत गेले. अनिवडक गटातील हे एक उत्तम तणनाशक आहे. याचा अर्थ कोणत्याही हिरव्या वनस्पतीवर मारल्यानंतर ती मरते, एकदा लावणी उसाबरोबर हराळीचा गड्डा वाढला होता. हराळी मारत असता उसावर काही तणनाशक उडाले आणि उसाचे रोपही मरून गेले. या तणनाशकाने ऊस मरतो. उसावर अगर पिकावर अजिबात न पडता संबंधित तणनाशक फक्त तणावरच पडले पाहिजे हे माहिती झाले.

तणनाशकाच्या वापराचे माझे अनुभव ः

१९९० च्या सुमारास ऊस उत्पादन कमी व्हायला लागले. या कारणांचा शोध घेता जमिनीतील सेंद्रिय कर्बाची कमतरता ही गोष्ट ध्यानात आली. शेणखत, कंपोस्ट वापराने ही कमतरता भरून काढणे केवळ अशक्य आहे. हे लक्षात आल्यानंतर १५ वर्षे उसाचे पाचट रानात कुजविण्याचे प्रयोग केले. मात्र उत्पादनात वाढ झाली नाही. त्यानंतर ऊस लावण- खोडवे आणि तिसऱ्या वर्षी भात या फेरपालटात भाताची पूर्वमशागत करीत असता खोडवे नांगरून त्याचे अवशेष गोळा करून जमीन स्वच्छ करून भात पेरण्याची प्रथा होती.

त्याऐवजी आता कोणतीही मशागत न करता उसाचे जमिनीतील राहिलेले अवशेष ग्लायफोसेट तणनाशक फवारून मारून टाकावयाचे आणि शून्य मशागतीवर भात व पुढील ऊस लावायचा असे नियोजन केले. यामागे ऊस अवशेष कुजून रानाला सेंद्रिय खत काही प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रायोगिक उद्देश होता. प्रयोगाचे नियोजन करण्यामागे ग्लायफोसेट तणनाशकाने ऊस मरतो या अपघातातून मिळालेल्या शिक्षणाचा संदर्भ जमेस होता. २००५ भात पीक उत्तम आले.

तसेच पुढे शून्य मशागतीवर उसाची लावण केली असता ३५ वर्षांच्या वापरातून जी जमीन खराब झाली होती ती एकाच वर्षात पूर्वी होती तितक्या ताकदीची होऊन उसाचे उत्पादन ५० टक्क्यांनी वाढले. ही किमया ऊस खोडके कुजून जमिनीतच तयार झालेल्या सेंद्रिय खत आणि उसाचे राहिलेले अवशेष मारणाऱ्या ग्लायफोसेट वापराची होती, असे माझ्या लक्षात आले.

ग्लायफोसेट तणनाशक हा माझ्या शेती पद्धतीतील एक अविभाज्य घटक वरील प्रयोगाने बनून गेला. तसेच तणनियंत्रणासाठी या तणनाशकाचा वापर १९८५ पासून चालू सुरू आहे. आता शास्त्रीय पद्धतीने सेंद्रिय पदार्थांच्या व्यवस्थापनासाठी ग्लायफोसेटचा वापर मी सुरू केला. आज भारतीय शेतकऱ्यांची जमीन आणि आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. वयोमानानुसार आज माझ्या काही तब्येतीच्या किरकोळ तक्रारी सोडल्या तर आमचे आरोग्य चांगले आहे. याच शेतीत पिकलेले भात, गहू, भुईमूग, कडधान्य आम्ही खातो. आमच्या सर्वांच्या तब्येती उत्तम आहेत.

हरितक्रांती बदनाम झाली ती केवळ आपण उत्पादन वाढी मागे धावलो. पुढे उत्पादन घटू लागल्यावर नेमके का घटत आहे याचा अभ्यास न करता विचारवंतांनी हरितक्रांतीलाच बदनाम करून सोडले. कोणतीही चांगली गोष्ट करीत असता त्याला जोडून काही वाईट गोष्टी येणारच! त्यावर उपाय शोधण्याऐवजी ते तंत्र चुकीचे होते असे कसे म्हणता येईल? संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक चुकीचे उत्तर तेथे जवळच असते. पिकांच्या वाढीचा जोम व मिळणारे उत्पादन हे जमिनीचे आरोग्य सांगण्यास सक्षम आहे. यासाठी कोणत्याही प्रयोगशाळेत जाऊन माती तपासण्याची गरज नाही. यासाठी शेतकऱ्यांनी तणनाशकाचा शास्त्रीय अभ्यास आणि योग्य ठिकाणीच वापर करणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com